मिरच्यांचे लोणचे-

  • अर्धा किलो - साधारण तिखट -जाड पोपटी हिरव्या मिरच्या
  • १०० ग्रॅम मोहरीची डाळ
  • ५/६ लिंबे - मोठ्या आकाराची
  • सैंधव (पादेमीठ) व मीठ - चविनुसार/अंदाजे
  • हिंग व हळद - १ चहाचा चमचा.
  • तेल - एक छोटी वाटी
३० मिनिटे
बाटली भरून

मिरच्या छान ताज्या व पोपटी रंगाच्या जाडसर असाव्यात.
जास्त तिखट नकोत.मिरच्या धुऊन त्यांचे देठ काढून घ्यावेत.
मिरच्यांचे (लांब असल्यास) उभे दोन काप करून - नंतर आडवे दोन काप करावेत - मिरच्या लांब नसल्यास फक्त उभे दोन काप करावेत.

एका परातीत मोहरीची डाळ घ्यावी. त्यात आळं बनवून तेल टाकून फेटून घ्यावी. त्यात मीठ, सैंधव, लिंबाचा रस, हिंग व हळद चांगली एकजीव करून घ्यावी.

त्यात मिरच्यांचे तुकडे टाकून परत एकजीव करावे.
एकजीव करताना मिरच्या तुटणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.
एका धुतलेल्या काचेच्या बाटलीत भरून ठेवावे- मुरायला ४८ तास लागतात.  

नियमित करायचा आळस असल्यास जास्त मिरच्या (अर्धा किलो) अन्यथा दोन/तीन दिवसा आड करता आल्यास २०० ग्रॅम मिरच्या घेऊन प्रमाणात जिन्नस घ्यावेत.
मला स्वतःला जुनं झालेले मिरचीचे लोणचे आवडत नाही.
ताज्या लोणच्यातल्या मिरच्यांना जी चव असते ती झकास लागते.
ह्यात गाजराचे तुकडे लांब चिरून टाकल्यास छान लागतात.
गाजराचे तुकडे टाकायचे झाल्यास थोडा मसाला वाढवावा.
ठेपले, खिचडी, वरण-भात, पिठलं-भात वगैरे बरोबर चवदार लागते.

सौ.- गुजराती पद्धत.