आऽऽई! (भाग - १)

लेखन प्रकारः गूढ कथा


----------


वासुदेवने बाइक पार्क केली आणि लगबगीने तो घरात शिरला. "स्वाती ए स्वाती! कुठे आहेस तू? एक खुशखबर आहे."
"कसली खुशखबर? सांग तरी," स्वाती स्वयंपाक घरातून हात पुसत बाहेर आली.
"माझी बढती झाली. बॅंकेचा व्यवस्थापक म्हणून," वासुदेवने खुशीत येऊन स्वातीला घुसळत सांगितले.
"हो??? अरे वा, बॉस! अभिनंदन. मज्जा आहे बुवा! आता केबिन, स्टाफ आणि काय काय मिळणार असेल नाही."
"हो तर! पण बढती बरोबर बदली पण हातात पडलीये. मडगावला बदलीची ऑर्डर हाती आली आहे. आठवड्याभरात निघायला हवंय, घाई घाई होईल नाही गं," वासुदेवने हलकेच पिल्लू सोडले.
"अरेच्चा! एकदम मडगाव! गोवा!!. म्हणतोस काय वासू. गोव्याला जायला मी एका पायावर तयार आहे. तुला माहित्ये ना की गोवा मला किती आवडत आणि तिथे जाऊन पुढची काही वर्ष राहायचं म्हणजे खरंच मस्तच रे! तू काही काळजी करू नकोस. मी विशाखाला बोलावून घेते ना मदतीला. होईल सगळी व्यवस्था आठवड्यात," स्वातीने उत्साहाने सांगितले.
"अगं पण तुझे छंद?"
"चित्र ना अरे उलट मडगाव सारख्या ठिकाणी माझ्यातला चित्रकार अधिकच फुलून येईल. वासू, आपणना मडगावला एखादा छोटासा बंगला भाड्याने मिळतो का ते पाहूया. मला ना ऐसपैस घर असावं, घरासमोर छानशी बाग असावी अशी खूप दिवसांची इच्छा आहे रे. माझा वेळ मस्त जाईल अशा घरात आणि चित्रकाराला लागणारा एकांतही मिळेल," स्वातीचा उत्साह फसफसून वाहत होता.
वासुदेव आणि स्वातीच्या लग्नाला १० वर्षे उलटून गेली होती. दोघेही संसारात सुखी होते. पण संसाराच्या वेलीवर फूल उमलले नव्हते. स्वाती घरात लहान बाळाच्या येण्याला आसुसलेली होती. आपला वेळ आणि मन ती चित्रकारी करण्यात रमवत असे.  अशा गोष्टी आपल्या हातात नसतात हे समजून उमजून दोघेही एकमेकांना सांभाळून घेत.


"मी बघतो. बॅंकांना भाड्याने घरं देणारे काही एजंट असतात. मडगाव ब्रॅंचला संपर्क साधून काम होतंय का पाहतो."


-----


आठवड्या भराने स्वाती आणि वासुदेव मडगावला पोहोचले. एजंटला सांगून एक घर पाहून ठेवले होते. सगळं काही पसंत पडले की सामान मागाहून विशाखा; स्वातीची धाकटी बहीण पाठवणार होती. पेडणेकर नावाचे गृहस्थ इस्टेट एजंट म्हणून काम पाहत. बॅंकेतल्या अधिकाऱ्यांना लागणारी भाड्याची घरे पुरवायचे कामही ते करत. ठरवल्या प्रमाणे ते सकाळी १० वाजता स्वाती आणि वासूला घ्यायला त्यांच्या हॉटेलवर पोहोचले.


पेडणेकर अंदाजे ५०च्या आसपास असावेत. माणूस दिसायला सज्जन आणि मृदुभाषी होता. आपली गाडी घेऊन आला होता त्यामुळे घर पाहून पुन्हा हॉटेलवर यायची सोयही होणार होती. गाडी सुरू केल्यावर पेडणेकरांनी घराबद्दल थोडी माहिती द्यायला सुरुवात केली.


"छोटीशी एक मजली बंगली आहे बघा. खाली बैठकीची खोली, स्वयंपाकघर, एक बेडरूम आणि वरच्या मजल्यावर बाल्कनी आणि ३ बेडरूम आहेत. खानोलकरांच घर म्हणून सगळे ओळखतात. अंदाजे ३० एक वर्षांपूर्वी त्यांनी हे घर बांधलं, आता पती पत्नी दोघे वृद्ध झाले आहेत. गेल्या १० वर्षांपासून अमेरिकेला मुलाकडे राहतात. घर रिकामं नको म्हणून भाडेकरू ठेवतात. घराची जागा समुद्राजवळच आहे. भल्या पहाटे नाहीतर रात्री समुद्राची गाज सहज ऐकू येते. पूर्वी विहिरीचं पाणी वापरावे लागे, आता विहिरीवर पंप लावून पाणी खेळवलं आहे, नगर पालिकेचा नळही आहे पण त्याला दिवसातले थोडे तासच पाणी येतं."


