होम्स कथा: अंतिम लढत-५

यापूर्वी:
होम्स कथा: अंतिम लढत-१
होम्स कथा: अंतिम लढत-२
होम्स कथा: अंतिम लढत-३
होम्स कथा: अंतिम लढत-४
'हाहा! म्हणजे इथे मॉरीयार्टीच्या बुद्धीला मर्यादा आहेत. जर त्याने मी काय करणार हा नीट विचार करुन तसंच केलं असतं तर मात्र आपली पंचाईत होती.' होम्स म्हणाला.


'आणि समजा त्याने आपल्याला गाठलं असतं तर काय केलं असतं?' मी विचारलं.
'शंकाच नाही. त्याने माझ्यावर नक्की खुनी हल्ला केला असता. पण ते जाऊदे, आता प्रश्न असा आहे की आपण आता इथे खायचं की न्यूहेवनला जाऊनच खायचं?' होम्सने विषय बदलला.


त्या रात्री आम्ही ब्रुसेल्स ला पोहचलो आणि तिथे दोन दिवस मुक्काम केला. नंतर आम्ही स्ट्रासबुर्गला गेलो. होम्सने तिथून सोमवारी लंडन पोलिसांना तार केली. पण तारेच्या उत्तराने मात्र तो वैतागला आणि त्याने तार दूर भिरकावली.
'मॉरीयार्टी निसटला. त्यांनी त्याच्या पूर्ण टोळीला अटक केली पण तो मात्र पोलिसांना गुंगारा देऊन निसटला. वॅटसन, आता हा खेळ जास्त जोखमीचा झाला आहे आणि मला वाटतं की तू लंडनला परत जावंस.' होम्स गंभीरपणे म्हणाला.
'का पण?'
'आता माझ्याबरोबर राहिलास तर तुलापण धोका आहे. मॉरीयार्टीचा बुरखा फाटला आहे आणि मी जर त्याला बरोबर ओळखत असलो तर तो आता आपली पूर्ण ताकत माझ्यावर सूड उगवण्यात पणाला लावेल. तू जर परत गेलास तर बरं होईल.'


अर्थातच मी ऐकणाऱ्यातला नव्हतो कारण मी त्याचा चांगला मित्र होतो. आम्ही स्ट्रासबुर्गमध्ये काहीकाळ या मुद्द्यावर वाद घातला आणि सरतेशेवटी दोघेही जिनीव्हाला गेलो.


नंतरचा पूर्ण आठवडा आम्ही मजेत घालवला. ऱ्होनच्या दरीत भटकलो, आणि ल्युक आणि जेमी फाट्यामार्गे इंटरलाकेन आणि तिथून पुढे मिरींगनला गेलो. अर्थातच ती सफर सुंदर होती, पण पूर्ण प्रवासभर क्षणभरही होम्स आपल्यावर असणाऱ्या संकटाच्या सावलीचे अस्तित्व विसरला नव्हता. आजूबाजूचा प्रत्येक चेहरा बारीकपणे न्याहाळणारी नजर पाहूनच मला कळत होतं की त्याला खात्री आहे की कितीही दूर गेलो तरी आम्ही त्या धोक्यापासून सुटू शकणार नव्हतो..


मला आठवतं, आम्ही भटकत असताना एक दगड वरुन गडगडत आला आणि नदीत पडला. होम्सने पटकन वर चढून कोणी दिसतं का याचा शोध घेतला. अर्थात आमच्या वाटाड्याने आम्हाला सांगितलं की इथे अशा दरडी अधून मधून कोसळतच असतात, पण होम्सचा विश्वास बसला नव्हता. तो बोलला काहीच नाही, पण माझ्याकडे बघून एखाद्या जाणकार माणसासारखा हसला. 'बघ, माझे अंदाज खरे ठरत आहेत!' तो मूकपणे मला सांगून गेला.


