...मी साधू झालो !



दिवस आता कलायला लागला होता. तपोवनातल्या सेक्‍टर दोन मधून भटकत होतो. जी गोष्ट घडायला हवी होती तिला अजून तरी काही अवकाश होता. त्यामुळे मी नाराज होतो. सकाळपासून तो संपूर्ण परिसर पालथा घातला होता. काही कामे झाली परंतु महत्त्वाची गोष्ट राहूनच गेलेली होती. आजच करायला हवी. नाही केली तर आपण कुठलेच काम करण्याच्या लायकीचे उरणार नाही, अशा टोकाच्या भूमिकेवर आलो होतो. तपोवन आता बऱ्यापैकी भरले होते. दूरवरून लोकांचे डेरे पडत होते. काही ठिकाणी मंडप, राहुट्या उभारणीचे काम सुरु होते तर काही ठिकाणी ते पूर्ण झाले होते. पूर्णत: अनोळखी माणसांनी हा भाग भरुन गेला होता. मध्येच कुठेतरी राम- कृष्णाचा उच्चार करणाऱ्या रेकॉर्डस्‌ ऐकू येत. पुढील काही दिवसांत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचे ते वातावरण होते. (नाशिकमध्ये 2 वर्षांपूर्वी तो पार पडला.) कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू काही दिवस आधीच नाशकातील तपोवनात येऊन डेरेदाखल होत होते. त्याचेच हे दृश्‍य होते.

मला नक्की काय शोधायचे होते? तर एखाद्या साधूचा आखाडा. थेट साधूंबरोबरच राहायचे आणि त्यांची दैनंदिनी जवळून बघायची आणि त्यावर लिहायचे काम मला पार पाडायचे होते. कुंभमेळ्याच्या दृष्टीने बहुतेक गोष्टींची माहिती मी आधीच मिळविली होती. मात्र आता मी जे काही करायला जाणार होतो ते थोडे अवघड काम होते. पत्रकार म्हणून नाही तर सर्वसामान्य माणूस किंवा भक्त म्हणून मला साधूंच्या गोटात वावरावे लागणार होते. त्यासाठी माझी मूळ ओळख दडवून ठेवावी लागणार होती. त्यापोटी काही संकटे आणि त्रासांनाही सामोरे जावे लागण्याची शक्‍यता होती. तर अशा अनेक विचारांच्या तंद्रीत मी भटकत होतो. सेक्‍टर दोन-ए च्या मुख्य रस्त्यावरच बाजूला मोटरसायकल पार्क करून आतील छोट्या गल्ल्यांमध्ये असलेल्या साधूंच्या आखाड्यांतून फेरफटका मारावा असा विचार केला. मुख्य रस्ता ओलांडून उजव्या बाजूच्या नव्याने तयार केलेल्या तात्पुरत्या गल्लीत बळलो.

साधूंना राहूट्या उभारण्यासाठी प्रशासनातर्फे ठरावीक आकारमानाचे प्लॉट्‌स पुरविण्यात आले होते. प्रत्येक प्लॉटमध्ये 24 पाण्याचे नळ, शौचालय, बाथरुम, 24 वीजपुरवठा अशी सोय होती. तर अशा या गल्लीच्या कोपऱ्यालाच एका बड्या मंडपाचे काम सुरु होते. कुण्या बड्या साधूसाठी ती असावी. त्याच्या शेजारीच दुसऱ्या एका प्लॉटवर दोन तीन तंबू घातलेले होते. या आखाड्याचा साधू गरिब असावा बिचारा असा मनात विचार आला. त्या तंबूबाहेर एका खाटेवर एक वृद्ध आणि कृश साधू बसलेला होता. त्याच्या जोडीला आणखी एक तसाच थकलेला म्हातारा साधू बसलेला होता. कुठल्यातरी विषयांवर गप्पा चालल्या होत्या. मला कुठल्याही आखाड्यात केवळ प्रवेश हवा होता. सहजच म्हणून मी या तंबूसमोर घुटमळलो. खाटेवर बसलेल्या म्हाताऱ्या साधूच्या माझे अस्तित्व लक्षात आले असावे. त्याने मला जवळ बोलावून घेतले. मीही गेलो. औपचारिकता पाळत नमस्कार वगैरे केला -- मी येथे जवळच राहतो. दर्शनासाठी आलोय. मेळा बघतोय -- वगैरे माहिती त्याला पुरविली. त्यानेही थोड्याफार चौकशा केल्या. माझ्या मनात मात्र या माणसाला पटवून याठिकाणी प्रवेश कसा मिळवता येईल याचे विचार सुरू होते.

