गूळाच्या पोळ्या

  • कणिक ३ कप
  • किसलेला गूळ १ १/२ कप,
  • वेलची पावडर १ चमचा, खसखस १ १/२ चमचा
  • मीठ, पाणी, तेल.
४५ मिनिटे
साधारण १० पोळ्या.

कणीक मीठ , तेल घालून नेहमीच्या पोळ्यांसारखीच मळून घ्यावी.

गूळ :

प्रथम किसलेला गूळ हाताने एक सारखा कुस्करून घ्यावा. त्यात थोडेसे तेल, वेलची पावडर घालावी. खसखस भाजून व थोडीशी कुटून घालावी. हाताला किंचित तेल लावून हा गूळ नीट मळून घ्यावा. खडा राहू देऊ नये. हा पोळीसाठीचा गूळ तयार झाला.

आता ओट्यावर एका बाजूला मोठा कागद पसरून ठेवावा.

पोळी :

कणकेच्या २ छोट्या लाट्या (३ " व्यासाच्या)लाट्या लाटून घ्याव्या. गुळाची एक लाटी कणकेच्या लाट्यांपेक्षा किंचित छोटी लाटून घ्यावी. आता हि लाटी कणकेच्या एका लाटीवर ठेवून वरून कणकेची दुसरी लाटी (सॅन्डवीचप्रमाणे) ठेवावी. कडा नीट दाबून बंद कराव्यात.

आता लाटताना सुरुवातीला मध्यातून जोरात दाबून लाटावे म्हणजे गूळ पुढे सरकतो...आणि मग  सगळ्या बाजूंनी नीट लाटून घ्यावी. पोळपाटाला चिकटू देऊ नये. पोळपाटावर लागेल तसे पीठ घेऊन पोळी लाटावी.

गरम तव्यावर पोळी टाकून, बाजूने तेल सोडावे म्हणजे पोळी चिकटत नाही. पोळी खालच्या बाजूने नीट भाजली गेली की, कालथ्याने उलटून टाकावी व परत तेल सोडावे. गूळ जिथून बाहेर येईल, तिथे थोडे तेल सोडावे म्हणजे तो बाहेर आलेला गूळ तव्याला चिकटणार नाही. पोळी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजली गेली की, ती बाजूला पसरून ठेवलेल्या  कागदावर मध्ये घडी घालून ठेवावी. अशाप्रकारे सगळ्या पोळ्या करून घ्याव्यात.

गार झाल्या की, साजूक कणीदार तुपाबरोबर खाण्यास द्याव्यात.

 

गरम पोळी हाताने घडी घालू नये.. गूळ गरम असताना अगदी व्यवस्थित चटका बसतो.

थंडीच्या दिवसात, गूळ-तूप भरपूर खावे. गूळ उष्ण आहे आणि तूप स्निग्ध आहे. यामुळे थंडी बाधत नाही.

माझी आई.