ह्यासोबत
अमेरिकेतील हॅलोवीन: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील दुकाने हॅलोवीनच्या विविध साहित्यसामुग्रीने भरलेली असतात. यांत नानाविध आकारांचे भोपळे, भोपळ्याच्या आकाराचे प्लॅस्टिकचे कंदील, भयानक मुखवटे व वेष, हॅलोवीनची शुभेच्छापत्रे, आणि या सणाला साजेशा वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया यांचा समावेश असतो. तसेच घराच्या सुशोभीकरणासाठी बनावट वटवाघुळे, काळ्या मांजरी, कोळी आणि कोळिष्टके, हाडांचे सापळे अशा अनेक भयप्रद गोष्टी विकायला ठेवतात. या सर्व गोष्टींचे रंग शिशिर ऋतूच्या रंगांशी मिळतेजुळते असतात. जसे, काळा, केशरी, जांभळा, लाल व हिरवा. या काळात घराघरांतून भोपळ्यांची खरेदी होते. 'पंपकिन पीकिंग' म्हणजे भोपळ्याच्या शेतात जाऊन आपल्याला हव्या त्या आकाराचे भोपळेही खरेदी करता येतात. कुटुंबातील सर्व व्यक्ती मिळून लहान भोपळे रंगवतात तर मोठे भोपळे कोरून पोकळ करतात. अमेरिकेत या सणाला धार्मिक महत्त्व नाही.

३१ तारखेच्या संध्याकाळी ड्रॅक्युला, फ्रॅन्केस्टाईन, ईजिप्शियन ममीज, गॉबलिन्स या खलनायकांप्रमाणे किंवा पऱ्या, राजकुमाऱ्या, परीकथांतील नायक इ. प्रमाणे वेषांतर केलेली लहान मुले जवळपासच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावतात व "ट्रिक ऑर ट्रीट" असे ओरडतात. यजमानांनी सहसा "ट्रीट" असे म्हणून या मुलांजवळ असलेल्या छोट्या प्लॅस्टिकच्या बादल्यांमध्ये मिठाया टाकायचा रिवाज आहे.(ट्रिक म्हटले असता मुले यजमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात.) बाजूच्या चित्रात 'ट्रिक ऑर ट्रीटिंग' साठी निघालेले एक लहानसे भूत दिसते आहे.
अमेरिकन कुटुंबात या दिवशीची संध्याकाळ एखादा भयप्रद सिनेमा पाहण्यात, भयकथांचे मोठ्याने वाचन करण्यात किंवा एकमेकांना भयप्रद किस्से सांगण्यात व्यतीत करण्यात येते. या दिवसांत झपाटलेले वाडे, भूतबंगले, स्मशाने यांची सफर या सारख्या भयप्रद मनोरंजनाच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. सर्व कुटुंबीय मिळून अशा कार्यक्रमाचा आस्वाद लुटतात.
गेल्या काही वर्षांपासून आपल्या भारतीय सणांबरोबरच या अमेरिकन सणांची मजा लुटण्याचा आनंद आम्ही घेत आहोत. या मागची भावना इतकीच की आपल्या सभोवतीचे जग आनंदी असेल तर आपणही त्यात सहभागी व्हावे. या महिन्यात आतापर्यंत खास सिनसिनाटीला जाऊन आम्ही एका भयोत्सवाचा आनंद घेतला आहे. घरात अद्याप भोपळा यायचा आहे; पण त्यावर कोणता मुखवटा कोरायचा यावर विचार कधीच सुरू झाले आहेत. अमेरिका व ब्रिटनमधील सर्व मनोगतींना माझ्याकडून हॅलोवीनच्या शुभेच्छा!
ऑक्टोबरच्या महिन्यात फ्रायडे द १३थ आल्याने, पाश्चात्य जगात दुर्भागी समजला जाणरा हा दिवस हॅलोवीनच्या सणाला एक आगळीच झिलई देतो. भयोत्सवाच्या तिसऱ्या भागात या मुहूर्तावर एक भयकथा टाकत आहे.
(क्रमशः)