साबुदाण्याची खिचडी

  • १ वाटी साबुदाणा
  • अर्धी वाटी दाण्याचा कूट (कूट जास्त बारीक नको भरडसरच असावा)
  • १ मध्यम बटाटा (काचर्‍या करून पाण्यात घालून ठेवाव्या)
  • २ नग हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • २ टेबलस्पून नारळ (काड्यापेटीतल्या काड्या सारखे बारीक तुकडे (१ सेंटी लांबीचे))
  • १ टी स्पून जीरे
  • ४ टेबलस्पून तूप (साजूक किंवा वनस्पती)
  • चवीनुसार मीठ
  • १ टी स्पून साखर
  • सजावटी साठी खवलेला नारळ आणि कोथिंबीर
  • अर्धे लींबू
१५ मिनिटे
एकास एक किंवा दोन वेळ

मंद गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालावे. तूप तापले की त्यात जीरे घालावे. जीरे तडतडून लालसर झाले की त्यात मिरच्यांचे तुकडे टाकावे. मिरच्यांचे तुकडे जरा तळले गेले की त्यात पाण्यात ठेवलेल्या बटाट्याच्या काचर्‍या, पाणी निथळून काढून, टाकाव्यात. झाकण ठेवून एक दणदणीत वाफ द्यावी. (पण जळू देऊ नये.)

बटाटे शिजले की साबुदाणा, दाण्याचा कूट, मीठ, साखर, नारळाचे तुकडे घालून नीट परतून घ्यावे. तूप कमी वाटत असेल तर वरून किंचीत टाकावे आणि साबुदाणा पुन्हा परतावा. या नंतर, गॅस मंद करून झाकण ठेऊन खिचडीला एक वाफ द्यावी. ४-५ मिनिटांनी  झाकण काढून खिचडी वरखाली करून मोकळी करून घ्यावी.  अर्धे लींबू पिळावे.

साबुदाणे वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे मिळतात.
एकदम बारीक साबुदाणा दाक्षिणात्य पायसम (खीर) साठी वापरतात.
एकदम मोठा साबुदाणा चिवड्यासाठी वापरतात. (यालाच नायलॉनचा साबुदाणा असेही म्हणतात.
खिचडीचा साबुदाणा मध्यम आकाराचा, अपारदर्शक, एकाच आकाराचा असावा.
साबुदाणा एकदाच घुवावा. जास्त धुऊ नये.
धूतल्यावर त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. आणि तो धूतलेला साबुदाणा तसाच झाकून ३-४ तास ठेवावा. नंतर, तो हाताने चोळून मोकळा करून घ्यावा. साबुदाणा व्यवस्थित भिजला असेल तर तो वरून कोरडा लागतो. एक दाणा चावून बघितल्यावर आत कणी (कडक अंश) लागत नाही.

खिचडी देताना त्यावर खवलेला नारळ आणि कोथिंबीर भुरभुरून द्यावी. आवडत असल्यास सोबत गोड दह्याची कवड द्यावी.