इटली - भाग १ (मिलानो)

आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस युरोपमधे कुठे तरी साजरा करायचा असं आम्ही आधीच ठरवलं होतं. म्हणजे या प्रोजेक्टची कन्सेप्ट फ़ेज आम्ही आधीच पूर्ण केली होती. पण नेहमीप्रमाणे रिसर्च मध्ये इतका वेळ वाया घालवला की एक्झिक्युशन करायची वेळ आली तरी आमचे बेसिक प्लॅनिंगही झाले नव्हते! हो-ना करता करता, अनेक वेळा प्लॅन बदलवत (कधी कधी तर दौराच रद्द करायची भाषा असायची) अख्रेर ८ ऑक्टोबरला आम्ही विमानात बसलो. मिलान (मिलानो)ला एक रात्र थांबून मग फ़्लोरेन्स (फ़िरेंजे)ला जायचे, तिथे ३ रात्री मुक्काम करून सिएनाला जायचे, तिथून कार भाड्याने घेऊन टस्कनी आणि अम्ब्रियाच्या कंट्रीसाईड्मधे भटकायचे असा साधारण कार्यक्रम होता. सिएना सोडून इतर प्रत्येक ठिकाणी राहण्याची व्यवस्था (सर्व्हास होस्ट किंवा हॉटेलचे बुकिंग ) झाली असल्याबद्दल आम्हाला स्वतः:चाच अभिमान वाटत होता! हसू नका, मळलेल्या वाटेने जायचे नाही ठरवले की या सगळ्या गोष्टींना खुप वेळ लागतो. (इटलीचा व्हिसा मिळवण्यासाठी मी केवळ काही तास घालवून बेस्ट वेस्टर्नची रिझर्वेशन्स केली होती, पण ते खूपच टिपीकल झाले असते, म्हणून अर्थातच व्हिसा मिळाल्यावर ती रद्द केली. ) प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी सर्व्हास होस्ट आम्हाला भेटणार आहेत, ह्याचे श्रेय माझ्या नवर्‍याला जाते. देशाटन करताना प्रेक्षणीय स्थळे व स्मारके यांच्या बरोबरच तिथले सामान्य जन-जीवन जवळून पाहण्याची संधी मला तितकीच महत्वाची वाटते. जगभरातल्या प्रवाशांना अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व्हासचे (http://www.servas.org) आभार मानवे तितके थोडेच! रॅले ते मिलान विमान प्रवास विनासायास पार पडला. सकाळी ९ वाजता मिलानच्या मालपेन्झा एअरपोर्टवर उतरलो. इथे आम्ही सर्व्हास होस्ट अलबर्टो यांच्या घरी राहणार आहोत. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही एअरपोर्टच्या बाहेर येऊन मिलान शहराकडे जाणार्‍या माल्पेन्झा एक्सप्रेस या गाडीत बसलो. बोव्हिसोला गाडी बदलून इन्व्हेरिगोला जाणार्‍य गाडीत बसलो. साधारण अर्ध्या तासाच्या त्या प्रवासात मी खिडकीबाहेर बघत होते, आणि नवरा त्याच्या सवयीप्रमाणे सहप्रवाशांशी गप्पा करण्यात गुंतला. बाहेर झरझर पालटणार्‍या दृश्यांमध्ये काही छोटी घरे, काही मोठी, काही अपार्टमेंट, मध्येच एखादे शेत आणि अधून-मधून फॅक्टरीवजा इमारती. प्रत्येक इमारत वेगळी. अमेरिकेतल्या सारखा साचेबंदपणा नाही. इकडे नवरा सहप्रवाशांना त्यांच्याच प्रदेशाबद्दल माहिती सांगून त्यांना ओशाळवाणे करून सोडत होता (अशी संधी तो