वाचावे ते नवलच -९- पुनर्जन्म

बालपणी मी ज्या वातावरणात वाढलो त्यात पुनर्जन्माचा उल्लेख सतत यायचा. भगवान विष्णूचे सुप्रसिध्द दशावतार होतेच, त्याशिवाय  विविध देवादिकांच्या इतर कित्येक अवतारांच्या कथा ऐकायला मिळायच्या. अनेक ऐतिहासिक व तत्कालिन थोर व्यक्तींनासुध्दा अवतारपुरुष म्हटले जायचे. पूर्वजन्मीच्या रजकाला गुरुकृपेने यवन पातशहाचा जन्म प्राप्त झाला, अशासारखे पुनर्जन्माचे उल्लेख पोथ्यांमधील कथांमध्ये असायचे. "वासांसि जीर्णानि यथा विहाय ..... " या सारख्या श्लोकात आत्म्याने शरीर बदलणे हे अंगावरचे कपडे बदलण्याइतके सहज दाखवले आहे. रोजच्या जीवनांतसुध्दा अमुक तमुक गोष्ट केली तर पुढच्या जन्मी गाढव, बैल, वटवाघुळ असला कोणीतरी प्राणी होशील अशी भीती नेहमी दाखवली जायची. निष्कारण त्रास देणारा पूर्वजन्मीचा सूड उगवतो आहे आणि फसवणूक करणारा पूर्वजन्मीचं देणं घेऊन गेला अशा प्रकारची स्पष्टीकरणे दिली जात. या सर्वामुळे सूर्य पूर्वेला उगवतो या विधानाइतकीच पुनर्जन्माची संकल्पना मनात घट्ट रुतून बसली होती.
पुढे कधीतरी लक्षांत आलं की सूर्याचे पूर्वेला उगवतांना दिसणं हाच एक दृष्टीभ्रम आहे. विश्वातील प्रत्येक वस्तुकडे त्याचा आकार, वस्तुमान, तपमान, ऊर्जा वगैरे भौतिक विज्ञानाच्या परिमाणामधून पहाण्याची संवय लागली. मनुष्यप्राण्याची ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व मेंदू यांच्या रचनेतील गुंतागुंत पाहून थक्क व्हायला झालं. हे सारे दिव्य अवयव शरीरामध्ये मागे सोडून बाहेर पडलेल्या अदृष्य आत्म्याला त्यांच्या मदतीशिवाय काय दिसणार, काय ऐकू येणार, त्याचे आकलन कसे होणार, स्मरण कुठे ठेवणार आणि तो कशाची हालचाल करणार हे कांही न समजल्याने त्याच्या अस्तित्वावरील विश्वास कमी होत गेला तसेच त्याच्या आधारावर उभ्या असलेल्या परलोक, परकायाप्रवेश, पुनर्जन्म वगैरेना फारसा अर्थ उरला नाही.
नुकतेच एका वर्तमानपत्रांत अगदी पहिल्या पानावर असं वाचसं की अमिताभ बच्चन, शाहरुख खान, पं.नेहरूजी आणि आपले राष्ट्रपति अब्दुल कलामसाहेब हे सर्वजण कुणा ना कुणाचे पुनर्जन्म आहेत. त्यांची पूर्वजन्मीची नांवे सुध्दा खाली दिलेली होती. वाल्टर सेमकिव्ह नांवाच्या अमेरिकन माणसानं हा शोध लावून पुस्तकाद्वारे जगापुढे मांडला आहे.  या वेळेस मी यावर थोडासा अभ्यास करायचं ठरवलं. माहितीजालावर त्याची मोठी वेबसाईट असून त्यावर बरीच माहिती दिली आहे. शेकडो (किंवा हजारो) जीवंत तशाच मृत माणसांच्या जीवनाचा अभ्यास करून त्याने त्यांच्या जोड्या बनवल्या. ही माहिती मिळवण्याची  साधने त्याने सांगितली आहेत. कांही केसेसमध्ये नुकतीच बोलायला लागलेली लहान मुले आपण होऊन पूर्वजन्मीची माहिती सांगतात, कांही लोकांच्या पूर्वस्मृती मोठेपणी जाग्या होतात तर कांही लोकांना हिप्नाटिझमद्वारे मनाने भूतकाळात गेल्यावर ती माहिती मिळते. तपासाअंती ती माहिती खरी ठरते. कांही लोकांच्या बाबतीत पुनर्जन्माचे कांही ठोकताळे लावून जीवनाच्या माहितीवरून जोड्या बनवल्या गेल्या तर अनेक उदाहरणांमध्ये चक्क एका मध्यस्थाकरवी  एका स्पिरिटची ( म्हणजे भुताची की मृतात्म्याची) मदत घेतली असे त्याने लिहिले आहे.
चेहेरेपट्टी, अंगलट, हातवारे वगैरेमधील सारखेपणा, व्यक्तिमत्वातील, वागणुकीतील व स्वभावधर्मातील वैशिष्ट्ये,  लेखनशैलीतील साम्य इत्यादिचा अभ्यास करून त्याने आपले अंदाज बांधले आहेत. अशा साम्यावरूनच "अमक्या तमक्याने आपल्या कुटुंबातच कुणाच्या तरी रूपाने पुन्हा जन्म घेतला असेल" असे आपणसुध्दा म्हणून जातो. सर्वसंमत व ग्राह्य असा पुरावा त्यात दिसत नाही पण या गोष्टींचा अभ्यास करत गेल्यास कधीतरी तो मिळेल असा सेमकिव्हचा विश्वास आहे. या यादीमधील सर्व माणसांनी पुन्हा मनुष्यजन्मच घेतला आहे पण अनेक वेळा तो वेगळ्या देशात, वंशात व धर्माच्या जमातीत घेतला आहे. अनेक बाबतीत त्यांनी गटागटाने पुनर्जन्म घेतलेला आहे आणि दहा ते वीस टक्के अपवाद वगळता त्यांनी लिंग बदललेले नाही. म्हणजे "सात जन्म हाच पति लाभणे" खरंच शक्य आहे म्हणायचे. हे सगळे लोक पूर्वीच्या जन्मांत सुप्रसिध्दच कां होते हा प्रश्न माझ्या मनांत लगेच आला. याला त्याचे उत्तर असे आहे की खरं तर बहुसंख्य लोक पूर्वजन्मी सर्वसामान्यच असतात पण ते "किती एक ते जन्मले आणि मेले" अशा वर्गातील असल्यामुळे त्यांचेविषयी खात्रीलायक संपूर्ण माहिती मिळत नाही. सुप्रसिध्द लोकांची चरित्रे व चित्रे उपलब्ध असतात त्यामुळे अशा केसेसचाच अभ्यास करून त्यांना त्याने आपल्या पुस्तकांत स्थान दिले आहे असे त्याचे म्हणणे आहे. 
हे सगळं नीटपणे पचवणं कठिणच आहे. विशेषतः शेकडो वर्षांच्या कालावधीतील सात खंडातील माणसांची माहिती त्या स्पिरिटला तरी कशी मिळाली आणि त्याने कशाप्रकारे ती लेखकाला दिली हे कळण्यासारखे नाही. मला न समजलेल्या गोष्टींवर मी विश्वास ठेऊ शकत नाही हे खरं असलं तरी त्या अजीबात अस्तित्वातच नाहीत असेही मी म्हणू शकत नाही. कारण हे विश्व अथांग आहे तर माझी आकलनशक्ती अगदी तोकडी. त्यामुळेच वाचावे ते एक नवलच असे वाटते.