बोलता बोलता पेडणेकरांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावली, "चला पोहोचलो आपण, घर पाहूया."


घर छान टुमदार दिसत होतं. घराबाहेर बऱ्यापैकी मोठं अंगण होतं पण त्याची निगा राखलेली दिसत नव्हती. तण माजलं होतं. झाडं सुकून गेली होती. स्वातीला क्षणभर उदास वाटलं, "कोण राहत होत इथे यापूर्वी?" तिने एक सहज प्रश्न केला.


"तसं घर भाड्याने देऊन ७-८ वर्षे झाली. सगळ्यात आधी एक कुटुंब राहायचं. ४ वर्षे राहिले आणि नंतर सोडून गेले. त्यानंतर एक दोन कुटुंब आली, गेली. फार काळ नाही राहिली. त्यानंतर गेले दोन एक वर्षे म्हात्रे नावाचा एक सडाफटिंग गृहस्थ इथे राहत होता. तो वासुदेव साहेबांच्या बॅंकेतच होता. त्याची हल्लीच मुंबईला बदली झाली. आता तो कुठे बाग राखणार? म्हणून हे सगळं असं उजाड दिसतंय एवढंच. बागेला पाणी घालायला नळ आहे इथे बाहेरच. चला घरात जाऊ," लगबगीने पेडणेकरांनी दरवाजा उघडला.


बाहेरच्या प्रखर सूर्यप्रकाशातून एकदम घरात शिरल्याने स्वातीच्या डोळ्यासमोर  अंधारल्यासारखं झालं. हळू हळू दृष्टी सरावली तसं घर नजरेत येऊ लागलं. बंद घरातला एक प्रकारचा कुबट वास सर्वांच्या नाकात भिनला. पेडणेकरांनी लगबगीने जाऊन खिडकी उघडली, "बंद होतं गेले थोडे दिवस. या माझ्याबरोबर. मी घर दाखवतो." आणखी एक-दोन खिडक्या त्यांनी उघडल्या.


स्वाती आणि वासूने सगळं घर फिरून पाहिले. घर प्रशस्त होतं. हवेशीर होत. पश्चिमेकडच्या खिडक्यांतून समुद्राचा खारा वारा येत होता. "या! स्वयंपाकघराच दार मागच्या अंगणात उघडतं. इथेच विहीर आणि पंप आहे. विहीर पूर्वी उघडी होती पण आता वरून झापडं लावून बंद केली आहे. पिण्याचा पाण्यासाठी नगरपालिकेचा नळ आणि इतर सगळ्या गरजांसाठी या विहिरीचं पाणी वर्षभर पुरून उरेल, " पेडणेकर माहिती देत म्हणाले. "इथून ७-८ मिनिटांच्या अंतरावर जाधवांच किराणा मालाच दुकान आहे. कसलंही सामान घरपोच करतील. आमच्या गोव्याची माणसं तशी सुशेगात. १० वाजता दुकान उघडतो लेकाचा. पण माणूस सज्जन. घरकाम करायला कुणी बाई हवी असेल तर तीही चौकशी मी करून ठेवतो. फोनच कनेक्शन आहेच त्यामुळे ती एक कटकट मिटली."


"स्वाती कसं वाटलं घर तुला? आवडलं तरच पुढची बोलणी करू." वासूने विचारलं.
"आवडलं रे! छानच आहे. हेच नक्की करूया."
"ठीक तर! चला इथून माझ्या कार्यालयात जाऊन राहिलेले सोपस्कार पूर्ण करू. स्वातीताई तुम्ही तेवढ्या खिडक्या दारं बंद कराल का?" पेडणेकरांनी विनंती केली.


स्वाती एक एक खिडकी बंद करत स्वयंपाकघराच्या मागच्या दरवाज्यापाशी पोहोचली. दरवाजा ओढून घेताना समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा थंडगार झोत एकदम आत आल्यासारखा वाटला आणि त्याच्याबरोबर दूरवरुन एक आर्त साद, "आऽऽऽई!" एक अनामिक शीरशीरी स्वातीच्या तळपायातून मस्तकाकडे गेली. कुणीतरी लहान मूल आईला साद घालत होतं. स्वातीच्या मनाला काहीतरी बोचल्यासारखं झालं. तिने निमूटपणे दरवाजा ओढून घेतला व ती वासू आणि पेडणेकरांबरोबर घराबाहेर पडली.


-----


(क्रमशः)