कधीही सोडत नाही) इन्व्हेरिगोला गाडीतून उतरत नाही तोच अलबर्टो हसतमुखाने फलाटावर आमचं स्वागत करायला आले. मग त्यांच्या कारमधे बसून त्यांच्या घरी निघालो. मिलानच्या उत्तरेला वसलेले हे हिलस्टेशनवजा टुमदार गाव त्यावेळी अगदी झोपाळू, स्वप्नमय वाटत होते. वळणावळणाच्या अरुंद रस्त्यावरून जाताना मला अमरावतीतल्या बुधवाराचीच आठवण आली. एका ठिकाणी तर रस्ता इतका अरुंद की विरुद्ध दिशेने जणार्‍या गाड्या समोरा-समोर आल्या, तर एका गाडीला रिव्हर्स घ्यावे लागते. रहदारी तुरळक असल्याने ते शक्यही होते. इन्व्हेरिगोचे अरुंद रस्ते बघा-->


<a href= घरी पोचताच हात-पाय धुऊन स्वच्छ होईपर्यंत अलबर्टोंची स्वयंपाकाची लगबग सुरू झालेली होती. इकडे नवर्‍याने सर्व्हासच्या नियमाप्रमाणे आमचे ओळखपत्र तसेच स्वत:चे खास अलबर्टोसाठी तयार केलेले पाककलेचे पुस्तक भेट म्हणून सादर केले. ते पाहून अलबर्टो जाम खूश झाले. इटालियन जीवनात खाणे, पिणे आणि खिलवणे याला खूप महत्त्व आहे (अमेरिका याच्या अगदी विरुद्ध!!) तर इकडे अलबर्टो आमच्यासाठी क्रोस्टिनि (छोट्या टोस्टवर उन्हात वाळवलेले टोमॅटो इ. ) चा पहिला कोर्स व स्पाघेटीचा दुसरा कोर्स बनवत असताना आमच्या गप्पाही चांगल्या रंगल्या होत्या. अलबर्टोना इंग्रजी बर्‍यपैकी येते आणि उरलेले संभाषण आम्ही डिक्शनरीच्या साहाय्याने पूर्ण करत होतो. अलबर्टोचे खानदान मूळचे इथलेच असून त्यांचे सगळे नातेवाईक इथून चाळीस किमीच्या परिघात आहेत. इतक्या अस्सल इटालियन माणसाच्या स्वयंपाकघरात बसून त्याने स्वत: रांधलेले जेवण खाताना आम्ही अगदी भारावून गेलो. पहिल्याच दिवशी इथे आल्याचे सार्थक झाले असे वाटू लागले आहे.


 अल्बर्टोंची क्रोस्टीनी बघा---->


  अलबर्टो हे व्हेजिटेरियन आहेत. सर्व्हासही व्हिजिटेरियन लोकांची संघटना नसली तरी त्यामानानी व्हेजिटेरियन लोकांचं प्रमाण सर्व्हासमधे बरंच आढळतं. त्यामुळे प्रामुख्याने मांसभक्षण करणार्‍या देशांमध्येही आम्हाला व्हेजिटेरियन सदस्य मिळण्यात कुठलीही अडचण येत नाही. अलबर्टोंचे तीन मजली प्रशस्त घर आहे. आमच्या ताब्यात सगळ्यात खालचा मजला आहे. स्वत: इंटिरियर डेकोरेटर असल्याने घरात अपारंपरिक पद्धतीची अतिशय सुसंगत सजावट केली आहे. घराच्या मागे मेंढ्यांचे एक कुरण आहे. स्वयंपाकघराच्या गॅलरीतून गवतावर चरणार्‍या मेंढ्या, पलीकडल्या टेकड्यांवरील टुमदार घरे व झाडी आणि वर मोकळे आकाश असे विहंगम दृश्य दिसते. मेंढ्यांच्या गळ्यातील घंटांचा मंजुळ आवाज वातावरणात भर घालत असतो. जेवणे आटपल्यावर आम्ही दोघांनी परिसराचा एक फटका मारला. दुपारी अलबर्टोंना कामावर जायचे होते. जाताना त्यांनी आम्हाला तिथून जवळच