बेल्जियम कहाणी -५

        बेल्जियम कहाणी ४


          अशा रितीने पहिला दिवस सरल्यावर माझी शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाली. जुनेच विषय आता मला फ़्रेंच मधून फ़ार नवे वाटू लागले. कंटाळवाणे फ़्रेंचचे तास, हवा- हवासा वाटणारा इंग्रजीचा तास आणि सर्वांप्रमाणेच मला आवडणारा मोकळा{off} तास; ज्यात फ़्रेंच मिश्रित इंग्रजीतल्या गप्पा यात १ महिना कसा निघून गेला कळलेही नाही. मलाही शाळा नकोशी झाली. अर्धी शाळा असलेला बुधवार आणि weekends आवडू लागले. अशा दिवसांचे बेल्जियन लोकांप्रमाणेच मीही कार्यक्रम आखू लागले.


           त्यातलाच एक weekend मी पायल बरोबर घालवला. जो आनंदातही गेला आणि एक थरारक {आता विचार केला तर गमतीदारही वाटेल...}अनुभव देऊन गेला. थांबा! थांबा! असेच म्हणत असाल ना! ही पायल कोण हाच प्रश्ण ना? सांगते; काय आहे ना तुम्हाला अनुभव सांगायच्या भरात जरा उडीच मारली. ही पायल म्हणजे माझ्यासारखीच रोटरीच्या कार्यक्रमातून बेल्जियम मधे आलेली जळगावची मुलगी! अर्थात तिची आणि माझी brussels ला ओझरती ओळख झाली आणि त्या एका तासातच आम्ही फ़ार छान मैत्रीणी झालो. ती बेल्जियम मधे वेगळ्या शहरात राहत असल्याने मी तिला weekend ला माझ्या घरी रहायला बोलवले.


             पायलसाठी मी सगळ्या दिवसांचा कार्यक्रम आखला. त्यातला एक म्हणजे घराजवळच असलेले लहानसे सरोवर दाखवणे आणि जवळच्या जंगलात {अगदी जंगल असा विचार करू नका हं! }फ़िरवून आणणे. त्याप्रमाणे आम्ही रम्य सकाळी {रम्यच म्हणायला हवी! पावसाचा अंदाज वेधशाळेने सांगूनही सूर्य आकाशात होता.}रस्त्याच्या कडेकडेनी चालत निघालो.रस्त्यावर आमच्याखेरीज कोणीच दिसत नव्हते.{फ़क्त प्रचंड वेगात धावणाऱ्या गाड्या...}आम्ही गप्पांमधे रमलो होतो.{बऱ्याच दिवसांनी मराठीतून बोलत होते. किती बोलू आणि किती नको असे झाले होते.} तर अशा गप्पांमध्ये आम्ही १५ मिनिटांचा प्रवास २ मिनिटात संपवल्यासारखे वाटले.


               आम्ही प्रथम जंगलाकडे वळलो. मला हा रस्ता आईने {बेल्जियम मधील माझी host mom जिला मी आईच म्हणते.}तिने दाखवला होता. म्हणजे गाडीमधून जाताना! प्रथम एक बंगल्यांची सोसायटी होती आणि नंतर भरपूर झाडे! म्हणून एक चक्कर टाकायला आम्ही निघालो. थोड्याशाच चढणीने आम्ही दमलो, मग जरा रमत- गमत आम्ही ती सोसायटी ओलांडली. आता उंच झाडंची रांग दिसू लागली. डाविकडे झाडी आणि उजवीकडे माळरानासारखी मोकळी जागा.....


                 शेवटचा बंगला ओलांडून जात नाही कि अचानक एका कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मागे वळून बघतो तर एक कुत्रा आमच्याकडे शंकीत नजरेने {खरे तर खाऊ की गिळू अशा आवेशातच....}बघत होता. आम्हा दोघींच्या अंगावर सरसरून काटा आला. ते कुत्र धावतच पुढे येऊ लागले. तसे अंतर बरेच होते पण आम्ही फ़क्त चालण्याचा वेग वाढवला.पळालो मात्र नाही. पुढे जाऊन हुशारीने हातात दग़ड उचलले.{जसे आमचे नेम फ़ार छान आहेत, पण तरी...}आमचे नशीब चांगले की ते कुत्रं शेवटच्या घराच्या बागेत निघून गेले. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.


