कचरा एक जिवन : क्षितिज येलकर

                           कचरा एक जिवन


 तुटलेल्या बडमिंटनच वरचं टोक वाकवून मुठीत धरलेल हत्यार व पाठीवर तागाची गोणी टाकून सकाळी ६ वाजता घरातून निघणारी पोरांची माय.. ओळखलात का कोण?


 तुमच्या आमच्या बघन्यात येणारी, बहुतेकदा रस्त्यावर मुन्सिपाल्टीच्या डब्याभोवती आढळणारी किंवा घराच्या मागील दरवाज्याच्या गल्लीतून वावरणारी, दिवसाअखेरी लोकांच्या निरुपयोगी वस्तुंच्या जमलेल्या साठ्यातुन 'कागद' किंवा 'प्लास्टिक' नावाच्या दोन मौल्यवान अलंकारावर जिच्या संसांराच गाडगं भरतं, अशी ती...
        कचरा .. कचरा.. कचरा आणि ती कचरेवाली


     कचरा हेच एक जिवन !!!, भले लोकांसाठी कचरा म्हणजे घाणं असेल पण ह्या घाणीतच माझ्या पोटाची तहान आहे, नुसतीच तहान नाही, तर माझ्या संसांराला चालवणारं हे एक वहान आहे. अशी म्हणणारी हिच ती एक कचरेवाली...


काय पहारे... जिवन आहे हिचं...
सकाळी घरातुन निघताना , घरातुन म्हणजे ....
चारी बाजुला चार बांबुसहित गंजलेल्या पत्र्याच्या चार भिंती व टिप टिप करीत पाणी गळणार्या पत्र्याचं छप्पर  ह्या सर्वांची जिथे एकत्र मांडण होते, ते म्हणजे तिच घरं


 आज सकाळी समोरच्या गटारातील फुटलेल्या पाईपाला पाणीचं आलं नाही, म्हणुन अंघोळ न करता रात्री उरलेल्या आमटी आणि भाताचे दोन घास पोटात टाकून बारकीला म्हणते "बारके वाण्याकडून दोन पाव आणून तु नी गोट्या चाय-पाव खां आणि मंग शाळेला जावा"
     असं म्हणंत त्या दोन लेकरांची माय निघाली कचऱ्याच्या शोधात


 चेहरा निरागस, डोळ्यात कालच्यापेक्षा आज दोन कागद जादा भेटतील ह्याची लागलेली आसं, वेणी आणि फणी हिला कधी माहितीच नाही, विचरली तर पोरीची, ती पण जेव्हा बारकी म्हणेल "आयं डोक लयं खुरपतया , तवा हि माय वुवाची फणी घेऊन लेकीच्या डोक्यात झालेल्या वुवा शाप खुरपुन काढते"


 साधा ब्लाऊज, साधी साडी.. पण चार ठिकाणी विरघळलेली, सांगा पाहू हिची नविन साडी कशी असेल, दिवाळीला सोमवारच्या बाजारातुन जुने कपडे विकणारया भय्याकडून तिस रुपयाला घेतलेली ती साडी आता थोडी जुनी झालीयं आणि थोडी पदरालासुद्धा फाटलेली , "मेल्या कुत्र्यानं गल्लीतून जाताना भुंकत भुंकत जबड्यात माझा पदरचं पकडला, तवा फाडली मेल्यान"


 दिवस भर फिर फिर फिरायचं आणि कधी ऊनातनं तर कधी पावसातनं, इंदिरानगरच्या नाक्यावरच्या कचरा कुंडीपासुन ते पार स्टेशनच्या बेकरी बाहेरच्या कुंडीपर्यंत, कधी बिल्डिंगच्या मागनं तर कधी चाळीच्या गल्लीतुन..


    कागद आणि प्लास्टिकच्या  पिवश्या जश्या मिळतील तश्या खान्द्यावरच्या गोणित टाकत जायच्या नेहमीच्या अंदाजाप्रमाणं भरली आणि ६ वाजायला आले की शाह्च्या तागड्यात गोणी उलटी करायची मगं हातामध्ये कधी साठ तर कधी सत्तर रुपये येतात


 "मेला शाह सत्तरचे कधी पंच्यातर पण देतो, पण देताना हाताला हात घासून नेतो, मेल्याची नजर नेहमीच वाकडी , तागडीत गोणी उलटी करताना कधी वाकली तर मेल्याची भुरटी नजर नेहमीच माझ्या पोलक्याकडं"


 आणि पैसं जमलं कि मगं घराकडं, जाताना नाक्यावरच्या वाण्याकडून तांदुळ, डाळ, साखर आणि चापुड घ्यायची, आणि मगं समोर हा उभाचं, "गंगे दहा रुपये काढं चलं!!!"
 मेला माझ्या आयुशाला जुंपलाय, पण काय करु माझ्या कुकाचा धनी हायतो.
              "हे घे दहा रुपये आणि ढोस किती ढोसायची ती...!!!"


 पोरं माझी वाटं बघून रहात्यात, घरात आल्याल्या आयंला मिठी मारत्याती, गोट्या म्हणतो आयं नलीला पैसं देकी? "ह्य घे जा नली खां."
    बारकी माझी लयं गुणी, तिला यक चांगला पोरगा मिलावा आणि सुखात रहावी गं माझी बायं , देवा यवडं मागनं पुर कर रं बापा माझं"


 जेवाण बनीवलं की मगं माझं कुकू तराठ व्हवून घरला यतयां, मगं आया बहिणीवरून शिव्या काय आणि काय काय....
 मेला कधी कधी मारतो पण मला, मग लेकरं मधी येत्याती मायंला वाचवायला. पण मी काय बोलत न्हाय त्याला, फगस्त रातच्याला दारु पितो, दिवसा देव माणुस, काम केलं तर केलं नाहीतर न्हायं ... चालायचचं


आणि मगं रात्रीची झोप झाली आणि दिवस उजाडला की परत, त्याच कचऱ्याच्या शोधात... तीच कागदं आणि तेच प्लास्टिक..


तर मंडळी अशी हि एक जिवनगाथा एका कचरेवालीची... , आपल्या प्रतिक्रीया कळवा.


       आपला : क्षितिज येलकर