असलेल्या लेक कोमोला कसे जायचे ते सांगितले होते. आणि कामावर जाताना किल्ल्याही आमच्या स्वाधीन केल्या! (धन्य सर्व्हास!!!) तर आम्ही आधी झोप काढावी की लेक कोमोला जावे यावर जरा उहापेह करून लेक कोमोला जायचे असे ठरवले. इटली मध्ये बसची तिकिट सिगारेटची दुकाने (तबाची शॉप) किंवा बार इ मधे विकतात. ती आधी काढून आणायची आणि मग बसमध्ये बसायचे. तिकिट काढताना दुकानदारिणीचे मोडके इंग्लिश आणि आमचे मोडके इटालियन यामुळे देवाण घेवाण करण्यात जरा उशीरच झाला. धावत पळत बस स्टॉपवर पोचतो तर काय, बस अगदी डोळ्यासमोरून निघून गेली!! मग नुसतीच इकडे तिकडे भटकंती केली. थोड्याच वेळात नवर्‍याने तो फार थकला असल्याचे ऐलान केले, म्हणुन आम्ही घरी परतलो. त्याला विमानात अजिबात झोप लागत नाही, आणि मी झोपेशिवाय दुसरं काहीही करत नाही. वाचन, सिनेमा पहाणे वगैरे गोष्टी करणे म्हणजे विमानातील वेळेचा अपव्यय आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बरेचदा तर विमान उडायच्या आतच माझी डुलकी सुरू झालेली असते, आणि खाण्यापिण्यासाठी मी महत्प्रयासानेच जागी असते. पण त्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर मी अगदी ताजी-तवानी असते. असो. नवरा झोपला असताना मग मी रिक स्टिव्हच्या पुस्तकातून फ़िरेंजेची माहिती वाचली आणि उद्या तिथे पोचल्यावर काय काय करायचे त्याचा साधारण आराखडा तयार केला. तिन्हीसांजा झाल्या, तशा मेंढ्यांच्या घंटाचा आवाज जोरात येऊ लागला म्हणून गॅलरीत जाऊन पाहिलं तर काय, मेंढपाळाच्या मागून एका मागोमाग मेंढ्या घरी जायला निघालेल्या दिसल्या. मावळतीची किरणे, हिरवे गार कुरण आणि बांधावरून जाणारा मेंढपाळ, त्याची कुत्री, मेंढ्या आणि घंटाचा मंजुळ नाद - इतके विहंगम दृश्य असून नवरा एका सुंदर फोटोला मुकला आहे असे वाटले. त्याला उठवावे असा (दुष्टं) विचारही एकदा मनात आला. पण एव्हाना मेंढ्या बर्‍याच दूर गेलेल्या होत्या. अंधार पडला तसे अलबर्टो कामावरून परत आले आणि नवराही जागृतावस्थेत परत आला. त्या दोघांची स्वयंपाकघरात लगबग सुरू झाली. मी पण लुडबुड करून त्यांना मदत केल्याचा आव आणत होते. हसत खेळत गप्पा करता करता जेवण सुरू झाले. इटालियन जेवणामध्ये सगळे पदार्थ एकदम नं वाढता एक एक कोर्स वाढायची पद्धत आहे. ऍंटिपास्तो, प्रिमो, सेकंडो अशी त्याला क्रमिक नावेही आहेत. आणि प्रत्येक कोर्स झाला की नवीन बश्या, चमचे घ्यायचा रिवाज आहे. अनेक विषयांवर गप्पा ठोकून अखेर आम्ही झोपायची तयारी केली. अलबर्टोच्या अगत्याने इट्लीतला पहिला दिवस तर फ़ारच छान गेला होता. उद्या काय काय करायचे त्याची स्वप्नं रंगवत आम्ही निद्रेच्या स्वाधीन झालो.