ब्रेड रोल कटलेट

  • ब्रेड स्लाईसेस ८
  • उकड्लेले बटाटे - २
  • वाफ़वलेले मटार दाणे-१ वाटी, फ़ोडणीचे साहित्य
  • आले-लसूण पेस्ट - १ टी स्पून, २ हिरव्या मिर्च्या बारिक चिरून
  • १ टे. स्पून रवा, १ टे. स्पून मैदा, पाणी
  • १ १/२ टी. स्पून गरम मसाला/ कोणताही मसाला, मीठ, तेल.
३० मिनिटे
२ जणांना

सारण :

उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्यावेत. त्यात वाफवलेले मटार थोडेसे भरडून घालावेत.  आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालाव्यात. १ चमचा मसाला घालावा. चवीप्रमाणे मीठ घालावे आणि त्यावर हिंगाची फोडणी घालावी. हे मिश्रण नीट मळून घ्यावे.

रवा, मैदा, उरलेला मसाला, मीठ एकत्र करून एका बशीत ठेवावे.

ब्रेडच्या कडा कापाव्यात. फार आतून कापू नयेत. ब्रेडची स्लाइस तळ हातावर घेऊन, त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे. मग हि स्लाइस दोन्ही हातांनी दाबावी. आता या स्लाइसच मधोमध केलेल्या सारणाची उभी वळी (लोडाप्रमाणे) बनवून ठेवावी. आता, दोन्ही हातांनी त्या स्लाइस च्या कडा आत वळवून घट्ट दाबाव्यात, की त्या एकमेकीला चिकटल्या पाहिजेत. असा तो लोडासारखा आकार तयार होतो. 

हा रोल रवा-मैद्याच्या मिश्रणात घोळवून, तव्यावर थोडे-थोडे तेल सोडून शॅलोफ़्राय (मराठी शब्द???) करावा. असेच बाकीचे रोल्स बनवून घ्यावेत. आवडत असल्यास भज्याप्रमाणे तळून काढावेत.

केचप/ चिंचेच्या चटणी बरोबर खाण्यास द्यावेत.

 

 

मी रोल्स तळत नाही, कारण ब्रेड तेल खूप शोषतो...

मला जास्त तेलकट आवडत नाही. ज्यांना आवडते त्यांनी करावयास हरकत नाही... कारण चवीला तेच जास्ती चांगले लागतात.

स्वानुभव