हलकेच घ्या !!!

ग्रामिण भागात एक समज आहे की सर्प दंश करण्याआधी त्या जागेवर फुंकर घालून मगच दंश करतो. खरे खोटे अर्थातच माहीत नाही. पण मला तर 'हलकेच घ्या' (ह. घ्या.) ह्या शब्दाचा वापर अनेकदा या फुंकर मारल्या प्रमाणेच दिसतो. कविता, गद्यलेखन, चर्चा अहो इतकेच काय चक्क पाककृतीतही याचा शिरकाव काहीवेळा दिसतो. तेव्हा आपल्या परंपरेला धरुन हलकेच घ्या !!!


मिळो प्रतिसाद भला-बुरा
लिहा कविता भराभरा
हफ्त्याला शंभर अवघ्या
हलके घ्या भाई हलके घ्या !



गद्यलेखनी लिहू धडे
संदेश देऊ बडे बडे
साथ कृतीची द्या न द्या
हलके घ्या भाई हलके घ्या !


मागे राहू नका कुणी
चला काढू या उणी-दुणी
चर्चेत राहू नका बघ्या
हलके घ्या भाई हलके घ्या !


पाककृतीच्या  चढाओढीला
ऊत आणू या शिळ्या कढीला
वदनी कवळ सुखे घ्या
हलके घ्या भाई हलके घ्या !


टीका होणारच बाबा
वाघ म्हणा की वाघोबा
का न म्हणावे मग वाघ्या ?
हलके घ्या भाई हलके घ्या !



कशास धरून बसता डूख
खेळण्यामधले घ्या रे सुख
दोन द्या अन् दोन घ्या
हलके घ्या भाई हलके घ्या !


                                             ---अभिजित पापळकर