पण इतकं असूनही होम्स निराश झाला नव्हता. तो पूर्ण सफरभर  उत्साही होता. काहीवेळा तो असेही म्हणाला की मॉरीयार्टीसारखा गुन्हेगार समाजातून जाण्याच्या बदल्यात तो आपली कारकीर्दही सोडून द्यायला तयार आहे..
'वॅटसन, आतापर्यंतच्या माझ्या कारकीर्दीचा आढावा घेतला तर मी समाधानी आहे. मी कुठेही असत्याची बाजू घेतलेली नाही. अन्यायाची साथ दिलेली नाही. बघ, तुझ्या माझ्या कामगिऱ्यांच्या आठवणी माझी ही सर्वात उच्च कामगिरी नोंदून संपतील.माझ्या कारकीर्दीतली ही श्रेष्ठ कामगिरी असेल, जेव्हा मी मॉरीयार्टीला गजाआड करेन.'  


मी आता जास्त पाल्हाळ लावत बसत नाही, कारण या आठवणी माझ्यासाठी पण अप्रिय आहेत. पण मला आवश्यक ते तपशील सांगणं भाग आहे.


३ मेला आम्ही मिरींगनला पोहचलो आणि एका हॉटेलात उतरलो. आमचा मालक तीन वर्षे लंडनला एका हॉटेलात वेटर म्हणून राहिलेला असल्याने त्याला उत्तमपैकी इंग्लीश येत होतं. त्याच्या सल्ल्यावरुन आम्ही दुसऱ्या दिवशी डोंगरापलीकडे असलेल्या एका प्रेक्षणीय स्थळी जायला निघालो. अर्थात आम्हाला सांगितलं गेलं होतं की राइनबाख धबधबा अत्यंत सुंदर आहे आणि त्याला भेट देण्याची संधी गमावू नये. म्हणून आम्ही तिथे गेलो.


राइनबाख धबधबा सुंदर असला तरी जरा धोकादायक जागा आहे. वितळलेल्या बर्फामुळे खोल दरी तयार झाली आहे आणि धबधबा खूप उंचावरुन खाली कोसळतो.वरचा कडा जरा निमुळता आहे. धबधब्याची उंची पाहून कधीकधी गरगरल्यासारखं होतं, इतका तो उंच आहे. धबधब्याचा मार्ग वरपर्यंत गेला आहे. पण वर जाऊन पुढे तो संपला आहे आणि गेलेल्याला त्याच वाटेने परत यावे लागते. दुसरी वाटच नाही. आम्ही परत जायला वळलो, तितक्यात एक स्थानिक तरुण आम्हाला घाईघाईने वाट चढताना दिसला. त्याच्या हातात हॉटेलमालकाचं माझ्या नावाने पत्र होतं. कागदही हॉटेलाच्या शिक्क्याचा होता. पत्रावरुन असं दिसत होतं की एक इंग्लिश स्त्री हॉटेलात अचानक खूप आजारी पडली होती आणि काही क्षणांची सोबती होती. पण मरण्या आधी तिला जर इंग्लिश डॉक्टरकडूनच उपचार मिळाले तर तिला थोडाफार विसावा मिळाला असता. त्यामुळे जर मी परत हॉटेलात येऊ शकलो तर बरे होईल इ.इ.इ.    


अर्थातच मी ही विनंती नाकारु शकत नव्हतो. पण मला होम्सला एकटे सोडून जाववत नव्हते. शेवटी असं ठरलं की होम्स त्या स्विस माणसाबरोबर राहील आणि तो माणूस त्याला परतीच्या वाटेवर साथ करेल. मी परत निघालो. निघताना मी मागे वळून पाहिलं तर होम्स हाताची घडी घालून एका खडकाला टेकून उभा होता आणि त्या विशाल धबधब्याकडे पाहत होता.


मला माहिती नव्हतं की माझ्या प्रिय मित्राचं, होम्सचं हे शेवटचं दर्शन होतं.. 


यानंतर:
होम्स कथा: अंतिम लढत-६