ह्रदयाने विचार करणारा माणूस. . .१

संगीताने... विशेषतः शास्त्रीय संगीताने मनाला शांती मिळते, व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतात, अस्वस्थता कमी होते हे बरेच काही ऐकलेले, व थोडेफार अनुभवलेही आहे, परंतु स्वभावात बदल होतो की मूळ प्रसन्न स्वभावाला त्यामुळे खतपाणी मिळते हा एक वादाचा मुद्दा होऊ शकेल. 'प्रसन्न' हे  विशेषण  शाळा कॉलेज व कथा कादंबऱ्या वाचनात वर्णनामध्येच बरेचदा ऐकले होते. पण ते फक्त चेहऱ्यांतच नसून पूर्ण व्यक्तिमत्त्व तसे असू शकते, हे आयुष्यात कधी प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल, त्याचा प्रत्यय येईल हे स्वप्नीही नव्हते. पण मला संगीतक्षेत्रातल्या उस्मानखॉं या मान्यवराच्या, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा, हृदयातून विचार करण्याचा भरपूर प्रत्यय आला. त्याचेच हे काही अंशी शब्दांकन करण्याचा प्रयत्न. 




मिरजसारख्या आडगांवी मला एक नोकरी मिळाली. त्या काळी पन्नास शंभर रु.चा फरक माझ्यासाठी नोकरी बदलायला पुरेसा होता. अकाउंट्स मध्ये काम करीत असल्याने,  पहिले काही महिने पूर्वीच्या दोन तीन वर्षांपासून भिजत पडलेले काम संपवून - अप टू डेट आणण्यातच गेले. त्यामुळे दिवसरात्र फॅक्टरीमध्ये मुक्काम होता. पण ते संपल्यावर संध्याकाळी काय करायचे हे एक प्रश्नचिह्न उभे राहिले, माझे सहकारी गृहस्थाश्रमी असल्याने, स्वाभाविकपणेच संध्याकाळी मला एकटेपण अपरिहार्य असे. 
एकदा सहज फिरता फिरता बाजाराच्या बाजूलाच असलेल्या एका रस्त्याला लागलो. तर वाद्यांची असंख्य दुकाने.. त्यातही मुख्यतः तंबोरे, विणा व सतारी. पुण्यांतही अशी पाच-दहा दुकाने एकत्रित पाहिल्याचे आठवत नव्हते, त्यामुळे ह्या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले. म्हणून उत्सुकतेपोटी एका दुकानाच्या पडवीत पोचलो. तेथे एक गृहस्थ सतारीचे काम करीत होते. महंमद भाई. कुतूहलापोटी त्यांची परवानगी घेऊन तिथे टेकलो. मग त्यांनीच माहिती पुरवली की हे एक तंतुवाद्यांचे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि भली भली गवई मंडळी येथूनच तानपुरे खास बनवून घेऊन जातात वगैरे. चार पाच दिवसातच त्यांच्याशी थोडी मैत्री झाली, आणि आपणही सतारीतून सुंदर सुर काढावेत असे वाटू लागले. (म्हणजे अजूनही ते तसेच वाटते) तर त्यांच्याच ओळखीने  कोल्हापुराचे रहिवासी असलेल्या श्री. कुलकर्णीच्या मार्गदर्शनाखाली माझे संगीतशिक्षणाचे प्रयोग सुरू झाले.
पुढे वर्षभरातच कंपनी बुडीत जाणार याची अकाउंट्स मध्ये काम करण्याने  कल्पना आली, व ती बदलून मी परत पुण्याला परतलो - आता गाश्यामध्ये सतारीचीही भर पडली होती.
पुण्यात आल्यावर ते प्रयोग पुढे सुरू ठेवावेत अशी मधून मधून ऊर्मी येत असे. त्यादृष्टीने शिकवणी कुठे मिळेल याची चौकशी सुरू करून काही 'क्लासेस' मध्ये जाऊनही आलो. परंतु, तेथे एकाच वेळी असंख्य वाद्ये - त्यांतच गायन व  वेगवेगळे रागांचे चाललेले प्रयोग, याचा रागरंग पाहून - हे नकोच हे कळण्याइतपत सुजाणता माझ्यात आली होती. 
घरातली सतार पाहून, जवळपास राहणाऱ्या एका मुलीने त्याला उस्मानखॉंना भेटायला सांगा, असे माझ्या आईपाशी म्हटले. तो पर्यंत त्यांना कधी ऐकलेही नव्हते, व पाहिलेही. तेव्हा पूर्वग्रहावर व ऐकीव माहितीवर विसंबून हे खॉं लोक म्हणजे खूपच विक्षिप्त व तऱ्हेवाईक असतात असे म्हणून मी या सूचनेची बोळवण केली. परंतु, ती संगीताची ऊर्मी पुन्हा पुन्हा यायला लागल्यावर एकदा भेटून तर येऊ या.. म्हणून मिळालेल्या नंबरवर फोन केला.. व जमेल तशा हिंदीत त्यांची चौकशी केली,  तेव्हा त्या दुपारी ते नक्कीच भेटतील हे समजले.
