मुंबईतील गणपती

मुंबईला एव्हढा मोठा समुद्र लाभल्याने इथे मोठमोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. अर्थातच दर वर्षी नवीन मूर्ती तीही नव्या अवतारात किंवा रूपात बसवली जाते. नुकतेच तात्यांच्या लालबागेच्या राजाच्या लेखातील केवळ_विशेष यांनी दिलेल्या या दुव्यावरील छायाचित्रे पाहिली. प्रत्येक वर्षी हाच 'राजा' वेगवेगळ्या रूपात दिसतो. कधी उभा तर कधी बसलेला, कधी सिंहासनावर तर कधी कमळात, कधी फेटा तर कधी मुकुट. सर्वसाधारणपणे आपल्याला गणपतीचे एखादे रूप आवडते आणि गणपती म्हटल्यावर तेच रूप आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. निदान माझी तरी अशी समजूत आहे. आमच्या घरीही गणपती बसविताना पितांबर नेसलेली आसनावर बसून एकच पाय खाली सोडलेली एक ठराविक रूपातीलच मूर्तीच दर वर्षी बसविली जाते. कदाचित इतरांच्या घरीही असे असू शकेल. असा आपला माझा अंदाज.


पुणेकरांच्या बाबतीत बोलायचे झाले तर गणपती म्हटल्यावर काहींना दगडूशेठ चा गणपती डोळ्यासमोर येतो तर काहींना कसबा तर काहींना मंडईचा गणेश-शारदा इ. पण मुंबईकरांच्या बाबतीत एक सिद्धिविनायक सोडला तर दुसरे कुठले रूप डोळ्यासमोर येते ? कारण प्रत्येक गणपती दर वर्षी रूप पालटतो. तसेच मला असा भाबडा प्रश्न पडला आहे की जर मुंबईकरांना डोळे मिटून 'राजाचे' स्मरण करायला सांगितले किंवा काहीही माहिती न देता समोर १० मूर्ती उभ्या केल्या तर त्यातली नेमकी 'राजाची' मूर्ती ओळखायला सांगितली तर ओळखू शकतील ?? तसेच दर वर्षी रूप बदलणाऱ्या गणपतीबाबत 'आपलेपणा' वाटतो ?? 


राजा केवळ उदाहरणादाखल घेतला आहे