हिमालयन ट्रेक [ यांकर पास एक्सपेडिशन ]

हिमालय म्हटला की सर्वप्रथम तेथील उत्तुंग शिखरे नजरेसमोर येतात. बर्फाने आच्छादलेली उंच उंच शिखरे.


हा भारताचा उत्तरेकडील प्रदेश. हिमालयाच्या पलीकडून येणा-या भारतावरच्या स्वा-यांच्या दृष्टीने हा जवळचा भाग. मग त्या प्रदेशावर वेगवेगळ्या संस्कृतीचा ठसा उमटणे स्वाभाविकच. पर्वतांच्या कुशीत वसलेले, निसर्गाच्या कृपेने नटलेसजलेले, फळाफुलांच्या रेलचेलीने बहरलेले. ' देवभूमी हिमाचल ' असे त्याचे वर्णन केले जाते. हिमाचल प्रदेश सरकरची ही घोषणा आहे. तेथील प्रत्येक बसवर हे वाक्य लिहिलेले आहे. आशा या दुर्गम प्रदेशात गिर्यारोहण करण्याची माझी मनापासून इच्छा होती आणि या वर्षी तसा योगही आला.


व्हाय.एच.ए.{ यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया } दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हिमालयातील " यांकर पास " ही मोहिम संघटित केली होती. पेपरमधे बातमी आल्याबरोबर मी, बाबा व माझी मैत्रीण अनुजा, आम्ही आमची नावं रजिस्टर केली. लगेच ट्रेकिंगची योजना मनात आकार घेऊ लागली. यावेळी मला ट्रेकिंगबरोबर जमलं तर एक मोठी ट्रीप ही  करायची होती.मला स्वतःला प्रवासाची, नवनवीन प्रदेश, तेथेल जनजीवन यांची माहिती करून घेण्याची खूप आवड आहे. या खेपेस संपूर्ण ट्रीपची जबाबदारी मी घ्यायची ठरवली. बाबांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला खरा, परंतु त्यांचं माझ्यावर आणि माझ्या योजनेवर पूर्ण नियंत्रण होतं.


या ट्रीपमधे कोणकोणते प्रदेश बघायचे पासून ट्रीपला येणारा खर्च इथपर्यंत सर्व काही मलाच ठरवायचं होतं. रोज उठून मला असं भारताचे नकाशे,हॉटेल्सची नावं,तेथील फोननंबर, रेल्वेची वेळापत्रकं पाहताना बघून आई वैतागायची पण मला त्यावेळी एकच ध्यास होता की ही ट्रीप यशस्वीपणे योजायची आणि पारही पाडायची.


त्यासाठी मी अनेक प्रवसवर्णन वाचली,तेथील माहिती शोधून काढली वेगवेगळ्या ठिकाणांची,अंतरांची माहिती मिळवली. मला सगळीकडेच जायची इच्छा होती. त्यामुळे मी बाबांना मुंबईहून वेगवेगळ्या टप्प्यांवरची ठिकाणे सांगत होते आणि ते संयुक्तिक कारणे देऊन खोडून काढत होते. पण त्यामुळे मला भारताचा संपूर्ण नकाशा पाठ झाला. अखेर आमचा मार्ग निश्चित झाला. मुंबईहून दिल्ली आणि दिल्लीहून पंजाबप्रांत. अमृतसरमधे सुवर्णमंदिर,वाघा बॉर्डर,जालियनवाला बाग पहायचं ठरवलं.परंतु अमृतसर ते मनाली हा जवळजवळ १८ ते २० तासांचा प्रवास  आहे. एवढं लांब गेल्यावर असा खडतर प्रवास करून थकून जाण्यापेक्षा वाटेत आणखी काय पाहता येईल, आणखी एक मुक्काम लांबवता येईल यासाठी पुन्हा एकदा आमची नकशामोहिम सुरू झाली.


येस, मला हवे असलेले टिकाण मिळाले, " धरमशाला ". येथे दलाईलामांची [तिबेटचे धर्मगुरू] मॉनेस्ट्री ( देऊळ ) आहे. तसेच त्यांचे निवासस्थान देखील आहे. मग ठरलं, धरमशाला येथे तिसरा मुक्काम.


प्रवासातील चौथ्या मुक्कामाविषयी तर मी आधीपासून प्लॅनिंग केले होते. हा मुक्काम मोहोल या गावी होता. हे गाव भुंथरच्या  ( जेथे भारतातील सर्वात उंचावरचा विमानतळ आहे ) जवळ आहे. अगदीच छोटेसे गाव आहे. पण येथे रिव्हरराफ्टिंगचे कॅम्प्स आहेत.


मोहोलहून पुढे आम्ही आमच्या ट्रेकिंगच्या बेसकँम्पवर जाणार होतो. कसोल या गावी बेसकॅम्प होता. भुंथरहून एक रस्ता मनालीकडे तर एक रस्ता कसोलहून मणीकर्णकडे जातो.


जिथे जमेल तिथे रहायचे ठरवल्याने कोणत्याही हॉटेअलचे बुकिंग केले नाही. खाण्याचे पदार्थ मात्र भरपूर घेतले. बाहेरचे खाणे कमीतकमी व्हावे यासाठी पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या,मेथीठेपले,चणेदाणे,काकडी,चकल्या इत्यादि. सामान घेण्यात आले. मी बाबांवर वैतागले, एक बॅग खायच्या सामानाची??? पण बाबांनी ऐकले नाही. पाणीच १०-१२ लीटर घेतले होते.


अशाप्रकारे सर्व तयारी, ट्रीपची योजना आखायला मला २ महिने लागले. माझी वार्षिक परीक्षा संपल्यावर आम्ही आता ट्रीपला जायला पूर्ण मोकळे होते.फक्त मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते अमृतसर आणि दिल्ली ते मुंबई एवढीच तिकीटे काढली.   


क्रमशः