ही सुद्धा आपली नेहमीचीच गोष्ट आहे बरं! पण थोडीशी नव्या वळणाची.
एक टोपीवाला आपल्या पेटीत बर्याच टोप्या घेऊन शहराकडे टोप्या विकायला निघाला होता. दुदैवाची गोष्ट ही होती की त्याच्याकडे त्या पेटीला लावायला कुलूप काही नव्हते. टोपीवाल्याच्या गावापासून शहरात जाण्यासाठी एक किर्र जंगल पार करावं लागे. त्याच्या आईने सकाळी त्याला भूकलाडू बांधून दिले आणि तो डोक्यावर पेटी घेऊन निघाला.
झपाझप चालत त्याने अर्ध्याहून अधिक रान पार केले देखील पण सूर्य डोक्यावर आला होता आणि त्याला भूकही लागली होती. टोपीवाल्याने जराशी ठीकठाक जागा पाहिली आणि तो भल्यामोठ्या वडाच्या झाडाखाली विसावला. आईनी दिलेले भूकलाडू खाल्ले आणि जवळच्या फिरकीच्या तांब्यातलं पाणी पिऊन आपल्या टोपीने वारा घेत घेत असताना त्याला कधी झोप लागली कळलं देखील नाही.
जरा वेळानी त्याला माकडांचा हुप्प हुप्प आवाज आला. डोळे किलकिले करुन पहातो तो काय?पेटी उघडी. पेटीतल्या सगळ्या टोप्या गायब. तो खडबडून जागा झाला. झाडावर बसलेल्या प्रत्येक माकडाने टोपी घातली होती. त्याला लगेच त्याच्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. त्याने आपली टोपी जमिनीवर फेकली. पण एकही माकड आपली टोपी उतरवून फेकेना. त्याला मोठं आश्चर्य वाटलं. तितक्यात एक माकड त्याच्याकडे आलं आणि म्हणालं '' तुला काय वाटलं आजोबा काय तुला एकट्यालाच आहेत?'' आता मात्र टोपीवाला गडबडला. दोनपाच मिनिटं त्याला काही सुचेना. इतक्यात त्याला एक युक्ती सुचली. सगळी माकडं त्याच्याकडे लक्ष देऊन पहात होती. टोपी वाल्याने आपला दू:खी मूड बदलला त्याने आपल्या चेहर्यावर बेफिकिरीचा आव आणला.
त्याने पेटी खेचत खेचत जरा मोकळ्या जागेत आणली आणि उघडून ठेवली. पेटी पासून दहा पावलं मोजून लांब गेला आणि त्या रिकाम्या पेटीत आपली टोपी फेकण्याचा प्रयत्न केला. एक दोन प्रयत्नां नंतर टोपी पेटीत पडलेली पाहून तो खूष झाला, त्याने स्वत:साठी टाळ्या वाजवल्या. आता माकडांना या खेळात मजा येऊ लागली. प्रत्येक माकड आपल्या डोक्यावरची टोपी पेटीत टाकण्याचा प्रयत्न करु लागले आणि टोपी पेटीत पडताच टोपीवाल्यासारखे टाळ्या वाजवून इतरांचा खेळ पहात लांब जाऊन बसू लागले. करता करता सगळ्या टोप्या आपसूक पेटीत जमा झाल्या, आणि असे होताच टोपी वाल्याने पेटी बंद केली आणि माकडांना मजेत हात हलवत भरभर शहराच्या दिशेने निघाला.
तात्पर्य- तुम्हीच काढा बरं!!!