एक वादळ मनामध्ये....

एक वादळ मनामध्ये खूप दिवस कोंडलेलं
मुकं मुकं अबोलसं शब्दांसाठी थांबलेलं


नजरेतून बऱ्याचदा बाहेर येण्या धडपडलं

तुझ्यामध्ये विरून जाण्या जीवापासून तडफडलं
भावनांच्या कोंडमाऱ्यात एकाकी घुसमटलेलं
मुकं मुकं अबोलसं शब्दांसाठी थांबलेलं
एक वादळ मनामध्ये खूप दिवस कोंडलेलं

लाटेमागून लाट आली किनाऱ्याला हाक देत

शीडसुद्धा नव्हते नौकेला साथ देत
दिशेविना अंधारात इतके दिवस भरकटलेलं
मुकं मुकं अबोलसं शब्दांसाठी थांबलेलं
एक वादळ मनामध्ये खूप दिवस कोंडलेलं

काळे मेघ आकाशात अचानक भरून आले

तुझे भाव माझ्यापर्यंत शब्दांना धरून आले
श्रावणात तुझ्या तेव्हा चिंब चिंब भिजलेलं
मुकं मुकं अबोलसं शब्दांसाठी थांबलेलं
एक वादळ मनामध्ये खूप दिवस कोंडलेलं