आऽऽई! (भाग -२)

आऽऽई! (भाग - १) वरून पुढे चालू


स्वाती आणि वासूला घरात राहायला येऊन चांगले २-३ दिवस होऊन गेले होते. घरात येण्यापूर्वीच पेडणेकरांनी अंगणातील माजलेले तण कापून दिले. पंप कसा चालवायचा या बद्दल माहिती दिली. साफसफाई करायला पेडणेकरांनी नीलाबाईंना ठरवून दिले होते. स्वातीने नीलाबाई यायच्या आधीच घर वर वर झाडून पुसून स्वच्छ करून घेतले. त्यात आजच विशाखाने पाठवलेले सामान पोहचले. वासू ऑफिसला जायला लागला होता पण आज सामान येणार  म्हणून लवकर घरी आला होता. दोघे मिळून सामानाची लावालाव करत होते. स्वातीच्या पेंटीग्जच्या काही फ्रेम्स भिंतीवर लावायच्या असल्याने वासू हातोडा आणि खिळे घेऊन ठोक ठोक करत होता तर स्वाती बेडरूमच्या कपाटात कपडे लावत होती. तळकप्प्यांत थोडीशी धूळ असल्यासारखं वाटलं म्हणून ती ओला कपडा आणायला स्वयंपाकघरात आली आणि तिचा पाय पाण्यात पडला. बघते तो स्वयंपाकघराच्या दारात हे मोठं पाण्याच तळं.


"वासू ए वासू! तू पाणी पिऊन गेलास का रे? कित्ती सांडवून ठेवलं आहेस इथे पाणी? कामांत काम वाढवतो आहेस," स्वाती करवादली.
"मी कुठे यायला? ही हातोडी आणि हे खिळे माझ्या हातातच आहेत. ठोकाठोक ऐकते आहेस ना तू?"
"अरे मग इथे पाणी कस आलं? तळ साचलंय नुसतं. घरात तू आणि मी सोडून दुसरं कुणी आलंय का?"
"तूच पाडवलं असणार. वेंधळेपणाचा अर्क आहेस स्वाती तू. विसरली असशील पाडवलं आहेस ते."
"आता मात्र हद्द झाली. मी बेडरूम मध्ये होते. इथे आले ही नाही, या नीलाबाई येतील तर कामाला थोडा हातभार लागेल," वैतागून स्वातीने कपडा घेतला आणि सगळं पाणी पुसून काढलं. दारावरची बेल वाजली तशी स्वातीने उठून दरवाजा उघडला. बाहेर उभ्या असलेल्या बाई, नीलाबाईच असाव्यात हे ओळखून तिने विचारले, "पेडणेकरांनी पाठवलं ना तुम्हाला?"


"अं... हो! मी नीला. तुमच्याकडे काम आहे म्हणून पेडणेकर सायबांनी सांगितलं होतं म्हणून आले," नीला बाई तिशीच्या आसपास असाव्यात. बाई नीट नेटकी होती, चेहऱ्यावरून शालीन वाटत होती. बाईंची नजर मात्र काहीतरी शोधत होती. बोटांनी पदराशी चाळा सुरू होता. "या आत या!" स्वाती त्यांना घेऊन आत आली तरी बाईंची नजर काहीतरी धुंडाळतच होती. "मी दिवसातून एकदाच येईन. ती  ही सकाळीच. नंतर येणार नाही चालेल का ते सांगा," बाईंनी आपली बाजू स्पष्ट केली, "पेडणेकर सायबांचे खूप उपकार आहेत. त्यांचा शब्द मोडवला नाही म्हणून त्यांना हो म्हटलं नाहीतर...." बाई बोलता बोलता चपापल्यागत होऊन गप्प बसल्या.
"चालेल हो! सकाळी एकदाच या ११ च्या सुमारास, तेच बरं. चला तुम्हाला काम सांगते," अस म्हणून स्वाती बाईंना घेऊन आत गेली.


दुसऱ्या दिवशी वासू ऑफिसला गेल्यावर स्वातीने जाधवांच्या दुकानाला भेट द्यायचे ठरवले. नाहीतरी रोजच्या खाण्या पिण्याच्या बऱ्याच गोष्टी तिला खरेदी करायच्या होत्या. सकाळच्या वेळी दुकानात फारशी गर्दी नव्हती. गल्ल्यावर एक सफेद सदरा लेंग्यातले साठीच्या दरम्यानचे वृद्ध गृहस्थ नाणी मोजत बसले होते, अधे मध्ये नोकराला कोंकणीतून काही सूचनाही देत होते. बहुधा तेच जाधव असावेत अस समजून स्वातीने त्यांच्याजवळ जाऊन आपली ओळख करून दिली.


