पंढरपुरातील उत्पात संपला!

नुकताच उच्च न्यायालयाचा एक निर्णय आला आहे. पंढरपूरच्या विट्ठल रुख्मिणी संस्थानावरील बडवे आणि उत्पात यांचे वर्चस्व या निर्णयाद्वारा संपुष्टात आले आहे.उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वारकरी समुदायामध्ये चैतन्याची एक लहर निर्माण झाली आहे.


आषाढी कार्तिकीला महाराष्ट्राभरातील वारकरी समाज त्यांच्या लाडक्या विठुरायाला भेटायला जात असतो‌. शेकडो मैल पायी चालून जाणारे हे लोक जेव्हा पंढरीत पोहचतात तेव्हा त्यांना काय दिसते, तर त्यांचा लाडका विट्ठल बडव्यांच्या आणि उत्पांतांच्या नज़रकैदेत अडकला आहे. शेकडो मैल जोषात चालणारे पाय  शेवटच्या काही पावलांना पार करू शकत नाही,बडव्यांच्या तिजोरीत भर घालेपर्यंत विठुही दर्शन देत नव्हता म्हणे! आता मात्र उच्च न्यायालयाने  हा उत्पात संपवलाय.पुढे सर्वोच्च न्यायालय, स्टे ई प्रकार होतीलच तरीही निदान काही दिवस तर विठुरायाला मोकळा श्वास घेता येईल.


न्यायालयाने विठ्ठलाला १९७३ मध्येच मोकळं केलं होतं,पण सुखसुखी संपेल तो उत्पात कसला? तेव्हाही शेलारमामांच्या आंदोलनाची किंमत द्यावी लागली होती. आणि आता कुठल्याही किमतीवर विठ्ठलाला पुन्हा कैदेत जाण्यापासून वाचवायला त्याचा 'वार'करी समाज पुर्णांशाने समर्थ आहे.