सांज

सावल्याही लांबल्या, जवळी जरा ये साजणी
आपल्यासाठीच अस्ताला निघाला दिनमणी

सांज आली, देह व्योमाचा पुन्हा शृंगारला
कोर चंद्राची कपाळी, तारकांचा तनमणी

अंबराचा सोनचाफा संधिकाली उमलला
नाहली रश्मीत मुग्धा हेमकांती चांदणी

रात्र झाली तरुण अन् गगनासही आला पदर
ल्यायले आकाशगंगेच्या जरीची पैठणी

सांगता साऱ्या सुखांची होऊ दे रात्रीत ह्या
फार केली जीवनी मी वंचनांची मोजणी

घाव जो देऊन गेली दोन वाक्यातून ती
लागला वर्मी न इतका एकही समरांगणी

"भृंग मज विसरून जा अन् शोध दुसरी पंकजा
उपवनी दुसऱ्या असे उदईक माझी रोपणी"