"अच्छा! तर खानोलकरांच्या बंगलीत आलात तुम्ही. पण पेडणेकर म्हणत होते की ते घर आता भाड्याने द्यायचे नाही म्हणून," थोड्याशा आश्चर्याने जाधव म्हणाले.
"आम्हाला नाही तसं काही बोलले. मला असेच घर हवे होते, शांत, समुद्राजवळचं. मी चित्रकार आहे, पेंटींग्ज बनवण्यासाठी चांगला मूड येईल या घरात," स्वाती हलकेसे हसून म्हणाली. तिने यादी जाधवांना दिली, त्याप्रमाणे त्यांनी सगळे सामान स्वातीला आणून दिले व बिल बनवायला घेतले.
"स्वाती ताई, तुम्हाला एक विचारू? काही वेगळं जाणवलं का हो घरात तुम्हाला?"
"वेगळं म्हणजे?"
"नाही काही नाही. सहजच विचारलं," अस म्हणून जाधवांनी बिल स्वातीला दिले. पैसे चुकते करून स्वातीने पिशव्या उचलल्या आणि ती घराच्या दिशेने चालू लागली. वाटेत तिने जाधवांच्या प्रश्नावर विचार केला पण हाताला फारसं काही गवसलं नाही तसा तिने तो विचार मनातून काढून टाकला.


घराचा दरवाजा उघडता उघडता स्वातीने टेलिफोनची रिंग ऐकली. हातातल्या पिशव्या तिथेच टाकून तिने आत जाऊन फोन उचलला व नेहमीच्या सवयीने "हॅलो" म्हटले. पलीकडून थोडीशी खरखर ऐकू आली तेवढीच. रॉंग नंबर असावा अस समजून ती रिसीव्हर खाली ठेवायला गेली आणि "आऽऽई, आई गं!"  अशी एक आर्त साद काळीज चिरून गेली. कावरी बावरी होऊन स्वातीने इथे तिथे पाहिले. आवाज फोनमधून आला की घरातून कळायला मार्ग नव्हता.


घराची कर्कश बेल वाजली तशी स्वाती एकदम दचकली. तिने जाऊन थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला, बाहेर नीलाबाईंना पाहून तिला हायसं वाटलं .
"काय झालं ताई? तुम्हाला बरं नाही का? असा चेहऱ्याचा रंग का उडालाय?" नीला बाईंनी काळजीने विचारले.
"नाही, बरंय सगळं. काम काढून ठेवली आहेत. करायला घ्या," स्वातीने मलूल आवाजात उत्तर दिलं आणि किराणा मालाचे सामान पिशवीतून एक एक करून काढायला सुरुवात केली.


संध्याकाळी वासू घरी येईपर्यंत स्वाती सगळा प्रकार विसरूनही गेली होती. दिवसभरात तिने आपला बोर्ड, रंग, ब्रशेस ठेवण्यासाठी वरच्या माळ्यावरच्या एका बेडरूम मध्ये खिडकीजवळची जागा शोधून काढली. खिडकीतून घरामागची हिरवी गर्द झाडी, शेवाळलेली विहीर, पत्र्याची छोटीशी पंपाची खोली, अंगण दिसत होतं, इथेच आपला मूड चांगला लागेल अशी तिची खात्री झाली तशी तिने सर्व वस्तू जागी मांडून ठेवल्या. वासू आल्यावर संध्याकाळ जेवण करण्यात, गप्पा टप्पा मारण्यात निघून गेली.


मध्यरात्री स्वातीला अचानक जाग आली. कुणीतरी अंगावरची चादर खेचत असावं. तिने डोकं वर करून इथे तिथे पाहिलं. खिडकीतून चंद्राचा शुभ्र प्रकाश डोकावत होता. खोलीत कुणीच नव्हत, पण चादर मात्र तिच्या अंगावरून खाली सरकली होती. दूरवर कुठेतरी कुत्रं रडत होतं आणि रातकिड्यांची किरकिर रात्रीच्या भयाणतेत भर घालत होती. खिडकी बाहेरच झाड उगीचच सळसळत होतं. स्वातीचा जीव घाबरा घुबरा झाला. तिने एका हाताने चादर घट्ट पकडली, दुसरा हात वासूच्या अंगावर टाकला आणि  डोळे गच्च मिटून घेतले.


-----


(क्रमशः)