कालची रात्र संपेचना
तेंव्हा कळलं की
नाराज सूर्यदेवांनी या प्रदेशाचा दौराच रद्द केला आहे!
त्यांची समजूत काढायला
गाड्या भरून शिष्टमंडळे रवाना होत होती तेंव्हा
तू मात्र रानोमाळ हिंडून जमविलेल्या काटक्यांची शेकोटी पेटवलीस
आणि दिलेस जगाच्या दोन चार कोपऱ्यांना उजेड आणि उब दोन्ही!
आता आणखी काटक्या गोळ्या करायचे
तुझे कष्ट मात्र संपलेत!
कारण तुझी कुचेष्टा करणाऱ्यांची आणि तुझे पोवाडे गाणाऱ्यांनी
पेटवून दिली आहेत एकमेकांची घरे
व त्या ज्वाळांनी आता जगात
भरपूर उजेड आणि उबही झालीय....
(आणि सूर्यदेवही निघाले आहेतच दंगलग्रस्त भागाची
पहाणी करायला.)
(जयन्ता५२)