लपविलास तूं हिरवा चाफा

लपविलास तूं हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवूनी लपेल का? ॥धृ.॥
जवळ मनें पण दूर शरीरें
नयन लाजरे चेहरे हंसरे
लपविलेंस तूं जाणुन सारें
रंग गालिंचा छपेल का? ॥१॥
क्षणांत हंसणे, क्षणांत रुसणें
उन्हांत पाऊस, पुढें चांदणें
हें प्रणयाचें देणें घेणें
घडल्यावांचुन चुकेल का? ॥२॥
पुरे बहाणे गंभिर होणें
चोरा, तुझिया मनीं चांदणें
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे
केली चोरी छपेल का? ॥३॥


गायिका : मालती पांडे
गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगित : प्रभाकर जोग