आऽऽई (शेवट)

आऽऽई (भाग - १)
आऽऽई (भाग - २)


घरात राहायला येऊन दोन आठवडे कसे उलटून गेले ते स्वातीला कळलंही नाही. ती आता घराला चांगलीच सरावली होती. पंप चालू करणे, बागेची निगा राखणे, झाडांना पाणी घालणे यासारखी कामे उत्साहाने करत होती. काही वेगळं घडलं तर घरात काहीतरी वावगं आहे की काय ही जाणीव तिला कधीतरी अस्वस्थ करायची, परंतु वाच्यता करावी  असं काहीच घडलं नव्हत. तसंही वासूला सांगावं तर तो वेड्यात काढेल की काय या भितीने ती गप्पच होती.


त्या दिवशी ढगाळून आलं होतं, उत्तर रात्री कधीतरी विजा चमकायला सुरुवात झाली होती. स्वातीला पहाटेच उठून पंप सुरू करावा लागे, त्यानुसार तिने मागचे दार उघडले आणि ती विहिरीपाशी असलेल्या पंपाजवळ आली. बाहेर मिट्ट काळोख होता, नेहमीच्या सवयीने टॉर्चच्या प्रकाशात तिने पंपाचा स्विच ऑन केला. अचानक बाजूच्या सुकलेल्या पानांवरून काहीतरी सळसळत गेल्याचा तिला भास झाला, तिने मान वळवून टॉर्चचा झोत इथे तिथे टाकला.


"कोण आहे?....कोण आहे? समोर का येत नाही?" एक एक पाऊल मागे जात तिने पुन्हा एकदा विचारले आणि घरात धूम ठोकली. दरवाजा बंद करून कडी घालताना तिला तो नेहमीचा आर्त आवाज ऐकू आला, "आई, ए आई! मी आहे, आत घे ना गं!"  तिच्या जीवाला थरथरल्यांसारखं झालं. तोच लहान मुलाचा परिचित रडवेला आवाज. 'हा काय प्रकार असावा?' ती धावतच वर गेली आणि पुन्हा चादरीत शिरली. वासूला उठवून सगळे सांगावे असा विचार मनात आला पण तिने तो तिथेच दूर सारला. वासूने ते हसण्यावारी नेले असते आणि संवाद येन केन प्रकारे आपल्याला मूल नसण्यावर येऊन ठेपला असता याची तिला खात्री होती. स्वातीला तोच जुना विषय उगाळायचा नव्हता.


सकाळी नीलाबाई आल्यावर तिने त्यांना छेडलं. झाल्या प्रकाराबद्दल सांगितले. ऐकून नीलाबाईंचा चेहरा कावरा बावरा होऊन गेला. 'नाही हो माहीत मला असं काही' असं म्हणून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. दुपारच्या नीरव शांततेत स्वातीने नव्या कॅनव्हासवर सरावाच्या रेघोट्या मारायला सुरुवात केली. हात चालत असताना तिचे स्वत:शीच विचार सुरू होते.  'कुणाच मूल असेल? का मला त्याचा आवाज ऐकू येतो? ते आईला पारखं झालेलं असावं का? त्याच्या हाकेला ओ द्यावी का?' नानाविध प्रश्नांनी तिच्याभोवती फेर धरला होता.


संध्याकाळ व्हायला आली तशी ऊन्ह भरभर उतरायला लागली. मधनचं वाऱ्याची सळसळ आणि भरतीच्या लाटांचा आवाज गूढ शांततेचा भंग करत होता. अचानक खाली तळमजल्यावर कुणाची तरी चाहूल लागल्याचा भास झाला. स्वातीच्या काळजात कुठेतरी चर्र झालं. ती हातातला ब्रश टाकून जिना उतरून खाली गेली. बैठकीची खोली रिकामी होती. सगळं काही आलबेल होतं. स्वातीने सुटकेचा सुस्कारा सोडला. ती पुन्हा वर जायला मागे वळली तोच तिच्या पायाला पाण्याचा थंडगार स्पर्श झाला. पायऱ्यांवरून पाण्याचे ओघळ वाहत होते. स्वाती नखशिखान्त शहारून गेली. कुठेतरी पळून जावं की काय असा विचार क्षणभर तिच्या मनात आला न आला, त्याक्षणी तिला जाणवलं वर जिन्यात कुणीतरी बसलं होतं.


