माझा हात..
माझ्या मनगटात आहे जोर
माझं हृदय..
माझ्या हृदयात आहे एक शांत आकाश.
माझ्या हातात
कधी कोवळा चिमुकला हात,
आणि हृदयात बोबड्या बोलांची स्पन्दनं..
कधी नाजूक लांब बोटं गुंफतो एक हात
बांगड्यांचा किणकिणाट हृदयात..
कधी हात बनतो काठी,
सुरकुतलेल्या, अशक्त हातातली.
अनंताच्या पायवाटेवरील टकटक हृदयात....
हृदयाचं आकश होतं स्पन्दनं साठवताना
हात जेव्हाही हृदयावर पडतो, आवाज उमटतो,
" तत त्वम असि, तो तूच आहेस,
सत्य, शिव, सुन्दर तुझ्यातच आहे."
माझा हात..
माझ्या हातावर आहेत रेषा
माझं हृदय..
माझ्या हृदयात आहेत शुध्द, अशुद्ध रक्त
वाहणा-या नळ्या...
माझ्या हातातल्या रेषा नेहमीच भिडतात कपाळावरच्या रेषांना,
भविष्यातील चिंतेचा मजकूर माझ्या हृदयात...
"यावज्जीवं सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत,
जगायाचं तर आहे , कर्ज काढून तूप प्यावं,
तूप कशाला दारु प्यावी."
माझ्या हातात जेव्हा मद्याचा प्याला येतो,
परागकणांएवढ्या असतात चिंता
अन देहाची फुलपाखरं होतात.
बोटाच्या पेरांवर असतात म्हणे शंख, चक्र, पद्म,
माझ्या बोटांवर किलवर, इस्पिक, चौकट,बदाम
हातात जेव्हा जेव्हा बदाम एक्का येतो,
हृदयाला एकटेपणाची जाणीव होते.
--------