आमचे बोलणे सुरु असताना मध्येच पाण्याचा आवाज ऐकू येत होता. बाजूला असणाऱ्या पत्र्याच्या बाथरुममध्ये कोणी साधू आंघोळ करत असावा असे वाटले. पण बराच वेळ मोठ्याने तो आवाज येत राहिला. आवाजाने मी अस्वस्थ होत होतो. एवढे पाणी उगाचच नासल्या जातेय याची ती अस्वस्थता होती. न राहवून त्या साधूला विचारले. कुणी आंघोळ करतोय का आत? त्यावर आतील नळ खराब झालाय आणि म्हणून हे पाणी वाया जातेय असे त्याने सांगितले. नक्की काय प्रकार आहे हे मी प्रत्यक्ष बघायचे ठरविले. तेथे असे दृश्‍य दिसले बाथरुममध्ये पाण्यासाठी एक पाईपलाईन पुरविण्यात आली होती. त्या पाईपलाईनलाईनलाच दोन-दोन फूट अंतरावर सहा नळ जोडण्यात आले होते. ते नळच गळून पडले होते. आणि त्यातून पाणी वाहत होते. ते दुरुस्त करण्यासाठी बाजूलाच असलेल्या तात्पुरत्या कार्यालयातून महानगरपालिकेच्या प्लंबरना बोलवावे लागणार होते. आधीच कुंभमेळ्यातील कामांच्या दर्जाविषयी माध्यमांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यात अशा प्रकारचे कामचलावू काम बघून बातमीसाठी पुन्हा एक विषय मिळणार होता.

"तुम्ही काही तक्रार केली का याविषयी? ' मी त्या म्हाताऱ्याला विचारले. " केली होती पण कुणी आले नाही अजून', त्याचे उत्तर. त्याचे हे उत्तर ऐकून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविषयी मला प्रचंड राग आला आणि मी बघून येतो, काय ते ! असे त्याला सांगून मी बाहेर पडलो. बाहेर आल्यावर रस्त्यावर एक ओळखीचा नगरसेवक भेटला. त्याला हे सांगितले, वर या ठिकाणी बरीच पत्रकार मंडळी फिरताहेत तेव्हा लवकर काय ते करा असा हळूवार दमही दिला. " कुठल्या सेक्‍टरमध्ये येतो रे तो प्लॉट ?' बरोबर असलेल्या एकाला त्याने दरडावले. सेक्‍टरचे नांव सांगितल्यावर बाजूच्याने तिथे तर आपलेच कॉन्ट्रॅक्‍ट आहे, अशी अभावितपणे माहिती पुरविली. अच्छा म्हणजे असे उद्योग चालतात तर या राजकारण्यांचे, कुंभमेळ्याचे कंत्राट आपल्याच नावावर आणि त्यातही घोटाळा, असा विचार मनात आला. मला सोयीस्कररित्या कटविण्यासाठी मग त्या नगरसेवकाने कोणाला तरी पाठवितो असे चाचरत आश्‍वासन दिले.

पडत्या फळाचे आश्‍वासन घेऊन पुन्हा साधूच्या आखाड्यात गेलो. आता सायंकाळ झाली होती आणि तासाभरातच अंधार पडेल अशी स्थिती होती. वाट बघूनही त्या नगरसेवक कम्‌ कंत्राटदाराचा माणूस आला नाही. इकडे पाणी बरेच वाया चालले होते. शेवटी न राहवून मी त्या म्हाताऱ्याला म्हणालो की मीच तो नळ बसविण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मला कल्पना नव्हती की अजून काही वेळातच माझ्या आयुष्यात एक अनोखा प्रसंग घडणार होता आणि त्यानंतर पुढील काही काळ आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून जाणार होती. त्याने संमती दिली आणि मी पुढच्या दुरुस्तीच्या कामाला लागलो.

बाथरुममधून पाणी बऱ्यापैकी दाबाने बाहेर पडत होते. एक शॉवरच तयार झाला होता तेथे. अशा स्थितीत काम केले तर कपडे ओले होणार यात शंकाच नाही. शर्ट ओला होऊ नये म्हणून तो काढून टाकावा असा मी विचार केला आणि शर्ट काढून जवळच्या एका दोरीवर ठेवला. पण अनुभवी साधूने सांगितले की शर्ट काढला पण पॅंटचे काय तीही ओली होणार? इतकेच काय तर आतील कपडेही बदलावे लागणार होते. माझ्याकडे तर बदलण्यासाठी कपडे असण्याचे कारणच नव्हते. शेवटी साधूने त्याच्याकडे असलेली भगवी लुंगी मला बदली वस्त्र म्हणून दिली. माझ्या अंगावर असलेला एकूण एक कपडा काढून मी ती भगवी लुंगी परिधान केली.

नळ दुरुस्त करत असताना प्रचंड भिजलो. पाण्याचा दाब माझ्या प्रयत्नांना दाद देत नव्हता. शेवटी जवळ असलेल्या लाकडी काठ्यांचा वापर करुन दोन नळ मी कायमचे बंदच केले आणि उरलेले दोन कसेबसे बसविण्यात मी एकदाचा यशस्वी झालो. साधारणपणे तासभर माझी ही खटपट चालली या काळात माझ्या नेसलेल्या लुंगीसह डोक्‍यापासून पायापर्यंत मी संपूर्ण भिजलो होतो. भगवे वस्त्र परिधान करुन थंड पाण्याचे एक बळजबरीचे स्नान कुंभमेळ्यापूर्वीच मला घडले होते. पावसाळ्याचे ते दिवस असल्याने आणि त्यात रात्रही झाल्यामुळे हवेतील गारठा वाढला होता अन्‌ मीही पुरता गारठला होतो.