चौथ्या पाचव्या पायरीवर, सात आठ वर्षांच्या मुलाची एक कृश आकृती अंगाचं मुटकुळं करून मुसमुसत होती. स्वातीला दरदरून घाम फुटला, तिच्या पायांतलं त्राण निघून गेलं. "आई," त्याने डोकं वर केलं. पांढऱ्या फटक चेहऱ्यावरच्या दोन पांढऱ्या सफेत डोळ्यांकडे पाहताना स्वातीच्या सगळ्या चेतना गोठून गेल्या. समोरची आकृती उठून स्वातीच्या समोर आली. "आई, मी आहे पिंटू. का गं सोडून गेलीस मला?" रडवेल्या आवाजात पिंटू विचारत होता, "किती वाट पाहिली मी तुझी. आता नाही नं सोडून जाणार तू मला. नाही जाऊ देणार मी तुला, कध्धी नाही." पिंटूने स्वातीचा हात आपल्या कृश हातांनी गच्च पकडला. त्या थंडगार, ओलसर, लिबलिबीत स्पर्शाने स्वातीच्या सर्वांगातून एक कळ शीरशीरत गेली आणि ती जागीच वेडीवाकडी कोसळली.


-----


वासूला यायला आज थोडा उशीरच झाला होता. वाटेत काही घ्यायला म्हणून जाधवांच्या दुकानात गेला, तिथे अचानक बराच वेळ निघून गेल्यावर त्याला एकदम बाहेर झुंजूमुंजू व्हायला लागल्याची जाणीव झाली तसा तो धावत पळत घरच्या रस्त्याला लागला. घर नजरेच्या टप्प्यात आलं तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की घरात मिट्ट काळोख आहे. त्याने लगबगीने चावीने दरवाजा उघडला आणि खटाखट दिव्यांची बटणे दाबली. बैठकीची खोली प्रकाशाने उजळून गेली. समोर जिन्याजवळ स्वाती अस्ताव्यस्त पडली होती. 
ते पाहून वासू धावत तिच्या जवळ गेला, "स्वाती, काय झालं? अशी कशी पडलीस?" अस म्हणत त्याने स्वातीला गदगदा हालवले. पाणी आणून तोंडावर मारले तसे स्वातीने डोळे उघडले. तिचे डोळे भकास होते. "काय झालं स्वाती तुला?" अस विचारत वासूने तिला उठायला मदत केली आणि सोफ्यावर बसवले. "वासू, कुणीतरी आहे रे या घरांत. मी..मी पाहिलं त्याला. त्याचा स्पर्श अनुभवला."


"हे बघ! आपण वर जाऊ. पड थोडावेळ तुला बरं वाटत नसेल तर. तुला काहीतरी सांगायचं आहे मला," वासूने स्वातीला आधार देऊन वर नेले आणि पलंगावर बसवले.
"मी येताना जाधवांच्या दुकानात गेलो होतो. त्यांनी एक विलक्षण गोष्ट सांगितली, ती आधी तुला सांगतो. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी खानोलकरांनी हे घर भाड्याने दिले तेंव्हा एक कुटुंब इथे राहायला आले. त्या कुटुंबात ३-४ वर्षांचा एक लहान मुलगा होता; पिंटू. पुढची काही वर्षे अगदी सुरळीत गेली आणि एक दिवस दुर्दैवाने खेळता खेळता विहिरीत पडलेला बॉल काढायच्या निमित्ताने पिंटू पाय घसरून विहिरीत पडला. त्याची आई घरात एकटी होती,  तिला पिंटूला वेळेत बाहेर काढता आले नाही. मदत येईपर्यंत खूपच उशीर झाला होता. पिंटूला वाचवता आले नाही. या प्रकाराची हाय खाऊन ते कुटुंब घर सोडून निघून गेले. त्यानंतर आलेल्या एक दोन कुटुंबातील स्त्रियांना या घरात काहीतरी वेगळं असल्याची जाणीव झाली तशी घाबरून त्यांनी लगोलग घर बदलले. त्यानंतर गेली दोन वर्षे येथे म्हात्रे राहत होता आणि त्याला मात्र असा वावगा अनुभव कधीच आला नाही. तेंव्हा असे प्रकार थांबले असावेत किंवा केवळ अफवा असाव्यात अशी सर्वांची खात्री झाली. एकंदरीत मी गोष्ट ऐकली ना, तेंव्हा फारसा विश्वास ठेवला नाही पण हा घरी आलो तर तू मला पुन्हा पिंटूची गोष्ट सांगते आहेस. मला वाटत या घरात राहण्यात अर्थ नाही. मी उद्याच जाऊन पेडणेकरांना धारेवर धरतो."