                  पण तेवढ्यात डावीकडच्या उंच झाडांमधून भुंकण्याचा आवाज आला. आम्ही दचकलो. एक अत्यंत उंच बुलडॉग़ धावत धावत आला आणि जोर-जोरात भुंकू लागला. आम्ही भीतीने गार पडलो. नशीब आमच्या आणि त्याच्या मधे एक जाळीचे कुंपण होते. मात्र नीट बघितल्यावर लक्षात आले ते त्याला उडी मारता येण्यासारखे आहे. पण त्याच्या पेक्षाही वाईट म्हणजे त्या कुत्र्याच्या भुंकण्याने गल्लीतली सारी कुत्री ओरडू लागली. आता मात्र आमची खैर नाही, हे आमच्या लक्षात आले. आम्हाला दोघींनाही क्षणभर काही सुचेना. आम्ही गल्लीतून परत गेलो तर कुत्र्यांचा आवाज येत होताच त्यांना समोरे जायचे आणि जर पुढे गेल्यावर या जाळीचे कुंपण नसले तर......काही सुचतच नव्हते. इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली.......


                  जरा डोके शांत होताच आम्ही घाबरत घाबरत त्या माळरानात शिरलो. हातात कठ्या उचलल्या आणि दगडे तर होतीच. तेवढ्यात पायलला सुचले की मी माझ्या आईला फ़ोन लावू शकते. माझ्याकडे मोबाईल होता ना! मग मी झट्कन नंबर फ़िरवला. पण बराच वेळ लावूनही घरचा फ़ोन कोणीच उचलेना. मग मला एक कल्पना सुचली. तो बुलडॉग़ जसे आम्ही पुढे जाऊ तसा आमच्या बरोबर जाळीच्या त्या बाजूनी भुंकत येत होता. मी पायलला त्याच जागेवर थांबायला सांगितले आणि मी दबकत दबकत पुढे गेले. ते जाळीचे कुंपण संपूर्ण होते; याची संपूर्णपणे खात्री करून घेतली. ते कुठेही मधेच संपले नव्हते, हेही बघितले आणि मगच मी पायलला खूण केली. आम्ही त्या जंगलाच्या वाटेनी निघालो. तोपर्यंत गल्लीतली सारी कुत्री ओरडत होतीच.


                   पुढे १० मिनिटे दोघींच्याही तोंडातून शब्दच बाहेर पडले नाहीत.{भीतिने फ़ुटतच नव्हते असे म्हणा ना!} आम्ही झपझप पावले उचलत होतो. मजेच्या नावाखाली मस्त पोपट झाला होता आमचा! गवताची थोडीशी खसबसही कुत्री मागे आली असे भासवत होती. आम्ही अशा भेदरलेल्या अवस्थेतही हातात काठी, दगड घेऊन सज्ज होतो. कुणी आम्हाला या अवस्थेत पाहिले असते तर आम्हाला वेड लागले असे म्हणून मोकळा झाला असता. आमचा अवतार्च तसा होता ना!


                    शेवटी आमची भिड चेपली. आम्ही बोलायला लागलो. तरी परत परत मागे वळून पाहत होतो. जरासा जरी आवाज झाला तरी कुत्र्यासारखा कानोसा घेत होतो.{ते ही कुत्र्यांसाठीच!} पोटातला गोळा मात्र जात नव्हता. जंगलाचा तो रस्ता संपला आणि आम्ही पुन्हा घराच्या वाटेला निघालो. मनावरचे फ़ार मोठे दडपण उतरले. आम्ही सुखरूपपणे घरी पोहोचलो.


                    


आता या अनुभवाचा नंतर विचार केला तर वाटते की नाण्याला जशा दोन बाजू असतात , तसेच आयुष्यातही चांगले-वाईट अनुभव येतातच. त्यातलाच हा एक ..........