एक आहे आजी, तिची एक आहे नात ।
तुम्ही म्हणाल, 'हात् तिच्या', एवढं काय त्यात?'
आजवर कित्ती कित्ती वाट पाहिली तिची ।
बोलली नाही कोणाजवळ, काढे समजूत स्वतःची।
पण एक सांगते बाई, आजीला नाही घाई ।
होईल केव्हा मोठी म्हणून वाट पाहत राही।
पाहून रुपडे छान छकुले, मन येते भरून ।
तृप्ती उरी सलते तरीही नसलेल्यांना स्मरून ।
अंगठा तोंडात घालून अशी, चराचरा चोखते ।
वेडी होऊन आजी बघतच बसते ।
आजी गाते गोड गाणी, लावून आपला गळा।
समजल्यागत नात हसते, करते सुंदर चाळा ।
हात-पाय हलवते असे, पाहतच रहावे वाटते ।
लागू नये दृष्ट म्हणून, मीठ-मोहरी टाकते ।
नात आहे इवली इवली, तिला कळते सारे ।
नातीचे अपूर्व आगमन, आजीला भारी प्यारे ।
- संगीता कुलकर्णी
(एका आजीने आपल्या लहानग्या नातीला डोळे भरून पाहताना केलेले हे बालगीत.
अवांतर: 'हात तिच्या' या शब्दाला असभ्यतेची किनार असली(आहे की नाही माहिती नाही, पण असावी बहुधा.) तरी तो कवितेच्या यमकाच्या आणि आशयाच्या दृष्टीने आवश्यक असल्याने चालवून घ्यावा ही विनंती.)