"नाही रे वासू! ते प्रकार थांबले नव्हते. पिंटू इथेच होता असणार, याच घरांत. त्याला आई हवी आहे. म्हात्रे मध्ये आई कशी मिळणार होती त्याला म्हणून म्हात्रेला काही जाणवलं नाही पण आपण आलो तशी पुन्हा पिंटूने उचल खाल्ली आहे. त्याला आई हवी आहे रे, वासू. आईच्या प्रेमाचं भुकेलं आहे ते पोरगं," स्वाती स्वतःशीच बोलल्यागत पुटपुटली.

"काय बोलते आहेस स्वाती? ते मूल नाही. भास आहे... एक जीवघेणा भास. तुझ्यातली आई इतकी वेडी आहे का की सत्य आणि भास यातला फरक ओळखू शकत नाही? शुद्ध वेडे विचार आहेत तुझ्या आसुसलेल्या डोक्यात. ते काही नाही, आपण उद्याच इथून निघूया. या घरात राहायचं नाही, हा माझा ठाम निर्णय आहे. तू पड थोडावेळ आणि फार विचार करू नकोस."


वासू उठला आणि बाल्कनीत जाऊन येरझारा घालू लागला. स्वातीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. "आऽऽऽई!" या हाकेतली आर्तता तिच्या हृदयाला पिळवटून गेली होती पण वासू म्हणत होता ते सत्य होतं. 'आपल्या आयुष्यात मूल यावं ते ही अशा मार्गाने?' स्वातीला हुंदका आवरला नाही. तिने स्वत:ला पलंगावर झोकून दिलं आणि उशीत तोंड लपवलं.


किती वेळ गेला कुणास ठाऊक? अचानक बाहेरून धप्प असा काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि सोबत वासूची कर्णबधिर किंचाळी. स्वाती धावत धावत बाल्कनीत गेली. रस्त्यावरच्या मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश बागेत पडला होता. तिने पाहिलं वासू खाली डोक्यावर पडला होता. रक्ताचा पाट त्याच्या डोक्याशेजारून वाहत होता. ते पाहून स्वाती थरथरायला लागली तरीही कशीबशी धावत जिन्याच्या दिशेने गेली आणि त्राण निघून गेल्यासारखी मटकन खाली बसली.


जिन्याच्या शेवटच्या पायरीवर पिंटू उभा होता. जिन्यातल्या दिव्याचा पिवळाधम्मक प्रकाश त्याच्या पांढऱ्या फटक शरीरावर पडला होता, "तो माणूस तुला घेऊन जाणार होता ना, आई पण बघ! मी आता तुला इथून अजिबात जायला देणार नाही, कुणी तुला घेऊन जायला लागलं तर सगळ्यांचं असंच करेन." पिंटू छद्मी हसत एक एक पायरी वर चढत होता. स्वातीच्या तोंडातून शब्द ही फुटला नाही. "मी ढकललं त्याला. आता कुणी माझ्या आईला माझ्यापासून दूर नेणार नाही," पिंटूचे पांढरे फटक डोळे अचानक चमकून गेले. "आऽई!" म्हणून पिंटूने स्वातीचे हात आपल्या हातात घेतले.


का कुणास ठाऊक तो थंडगार लिबलिबीत स्पर्श स्वातीला या वेळेस परका वाटला नाही. तिने हळूच आपला हात पिंटूच्या पाठीवर ठेवला आणि त्याला जवळ ओढले. पिंटूनेही तिच्या गळ्याला गच्च मिठी मारली.


(समाप्त)