जुनी कथा आठवली वाटले सगळ्यांना आनंद मिळावा...म्हणुन हा प्रपंच
एका गावात एक मारवाडी रहात होता. व्यवसायातून बरीच संपत्ती त्याने जमा केली होती.
पण अगदी चिक्कू मारवाडी म्हणतात ना तसाच होता. एक दमडी सुध्दा त्याच्या हातुन सुटत नसे.
येवढा श्रीमंत असुन देखील तो दु:खी होता. कारण एकच, त्याच्या संसारात कमी होती ती एका चिमुकल्याची. त्याने बरेच उपाय करून बघितले, अनेक डॉक्टर, वैद्य झाले. देव झाले. पण काही फ़रक नव्हता.
असाच एकदा तो दु:खी चेहऱ्याने बसला असताना, त्याचा एक मित्र तिथे आला. म्हणाला काय झाले? असा का चेहरा करून बसलायस...
मारवाडी : अरे नेहमीचेच. तुला माहीतच आहे, सगळं असुन नसल्यासारखं आहे बघ. घराला घरपण नाही...
मित्र म्हणला, मला एक नवीन माहीती मिळाली. तुला पटले तर बघ.
मारवाडी अधिरतेने विचारू लागला...
मित्र: मी नुकताच एका देवाला गेलो होतो. अगदी जागृत आहे. मनातली इच्छा पूर्ण होते.
मारवाडी एकदम खुष झाला. आणि आपण लगेच जाउ असे मित्राला म्हणाला.
मित्र : पण तुला त्यासाठी थोडे पैसे खर्च करावे लागतील.
हम्म्म, पैसे खर्च होणार म्हटल्या बरोबर मारवाड्याचा चेहरा पडला. पण मुल हवे म्हटल्यावर काही तरी करायलाच हवे, म्हणुन मग तो अनिच्छेने तयार झाला. आणि म्हणाला सांग काय करावे लागेल ?
मित्र: आपण दोघे मिळुन त्या ठिकाणी जाऊ. एक काम कर. मंदिरात देवाजवळा जायचे. डोळे मिटुन शांत मनाने तुला जे हवे ते मागायचे. आणि मग त्याबदल्यात तू देवासाठी काय अर्पण करणार ते तिथे बोल. म्हणजेच देवाला नवस बोल.
मारवाडी: अरे पण काय अर्पण करायचे?
मित्र: तुला जे शक्य असेल ते. काहीच सुचत नसेल तर पैसे ठेव ना!
पुन्हा गाडी आडली ती याच जागी, "पैसे"!
मारवाडी म्हणाला ठीक आहे, आपण उद्याच जाऊन येवू.
दुसऱ्या दिवशी दोघेजण मंदीरात गेले. मारवाड्याने देवाला नवस केला. तो म्हणला मला मुल होऊ देत. माझ्याकडे एक चांगली म्हैस आहे. भरपूर दूध देते. ती विकुन जे पैसे येतील ते मी तुला अर्पण करेन.
कालांतराने मारवाड्याच्या घरी एक मुल जन्माला आले. त्याला खूप आनंद झाला.
आता वेळ होती, बोललेला नवस पूर्ण करायची.
मारवाड्याला चैन पडेना. आता येवढी चांगली म्हैस विकायची.आणि किंमत पण चांगली येईल तिची. किमान १००० तरी नक्कीच. येवढे पैसे असेच देवा पुढे ठेवायचे मारवाड्याच्या जीवावर आले होते.
आता नवस पूर्ण तर केला पाहीजे पण येवढे पैसे जाणार ... त्याने बराच विचार केला. देवाला कसे गंडवणार?! पण काहीच उपाय सापडेना.
नाखुषीनेच दुस~या दिवशी तो म्हैस घेऊन बाजारात जायला निघाला. जाताना वाटेत त्याला एक मस्त कोंबडा इकडे तिकडे फ़िरताना दिसला. लगेच याची बत्ती पेटली. त्याने कोंबड्याच्या मालकाकडुन कोंबडा अगदी किरकोळ मध्ये विकत घेतला.
मारवाडी आता बाजारात आला. आणि मोठमोठ्याने ओरडू लागला, "१०० रूपयाला म्हैस! १०० रूपयाला म्हैस !!"
सगळे लोक एकदम त्याच्या भोवती जमा झाले. एवढी चांगली म्हैस फ़क्त १०० रुपयात!!
बरीच गर्दी बघुन मारवाडी खुष झाला.
पैसे देवून म्हैस घ्यायची लोकांमध्येच गडबड चालू झाली. पण तेवढ्यात मारवाडी म्हणला, अशी एकटी म्हैस नाही विकायची मला. अजुन एक कोंबडा पण आहे. जोडी (म्हैस नी कोंबडा) विकायची मला.
जो कोणी हा कोंबडा १००० रूपयाला घेईल त्यालाच मी, ही म्हैस विकणार.
हे ऐकून लोक जरा मागे सरले. म्हणे येवढ्याशा कोंबड्याचे १००० रूपये? मारवाड्याला वेड लागले की काय?
पण मारवाडी काही केल्या ऐकेना. तेवढ्यात अजुन एक गिहाईक तेथे आले. त्याने सौदा नीट ऐकला. आणि जाणले की मारवाड्याचा यात नक्की काहीतरी डाव असणार. पण एकूण किंमत बघितली तर जोडी काही महाग नाही पडत. घ्यायला काही हरकत नाही.
झाले, त्याने मारवाड्याला सगळे पैसे दिले.
मारवाडी एकदम खुष झाला.
तसाच तो मंदीरात गेला. देवासमोर उभा राहीला. अगदी भोळे भाव आणुन देवाला म्हणाला, देवा, मी तुझे किती आभार मानू. तु माझी मनोकामना पूर्ण केलीस.
आता बोलल्या प्रमाणे, मी माझा नवस पण पूर्ण करतो.
देवा मी म्हटले होते, माझी एक खूप चांगली म्हैस आहे, ती विकून जे पैसे येतील ते मी तुला अर्पण करेन. देवा मी आता सरळ बाजारातूनच येतोय. आताच मी म्हैस विकली. हे त्याचे सगळे पैसे, असे म्हणुन त्याने, देवासमोर १०० रूपये ठेवले आणि देवाला नमस्कार करून बाहेर पडला, याच आनंदात की नवस पण पूर्ण केला नी पैसे पण वाचवले....
--सचिन