होम्स कथाः अंतिम लढत-४

यापूर्वी:
होम्स कथाः अंतिम लढत-१
होम्स कथाः अंतिम लढत-२
होम्स कथाः अंतिम लढत-३ 
शेवटी मी वैतागून खांदे उडवले आणि होम्सची वाट बघू लागलो. आता मला भिती वाटायला लागली की होम्सचं काही बरंवाईट तर नाही ना झालं? गाडीची शिट्टी वाजली, दारं पण बंद झाली आणि अचानक.. 


'वॅटसन, तुझ्या मित्राला साधं 'सुप्रभात' पण करणार नाहीस?' एक आवाज आला.
मी जवळजवळ उडालोच. बघतो तर काय, त्या वृद्ध धर्मगुरुने माझ्याकडे चेहरा वळवला. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसेनाश्या झाल्या, फेंदारलेले नाक सरळ झालं, खालचा लोंबणारा ओठ जागेवर आला, आणि मला माझा होम्स दिसला!! दुसऱ्याच क्षणी त्याने आपला धर्मगुरु अवतार परत आणला.
'होम्स!! मी केवढा दचकलो!' मी उद्गारलो.
'अजून धोका टळलेला नाही. ते मागावर आहेतच. अरे, तो बघ, मॉरीयार्टी.' होम्स म्हणाला.
मी पाहिलं, एक उंच माणूस गर्दीतून वाट काढत येत होता आणि गाडी थांबवायला इशारे करत होता.. पण गाडीने वेग घेतला आणि स्टेशनाच्या बाहेर गेली, त्यामुळे तो काहीच करु शकला नाही.
होम्स हसत म्हणाला, 'बघितलंस? आपण येवढी काळजी घेऊन पण तो किती जवळ आला होता?' आणि त्याने त्याची धर्मगुरुची टोपी काढून पिशवीत टाकली.


'आजचा पेपर वाचलास का वॅटसन?'
'नाही.'
'म्हणजे तुला बेकर स्ट्रीटची बातमी माहिती नसेलच. त्यांनी आपल्या खोल्यांना आग लावली काल रात्री. अर्थात फारसं काही नुकसान झालं नाही म्हणा.'
'बापरे, होम्स! ही म्हणजे हद्दच झाली.'
'मला वाटतं, त्या गुंडाला अटक झाल्यावर त्यांचा माग जरा चुकला, नाहीतर त्यांना असं वाटलंच नसतं की मी बेकर स्ट्रीटला खोलीवर परत आलो आहे. अर्थात त्यांनी तुझ्यावर पाळत चांगली ठेवली आणि त्यामुळे तो व्हिक्टोरिया स्टेशनावर आपल्या मागावर आलाच. बरं, तू माझ्या सूचना नीट पाळल्यास ना?' होम्सने विचारले.


'हो, अगदी अक्षर न अक्षर.'
'तुला घोडागाडी मिळाली?'
'हो ती थांबलेलीच होती.' मी म्हणालो.
'तू गाडीवानाला ओळखलं नसशील ना? तो माझा भाऊ मायक्रॉफ्ट होता. अशा वेळी आपल्या अगदी विश्वासू किंवा रक्ताच्या नात्यातल्या माणसांवरच विसंबता येतं. बरं ते जाऊदे, आपण मॉरीयार्टीचं काय करायचं आहे आता?'
'त्याचं काय? आता आपली गाडी तर निघाली आणि पुढची आपण पकडणार आहे ती बोट पण पोहचल्यावर लगेच आहे. आपण त्याला हुलकावणी दिली आहे.'
'वॅटसन,मी तुला काय म्हणालो होतो? तो मला तुल्यबल टक्कर आहे. आणि तुला काय वाटतं, येवढ्याश्या अडथळ्याने तो माघार घेईल? मी घेतली असती का?'
'मग, तुला काय वाटतं? तो काय करेल?'
'मी जे केलं असतं तेच.'
'पण तू काय केलं असतंस?'
'दुसरी गाडी पकडली असती.'
'पण आतातर उशीर झाला आहे.'
'अजिबात नाही. आपली गाडी कँटरबरीला थांबते. आणि बोट बऱ्याचदा पंधरा एक मिनिट उशिरा असते. तो आपल्याला तिथे नक्की गाठेल.' होम्स म्हणाला.
'पण मी म्हणतो, आपण असं चोरासारखं त्याला का घाबरायचं? तो बंदरावर आल्या आल्या पोलिसांकडून त्याला अटक करवू. प्रश्नच मिटला.' मी म्हणालो.


'अशाने तीन महिन्यांची मेहनत वाया जाईल. मोठा मासा तर जाळ्यात सापडेल, पण लहान सहान मासे मात्र निसटून जातील. सोमवारपर्यंत धीर धरला तर सगळेच मासे आपल्या जाळ्यात असतील.' होम्स म्हणाला.
'बरं, मग काय करायचं म्हणतोस?'
'कँटरबरीला उतरायचं.'
'मग?'
'तिथून आपला आधीचा रस्ता बदलून न्यूहेवनला जायचं, तिथून डाइप ला. मॉरीयार्टी असं करेल की तो आपली सामानाची नोंद बघून त्याप्रमाणे पॅरिसला उतरुन दोन दिवस आपण सामान घ्यायला यायची वाट बघेल. यादरम्यान आपण मोजकंच सामान घेऊन भटकायचं आणि लक्झेंबुर्ग, बाजलं मार्गे स्वित्झरलँडला जायचं.'


तसा मी सामानाअभावी अडून बसणारा प्रवासी नाही, पण एका गुन्हेगारासमोर आपणच गुन्हेगार असल्याप्रमाणे लपतछपत प्रवास करण्याच्या कल्पनेने मी जरा चिडलोच होतो. अर्थात, होम्स जे करत होता ते होम्सला स्वत:ला चांगलं माहिती होतं. आम्ही कँटरबरीला उतरलो. न्यूहेवनच्या गाडीला अजून एक तास अवकाश होता. मी जरा हताश होऊनच आमच्या सामानासहित पुढे जाणाऱ्या सामानाच्या डब्याकडे बघत होतो, तितक्यात होम्सने माझी बाही ओढली आणि एके ठिकाणी माझं लक्ष वेधलं.
'ते बघ.' होम्स म्हणाला.
एक इंजिन धूर सोडत आमच्या समोरुन गेलं. आम्ही पटकन ते समोर येण्या आधीच सामानाच्या ढिगा आड दडलो म्हणून बरं.
'हाहा! म्हणजे इथे मॉरीयार्टीच्या बुद्धीला मर्यादा आहेत. जर त्याने मी काय करणार हा नीट विचार करुन तसंच केलं असतं तर मात्र आपली पंचाईत होती.' होम्स म्हणाला.


यानंतर:
होम्स कथाः अंतिम लढत-५
होम्स कथा: अंतिम लढत-६