गेले तासभर मी नळ दुरुस्तीचे काम करत होतो. त्या कामात इतका बुडालो की बाजूच्या जगाचाही मला विसर पडला होता. काम पूर्ण झाल्यावर प्रथमच जाणवले की आपण भगव्या कपड्यांमध्ये आहोत. माझ्या जवळच्या सर्व गोष्टींचा या आधीच मी त्याग केलेला होता. भगव्या लुंगीचा तो प्रताप होता असे सांगण्यासारखा मी काही अंधश्रद्धाळू किंवा अतिश्रद्धाळू नाही. माझी श्रद्धा मर्यादीत आहे. पण तरीही त्यावेळी एक मजेशीर विचार मनात येऊन गेला तो म्हणजे मी साधू झालो असल्याचा. अगदी काही क्षणासाठी का होईना मी साधू झालो होतो आणि माझ्या अंगावर केवळ एक भगवी लुंगी होती. असो.

माझी गारठलेली अवस्था बघून, अंग पुसण्यासाठी त्या म्हाताऱ्याने एक पंचा दिला. अर्थात तोही भगवाच होता. माझ्या या छोट्याशा कामाचे त्याला फारच कौतुक वाटले. त्याने तसे बोलूनही दाखवले. त्याच वेळी बाजारासाठी गेलेली त्या आखाड्यातील इतर काही मंडळी परत आली. त्या मंडळींबरोबरच एक वयस्कर पण भारदस्त साधू होता. त्याने पांढरे कपडे परिधान केलेले होते. तोच होता या आखाड्याचा मुख्य महंत. अजूनही मी लुंगीवरच होतो. मला बधून त्याने, ये बालक कौन है? अशी विचारणा केली. त्यावर " ये बालक तो बहुत पराक्रमी है ', असे आधीच्या म्हाताऱ्याने उत्तर दिले अन्‌ मग मी नळ कसा दुरुस्त केला वगैरे गोष्ट सांगितली. आता या मुख्य महंतालाही माझ्याविषयी थोडी आपुलकी वाटायला लागली होती. त्याचा आवाजही तसा थोडा प्रेमळच होता. मग त्याने घाईने कोणालातरी धुनी पेटवायला सांगितली आणि मग मला म्हणाला की, "थोडा सेक लो, ठंड चली जायेगी '. भल्या मोठ्या कडुनिंबाचा ओंडका पेटवून धुनी केली होती. ? मी शेकत होतो. बरोबरच्या माणसांच्या प्रश्‍नांना उत्तरे देत होतो.

दुसरीकडे त्याच धुनीवर साधूचा एक भक्त चहा उकळत होता. मला चहाही देण्यात आला. बिनदुधाचा चहा होता पण चव मात्र वेगळी होती त्याची. चहाबरोबरच लिंबू, मीठ व साखर त्यात घातलेली होती. मला हुशारी आली. माझे कपडे मी पुन्हा चढविले. ज्या म्हाताऱ्या साधूने मला लुंगी नेसायला दिली होती, तो साधू या आखाड्याच्या महंताकडे पाहुणा आलेला होता. दुसऱ्या दिवशी त्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला जगन्नाथ पुरीला जायचे होते. मी सोडतो तुम्हाला स्टेशनवर असे मी कबूल केले.

या एका घटनेमुळे माझा आखाड्यातला प्रवेश सुकर झाला होता आणि साधूंबरोबर राहून त्यांची दैनंदिनी टिपण्याच्या मुलखावेगळ्या पत्रकारितेची संधी मला लाभणार होती. हा एकच दिवस माझ्या पत्रकारिलेला आणि वैयक्तिक आयुष्याला वळण देणारा ठरेल याची कल्पनाही मला नव्हती. पुढे मी केवळ एक नाही तर तब्बल दोन महिने त्या साधूबरोबर वावरलो. अनेकदा मी घर सोडून इथेच जेवायला आणि मुक्कामालाही राहिलो.

हा संपूर्ण कुंभमेलाच माझ्या कायमस्वरुपी आठवणीत राहील असा होता. त्याविषयी लिहीले तर खूप विस्तार होईल. ( त्याविषयी लिहिणारच आहे मी नंतर !) पण तरीही हा कुंभमेळ्यातला पहिला दिवस माझ्या मनावर कायमचा कोरलेला आहे. कारण काही क्षणापुरता का होईना सर्व जगाला विसरुन मी साधू झालो होतो ही भावना मला उगाचच सुखावून जाते.