वाग्वैजयंती— वाचकांस विज्ञापन

वाचकांस विज्ञापन

[ शार्दूलविक्रीडित ]
जे जे ज्या समयी मनात भरले स्वच्छंद नानास्थळी,
ते ते त्या समयी जपून धरिता ही होय गंगाजळी!
मित्रा! ही कविता – न गद्य – इजला निर्बंध कैसा बरे?
सारे हे मनि आणुनी मग धरी "वाग्वैजयंती" करे !

[ वसंततिलका ]
प्रेमें सख्या, धरि हिला हृदयी सदाही,
दे टाकुनी; तुडवि ही अथवा पदांहीं !
मातें दशा समचि या गमतात दोन्ही
माझी मलाच लखलाभ सदा असो ही !



तडजोड*
[ शार्दूलविक्रीडित ]
एका एक कधी जसे दिसतसे स्वाती विकारांतरे,
अन्या ते न दिसे तसेच; असते ज्यांचे तयातें खरे !
चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट कां हेका धरावा मग ?
एका शून्य जगी दिसे तरि दिसे शून्यांत अन्या जग



* गोविंदाग्रजाशी ज्यांचा विचारभेद होईल त्यांना या तडजोडीने समाधान वाटायला काय हरकत आहे ?

— राम गणेश गडकरी