आबांच्या डे केअर चा एक दिवस

मल्हार झोपेत हसत असतो, गोल गोल फिरतो, लोळत असतो. हे लोळणे अगदी संथ असते. आकाश-गंगेच्या मध्या भोवती सूर्य जसा फिरतो तसेच !


सूर्य उगवल्यावर आबांचे 'आरवणे' सुरू होते. मै आऊ? ( म्यॅ आ ऊ !! ) थोडी हाल-चाल होते, पुन्हा रावसाहेब  निद्राधीन! नंतर आबा पुन्हा हाकारतात. 'भू भू ~ ~ ~ भु भू भू भू'! तरी रावांचा पत्ता नाही. आपल्याच निद्रा-नादात. शेवटी आबा नाद सोडतात. डोळ्यावर चष्मा चढवून पेपर मध्ये डोके घालतात. ५ मिनिटे होत नाही तो नव्याच्या नवलाईने जगाकडे पहात रावसाहेब सर्व घर भर फिरतात. मग आबांची विचारणं होते. 'ऊठ्लाक्का?' रावसाहेब  ते! दाद दिलीच पाहिजे असे नाही. पण आई मात्र दिसलीच पाहिजे.आई दिसली तर आणि तरच पृथ्वी व्यवस्थित फिरते. सर्व जग ठिकाणी आहे ह्याची खात्री! आई!आई!! करीत मल्हार आईभोवती घुटमळतो. आई त्याला ब्रश देते. मग छोट्या दातांचे ब्रशिंग चालू होते.नंतर गुळणीचा धडा! मग मल्हारचा पुकारा," आई दुदू! " आई त्याला दुधाचा जार देते. त्या जारला कान नसतात पण शिंगे असतात. (अहो! अमेरिकेत आधीच लहान मुलांना अळ्या ,किडे, ऑक्टोपस, मासे,बेडके, ससे, मांजरे, कुत्रे, अस्वले इ. भोवती घुटमळत ठेवलेले. कुठलीही गोष्ट सरळ नाही.अन सरळसरळ नाही.विष्णुगुप्त शर्मा उर्फ आर्य चाणक्य याने हेवा करावा इतके हे डिस्न्यांचे जग सुंदर आहे.त्यामुळे दुधाच्या जारला शिंगे बसवली असावीत.) मल्हार दुधाचा जार पकडून भुभूची(एक मोठा सॉफ्ट टॉय)उशी करून दूध पितो. दूध प्यायल्यावर मग आबांकडे मोर्चा! खुणेनेच "चष्मा काढा"असा पुकारा.आबांचे बोट पकडून 'अप' अशी आज्ञा होते.(अहो! माझे साहेब मला नेहमी म्हणायचे,"राजहट्ट, स्त्रीहट्ट,व बालहट्ट यापुढे शहाणपण नाही." इथे तर आबापुढे 'ग्रेट्बालहट्ट'! खरेच शहाणपण चालत नाही.) मल्हार आबांना टॉय लायब्ररीत घेऊन जातो. तेथे अतुलबाबांनी तंबू उभा केला आहे. एक बेबी तंबू! मग आबा अंग आखडून त्या तंबूत जातात. निरनिराळी खेळणी हाताळणे सुरू होते. तेवढ्यात आई मल्हारला तंबूतून बाहेर काढते व टबात नेते. टबातदेखील मुलाभोवती डक (बदके) ए, बी, सी, डी, इ. फोमची कट आऊटस त्याचेभोवती तरंगत असतात. स्नान झाल्यावर डायपर लावणे हा एक विधी! हे एक महाकर्म कठीण काम! हसवत, खेळवत, लाडीगोडीत हा विधी पार पाडायचा असतो.आईबाबांचा हा प्रांत! आबा ह्या परीक्षेत एकदम नापास! डाव्या कमरेकडील बाजू बंद करून उजवीकडील बाजू बंद करायला गेलो तर डावी बाजू रावसाहेब मोकळी करतात.असाच प्रकार चड्डी व बूट मोजे घालण्याबाबतही! एकदा आबांनी जबरदस्तीने डायपर लावायचा(हसवत,खेळवत, लाडीगोडी इ. सर्व मार्ग संपल्यावर) प्रयत्न केला. अहो! पृथ्वी आकाश एक झाले. इथे आबांना एक मोठा भोपळा मिळाला! यशोदेचे काम फार सोपे होते हो! कमरेला एक वस्त्र गाठ मारुन बांधले की कृष्णराव एकदम यमुनेकाठी! यशोदेचे काम फारच सोपे व श्रीधर कवीला प्रतिभेला धक्के देण्याचे कामच नाही. डायपर ते बूट घालणे हा प्रवास संपल्यावर (हा प्रवास आईकडून होतो.) डे केअर पर्यंत नेणे हा एक महत्वाचा कार्यक्रम! हसत,खेळत,रडतखेळत                 
लाडीगोडीत घेत घेत आई(बाबा)त्याला डे केअर मध्ये नेतात. येथे आबांचा चिमणी डे मग केअर वर्ग संपतो व मॅडमचा डेकेअर वर्ग सुरू होतो.


