प्रिय आईस,

प्रिय आईस,
अगं, घरच्याघरी पत्रं लिहायचं कोठून सुचलं तुला मध्येच? तरी तुला सांगत होते की मराठी मालिका बघत जाऊ नकोस म्हणून! तरी बरं, गेल्या आठवड्यात तू हिंदी मालिका बघत नाहीस म्हणून कुणीतरी तुझं कौतुक केलं होतं. अगं पण म्हणून काय लगेच 'साने बाई' व्हायचं?


आणि आई प्लीज, आता परत ती 'बाबा गेले तेंव्हा...' ची सीडी नको गं लावू! मी पार बोअर झालेय बघ ती ऐकून. लहानपणापासून  कुठही गेलं की आजी आपली सुरु व्हायची 'सूनबाई आमची धीराची. चिनू एवढीशी होती...' अगं, दोन वर्षाची मुलगी एवढीशीच असणार! मी तुझ्याएवढी कशी होईन? (तरी तू वाळ्येअस हो हल्ली!)

आणि तो मंगळसूत्राचा तर आजीचा मला मेलोड्रामाच वाटतो. व.पु. फॉर्मात होते गं तेंव्हा. तुला आठवतं ना आजी सारखी त्यांच्या दिवाळी अंकातल्या कथांमधली 'वैजू, जीवन हे वरणभातासारखं असतं. सुखाचा भात तर दु:खाचं वरण...' असली फालतू वाक्यं वाचून टिपंबिपं गाळायची. त्यावेळी कुठल्या तरी कादंबरीत सासूच्या मॉडर्नपणाची ही  फ्याशन आली होती. आणि तू तर आई, पहिल्यापासून जराशी हीच. तू अगदी भारावूनबिरावून गेलीस!

आणि त्या श्रीकांतकाकाचं नको सांगूस मला काही. तुला कळू न देता आजीकडून घेतलेले पन्नास हजार रुपये परत दे म्हणावं आधी. आणि हो, तू लग्नाबिग्नाचं म्हणत्येयस खरी, पण बरा झालाय का तो? काहीतरी अवघड दुखण्यावर कुठेशी ट्रीटमेंट घेत होता म्हणे तो. बघ हो ते सगळं जरा व्यवस्थीत, आणि त्याच्या ऑफिसमधल्या नाडगौडा बाईंशी काहीतरी भानगड होती म्हणे. त्यानं स्वतःचं लग्न जुळवायच्या खटपटी केल्या, एकदोन ठिकाणी जुळतपण आलं होतं, पण त्या नाडगौडा बाईंनी तिथं जाऊन तमाशा केला.... काहीतरी कानावर आलं होतं. नाहीतर तो कसला लग्नाशिवाय रहायला!
हो, आणि करायचंच असेल तुला लग्न तर माझी परवानगी गं कशाला? तेजिंदरशी मी सहा महिन्यापूर्वी लग्न केलं तेंव्हा मी घेतली होती का तुझी? तुला तर खुळे माहीतपण नाही अजून.   

आई, तुझं ना काहीतरी बिनसलंय हल्ली. अगं, चांगली तुला सांगून बाहेर पडले की आमचं प्रोजेक्ट अगदी नरड्याशी आलंय, मी आता सरळ सोमवारी सकाळीच येईन. तर तुझे सत्राशे फोन काय, आणि आता हे पत्र काय... आई, अगं मी काम करू, की तुझी अशी तूप-मधातली पत्रं वाचत बसू? कमाल करतेस तू आई. गंमत म्हणून जान्हवीला तुझं पत्र दाखवलं तर म्हणाली कशी, कसली गं लेखिका तुझी आई, 'भीती' मधली 'भी' पहिली का दुसरी हेही माहिती नाही तिला!


तेंव्हा प्लीज आई, नको गं बोअर करू. सोमवारी सकाळी येत्येय मी. तेजीपण येतोय बरोबर. काहीतरी मस्त चिकनबिकन  करून ठेव. आणि त्या केबलवाल्याला सांग, पुढच्या महिन्यापासून कनेक्शन नको म्हणावं.
तुझी,


चिन्मयी