प्रिय चिन्मयी,
अनेक आशीर्वाद.
तू
आईला पाठवलेले पत्र
वाचले. तू मराठीत पत्र लिहितेस आणि मराठी शुद्धलेखनाबाबत कळकळ बाळगणारी
जान्हवीसारखी मैत्रिणी तुला लाभली आहे, हे कळले. आश्चर्य वाटले. आनंद
झाला. ही हुजूरपागेतली दिसते. तुझ्यासारखीच भलतीच साधी आणि विनम्र.
जान्हवीला सांगावे मराठीत 'भिती' आणि 'भीती' दोन्ही योग्य. असो. बाकी तुझे
पत्र चुरचुरीत आहे. आईला 'बोअरिंग' म्हणालीस त्याच दमात 'हाउ
स्टुपिड'देखील म्हणून टाकायचे होतेस. कित्ती मज्जा आली असती.
आणि हो, हे चिकन आणि बिकन खाणे बंद कर. आधीच तुमच्या घरी रक्तदाबाची,
हृदयविकाराची हिस्टरी. म्हणून तू आतापासून काळजी घ्यायला हवी. तो पंजाबी तेजिंदर
तुला जुमानणारा नाही. पिऊन-खाऊन तो मरणारच आहे. त्याला मरू दे. पण तू फिट
राहत जा. तेजिंदरने त्याचा विमा केला असेलच. पण तू फिगर मेंटेन
कर.तीच खरी पॉलिसी. तीच तुला नंतर साथ देणार आहे. तेव्हा एक कर, सुर्व्यांची
कविता पाठ कर. दर दोन महिन्यांनी किमान एकदा तिला मोठमोठ्याने वाचत जा. तुझ्या आगामी फाइवस्टार वैधव्याला उदात्ततेचे परिमाण लाभेल बघ.
तसेच, जान्हवीला जीएंनी वेड लावले आहे असे तुझी आई सांगत होती. जान्हवीला
सांगावे जीए वाचून उगाच भावविभोर होत जाऊ नकोस. व्यवहारी बन. सकाळात प्रूफ़रीडरची नोकरी आहे. तिची इच्छा असल्यास बोलता येईल.
बाकी ठीक.
तुझा आगाऊ,
टीकूमामा