पुन्हा ५// वाजता आबांचा डेकेअर वर्ग सुरू होतो. साडेपाच वाजता आजी आबा मल्हारला घ्यायला जातात. मल्हार त्याचे दप्तर आजीच्या हातात व बूट्मोजे (उन्हाळ्यात सॅंडल्स) आबांच्या हातात! दीडदोन वर्षाच्या मुलाच्या दप्तरात काय असेल? एक दुधाचा जार ,डायपर, शी-शू झाल्यावर लावायची लोशन्स इ. . जिना उतरून झाल्यावर पायी जायचा मल्हारचा आग्रह! डेकेअर ते घर हे अंतर मोठयांच्या पावलात मोजले तर १०० पावलेसुध्दा होणार नाहीत.मल्हारच्या बाबतीत हे अंतर फार मोठे! जसे डोळे व कान यात फार महदंतर आहे असे म्हणतात तसे! चिखलातून कमळाकडे जसा प्रवास तसेच हे! लहान मुलांना एका चार भिंतीतून दुस~या चार भिंतीत जाण्यात स्वारस्य नसते.त्यांना आस असते ती मुक्त गगनाची! डेकेअरपासून जो प्रवास सुरू होतो तो हसत खेळत, रमतगमत, धावतपळत, नाचतबागडत, मुक्तछंदात पळतपळत!! मग चिमणी कुठे लपली? खारूताई कशी पळाली? बदक कसे पोहते? सायप्रसकोनचा आकार ह्याची जिज्ञासा! मध्येच टेनिस रॅकेटचा 'ठॅक' असा आवाज काढणार.मध्येच विमान दाखवणार! अशा त~ हेने प्रवास करीत घराच्या जिन्याजवळ आलो की स्वारी एकदम यू टर्न करणार व मुक्तछंदी पळणे सुरू होते.कडेवर घेऊन घरी न्यावे तर स्वारी एकदम भुईसपाट! युक्त्या प्रयुक्त्या लाडीगोडी करून त्यास घरी आणावे लागते. कधी कधी पुष्पक विमानाने आणावे लागते. (म्हणजे आबांच्या कोप~यापासून तळव्यापर्यंतहाताने मल्हारला पालथे घ्यायचे व त्याने पंख[हात] पसरायचेव आबांनी घुर्रऽऽ घुर्रऽऽ आवाज करीत जाणे म्हणजे पुष्पक विमान!) घरी आलेवर डोक्यात खेळण्याचे विचार.बॅट बॉलफूट्बॉल  लपंडाव इ. खेळ सुरू होतात.आई अतुलबाबा कामावरून आले की सर्वांचा डेकेअर वर्ग सुरू होतो.तो रात्री अकरापर्यंत! मधूनमधून छोटी छोटी पझल्स सोडवणे, कविता म्हणणे, गोष्टी सांगणे इ. कार्यक्रम होतात. पण झोपेचे नाव नाही.आपण जागे तर राव जागे! मग माकडाच्या गोष्टी,झटपट रामायण इति कथाकथनहोते. तरीही राव झोपत नाही. इथेही आबा नापास! शेवटी अंधार करून आईबाबांच्या बेडरूममधील प्लॅनिटोरियममधील ग्रह तारे पहात पहात हे रावसाहेब झोपी जातात.घर शांत होते.आजी आजोबांचा डेकेअर वर्ग संपतो."अ चाइल्ड इज फादर ऑफ अ मॅन" असे म्हणतात. कुणास ठाऊक! पण शुअर्ली अ चाईल्ड इज अ टीचर ऑफ अ मॅन!   


       ---अमेरिकेतील भारतीय ज्येष्ठ नागरीकांसाठी असलेल्या उच्च(वयीन) शिक्षणासाठी दाखल झालेल्या वर्गातील एक आ(जो)बा.