वाग्वैजंयती- "समसमां संयोग की जाहला!"




"समसमां संयोग की जाहला!"
    -कृष्णशास्त्री चिपळूणकर

[अशी फुले नेहमी सापडत नाहीत म्हणूनच जगातले ग्रामोफोन कविहृदयाच्या नालायकीची गाणी गात असतात.]

[ शार्दूलविक्रीडित ]

संध्याकाळ सदा उदास करितो माझ्या उदासी मना
त्याने हर्षति जीवमात्र, परि तो मातेंच दे यातना
नित्याचा क्रम एक हा ठरविला कीं काळ जायाप्रती
कोठेही तरि शून्यवृत्ति फिरुनी, येणे घरा मागुती १


येता एक दिनी असेच, दिसली वेली कुठेशी मला
होती काहि फुले तिच्यावर-मना आनंद तैं वाटला
घ्यावी काढुनि दोन तीन म्हणुनी जो जीव माझा भुले
वारा वाहुनिया जरा-भरभरा सारी उडाली फुले २

वेलीची नव्हती फुले- तिजवरी होती कुणी टाकिली
(प्रेमाचे शुकपाठ बोलत नटी, ते आठवे त्या स्थली)
काही त्यातुनी घेतली उचलुनी, चालावया लागलो
"यांचे काय करू" विचार करिता हा मी परी भागलो ३


कोणी मित्र मला पुढे भटकता वाटेमधे भेटला
प्रेमे ओढुनिया स्वकीय सदनी तो शीघ्र नेई मला
माझे स्वागत तो करी बहुपरी खेदास न्याया लया
ग्रामोफोनहि लावला; रिझवि ते गाणे मना माझिया ४

त्या गाण्यांतिल शब्दसंघ पडला होता मनासारखा
गाणाराहि गळा किती मधुर तो लोकीच या पारखा
अर्थाने तर वेड लागत मना; उत्कर्ष झाला रसा
नाही एकच तेवढे हृदय ते; हा खेळ दैवा! कसा ५


ग्रामोफोनवरी तेव्हा संतोषे जीव हर्षतां
फुले ती टाकुनी होई 'गोविंदाग्रज' चालता ६