थांब थांब थांब जरा
पारिजातका,
ओंजळीत विसावून
स्फूट ऐक ना..
मंद मंद मोही गंध
शांत प्रहरी होशी धुंद
झुळूकेवरी बैसूनी तू
बरसशी घरा..
अल्लड अन् शुभ्र कांती
नाजूक ती रक्त पाती
कोमलता कणकणात
मावू पाही ना..
वेचूदे तुला हळूच
शुभ्र आणि टवटवीत
माळीन मी स्वहस्ते
प्रभूच्या गळा..
प्रसन्नता अन् सुगंध
देण्यासच घेशी जन्म
निस्पृह तव हरिभक्ती
माझी प्रेरणा..
असशी जरी दिनभंगूर
हरिसेवे परितत्पर
हरिसम तू पूजनीय
घेई वंदना..