मी मजेत आहे

(या कवितेचा कवी कोण हे  मला माहित नाही. ती मी कुठे वाचली हे ही आठवत नाही. कविता आवडल्याने मी तिचे भाषान्तर करून ठेवले. मनोगतींसाठी सादर करीत आहे.)


वय बरंच झालंय तरी  मी अगदी मजेत आहे.


संधीवाताने मी जखडलोय, बोलताना श्वास अडकतोय


नाडी झलिय मंद आणि रक्त कोमट आहे


पण माझ्या वयाच्या मानाने मी अगदी मजेत आहे. . .


म्हातारपण म्हणजे मजा, (असं काही लोक म्हणतात)


पण झोपताना मात्र मला काही प्रश्न पडतात.


माझी काठी कोपय्रात, कपात माझे दात.


कान माझे ड्रॉवर मधे आणि डोळे कपाटात.


झोप लागता लागता मात्र मधेच मी दचकून जाय


आणखी एखादा पार्ट माझा ठेवायचा राहिला की काय ?


रोज सकाळी मी उठतो, मनावरची धूळ झटकतो


रोजचा ताजा पेपर सर्वात आधी उघडतो.


शोकसमाचारामधे माझे नाव नसते


मी जिवंत असल्याची मज डब्बल खात्री पटते.


मग वळतो किचनकडे आणि करतो भक्कम नाश्ता,


कधि किंचित पापही करतो 'वियाग्रा' ची साथ असता.


अगदीच टिपेत नसले तरी गाणे लयीत आहे,


माझ्या वयाच्या मानाने मी अगदी मजेत आहे.......