मराठी इंग्रजीपेक्षा क्लिष्ट?

भाषेचा उपयोग कृति किंवा स्थितीचे वर्णन करण्यासाठी होत असल्यामुळे व हे कार्य मुख्यत्वेकरून क्रियापद करीत असल्यामुळे वाक्यरचनेंत क्रियापद हा सर्वांत महत्त्वाचा शब्द असतो. त्यामुळे कुठल्याही व्याकरणाच्या पुस्तकांत अर्धीअधिक पाने क्रियापदांची रूपे व इतर धातुसाधिते यांवर खर्ची पडलेली असतात.


मराठी व इंग्रजीच्या वक्यरचनेंतील मुख्य फरक म्हणजे साध्या मराठी वाक्यांत कर्ता सुरवातीला असतो, त्यानंतर कर्म वगैरे इतर शब्द येतात व क्रियापद वाक्याच्या शेवटी येते, तर इंग्रजींत कर्ता व क्रियापद हे वाक्याच्या सुरवातीला व शक्य तितके एकमेकांच्या जवळ असतात व नंतर इतर शब्द येतात हे सर्वांना ठाऊक आहे. आता (वर म्हंटल्याप्रमाणे) भाषा ही कृति किंवा स्थिति वर्णन करण्यासाठी वापरली जात असल्यामुळे इंग्रजी बोलणारा माणूस त्यादृष्टीने महत्त्वाचे असलेले कर्ता व क्रियापद हे शब्द पहिल्यांदा बोलतो; म्हणजेच तो मुद्द्याचे प्रथम बोलतो व मग इतर शब्दांचा पसारा मांडतो. याउलट मराठी बोलणारा नक्की काय सांगतोय हे शेवटपर्यंत म्हणजे क्रियापदाला पोचेपर्यंत कळत नाही.


भाषेचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने इंग्रजी मराठीपेक्षा अधिक सोयीची नाही काय?


जर माणसांना विचार शब्दांत व्यक्त करण्यापूर्वी मुद्द्याचे काय ते लक्षांत घेण्याची संवय लागली तर इंग्रजी शिकणे सोपे होईल असे वाटते.


दुसरी गोष्ट म्हणजे मराठी व इंग्रजीच्या अंकवाचनांतही फरक आहे. दोन अंकी संख्या मराठींत वाचतांना आपण प्रथम एकंस्थानचा अंक वाचतो व नंतर दहंस्थानचा अंक वाचतो. उदा. एकवीस ही संख्या आपण प्रथम एकंस्थानचा एक म्हणतो व नंतर दहंस्थानचा दोन (त्याच्या स्थानिक किमतीसह) म्हणतो. पण लिहितांना मात्र प्रथम दहंस्थानचा अंक लिहितो व नंतर एकंस्थानचा अंक लिहितो. म्हणजे डावीकडून उजवीकडे लिहिलेली संख्या वाचतांना त्यांतील अंक उजवीकडून डावीकडे (त्याच्या स्थानिक किमतीनुसार) या क्रमाने वाचले जातात. याउलट इंग्रजींत ही संख्या ट्वेंटी वन अशी वाचली जाते. म्हणजे ज्या क्रमाने तिच्यांतील अंक लिहिले जातात त्याच क्रमाने ते वाचले जातात (दोन्ही वेळा डावीकडून उजवीकडे). एकंस्थानी नऊ असलेल्या संख्यांचे वाचन तर लिहिण्याच्या दृष्टीने अधिक दुर्बोध असते. उदा. एकोणतीस म्हणजे दोनावर नऊ. पण वाचतांना किंवा बोलतांना ती एक उणा तीस (तीसाला एक कमी) अशी उच्चारली जाते. या अडचणीवर मात करण्यासाठी काही काळापूर्वी एकंस्थानी नऊ असणाऱ्या संख्या उदा. २९ ही (सत्तावीस, अठ्ठावीस चा तालावर) नव्वेवीस, ३९ ही (सदतीस, अडतीसच्या तालावर) नव्वेतीस, इ. इ., अशा वाचाव्यात असे सुचवण्यांत आले होते. पण ती सूचना व्यवहारांत आली नाही. अर्थात, त्यामुळे संख्यालेखन व वाचन यांच्यातील उलट सुलट दिशांची विसंगति दूर होत नाही. मराठींतून शिकणाऱ्या लहान मुलांचा शिक्षकांनी सांगितलेली दोन अंकी संख्या लिहितांना गोंधळ उडतो तो यामुळेच. त्यांना इंग्रजींत अंक शिकणे सोपे जाईल असे वाटत नाही का?  


तीन अंकी संख्यांच्या बाबतींतही अंक लिहिण्याचा क्रम व वाचण्याचा क्रम एकमेकांविरुद्ध असतात. आमच्या लहानपणी एकोत्री म्हणतांना आम्ही एकवीसचा वर्ग चारशे एकेचाळीस आणि पुढील वर्ग हे 'एकवीस एकवीस एकेचाळीस चार', 'बावीस बावीस चौऱ्यांशी चार' असे म्हणत असू.


एका बाबतींत मात्र मराठी इंग्रजीपेक्षा अधिक सोयीची आहे. मराठींत अक्षराचे नाव व उच्चार सारखेच असतात. उदा. 'प' या अक्षराचे नाव 'प' आहे व उच्चारही 'प'च आहे. इंग्रजींत मात्र अक्षराचे नाव व उच्चार वेगवेगळे असतात. उदा. 'C' या अक्षराचे नाव 'सी' आहे पण उच्चार मात्र 'क' किंवा 'स' आहे. त्यामुळे इंग्रजींत स्पेलिंग करावे लागते.


आहे ना (आपली) मराठी इंग्रजीपेक्षा अधिक क्लिष्ट?