तेव्हा मिळालेल्या लोकमान्यनगरच्या पत्त्याने खरं तर चकीत झालो होतो.   दुपारी त्या पत्त्यावर हजर झालो. दार वाजविताच एका प्रसन्न चेहऱ्याने दार उघडले. मी  उस्मानखॉं आहेत का, अशी हिंदीत चौकशी केली. ''तेव्हा आपले काय नाव? असा स्वच्छ मराठी प्रश्न आला.'' ( बहुधा माझे हिंदी ऐकून असावा), मी नाव सांगितले, तेव्हा या बसा झाले.  मला बसवून नंतर हा गृहस्थ आत गेला. बहुधा खॉसाहेबांना आत सांगायला गेला असावा अशी माझी समजूत. पाचच मिनिटांत तेच गृहस्थ पुन्हा संथपणे बाहेर येऊन लोडाला टेकून बसले. व म्हणाले ''बोला काय काम आहे, मी  उस्मानखॉं?''
तो पर्यंत त्या खोलीच्या निरीक्षणानंतर - माझे सर्व पूर्वग्रहरचित भ्रम पार खलासच झाले होते. म्हणजे खॉंसाहेब म्हटले की सर्व विस्कटलेले, पानांनी रंगलेले - मध्येच कुठेतरी पिकदाणी - असली काहीतरी समजूत. हे काहीच नव्हते, खरे तर एखाद्या सुशिक्षीत कुटुंबाला लाजवेल अशी व्यवस्थित व स्वच्छ व्यवस्था. आता तर हे  गृहस्थ इतके शुद्ध मराठी बोलत होते की स्वतःच्या मराठीचीच लाज वाटू लागली. - पुढे कधीतरी त्याबाबत बोलताना, गुरुजी मला म्हणाले ''आनंद, लोक माझ्या नावाने पूर्वग्रह होऊन माझे मराठी हा एक कौतुकाचा विषय करतात, खरं तर मला त्यांच्याबद्दल खंत वाटते - अरे, मी धारवाडला लहानपणी मराठी शाळेतच शिकलो - 54 सालापासून पुण्यातच राहतो आहे, तेव्हा माझे मराठी चांगले नसायचे काय कारण आहे? कारण ती माझी भाषा आहे. आणि आपलीच भाषा आपल्याला चांगली येणे ह्यांत कौतुक ते कसले?'' खरे होते - असाच गुरुजींना कोणा पुढाऱ्याबद्दल ते थोर देशभक्त होते - आहेत असा उल्लेख आला की चीड येते. देशभक्त हे विशेषण कसे होऊ शकते? ते तर प्रत्येकाने असायलाच हवे ना?
तर औपचारिक ओळख झाल्यावर मी त्यांना भेटण्याचा हेतू सांगितला.  ''तुम्ही काहीतरी शिकला आहात तेव्हा मला वाजवून दाखवा व आपण पाहू या.'' मी शिकलेले काहीतरी त्यांना वाजवून दाखविले. ''किती राग झालेत?'' काहीसा मिस्कील प्रश्न आला? आतापर्यंत बरेच बाउंसरस्‌ गेल्याने, मी सावध होतो. त्यामुळे ह्या प्रश्नातला कोकणस्थी तिरकसपणा माझ्या लक्षांत आला, मी काहीच बोललो नाही.
''तुमचा कान बरा आहे, पण बोटे अत्यंत चुकीची बसली आहेत. एखाद्या कोऱ्या पाटीवर लिहिणे सोपे, पण आधीच लिहिले असेल तर ते साफ करून पुन्हा नव्याने सुरुवात करणे अवघड असते. तसेच सवयी मोडायला वेळ लागतो,  व त्याची सर्वसाधारणपणे तयारी नसते. कुठल्याही 'क्लासला' गेले की, किती वर्षे झाली - आणि किती राग झाले हे आजकाल प्रतिष्ठेचे असते, तर याबाबत तुमची इथे निराशा होईल, म्हणून स्पष्टच बोलतो.  पहिल्यांदा इथे विद्यार्थी शिकतो ते वाद्याचे तंत्र, त्यामुळे पहिल्यांदा उजव्या हाताची बोटे चालली की मग डाव्या हाताची बोटे जी स्वरांवरून फिरतात. तेव्हा पहिले काही दिवस, आठवडे किंवा महिनेसुद्धा फक्त सरमग. हे कंटाळवाणे असते हे मला मान्य आहे. परंतु, वाद्याचे तंत्र नीट आत्मसात केल्याखेरीज स्वर टपोरे कसे निघणार? त्यानंतर मी काही रागांची ओळख करून देईन पण एक समजून घ्या की ते राग नव्हेत. तुमचे हात वेगवेगळ्या स्वरांवर सहजतेने फिरू लागावेत म्हणून ती तंत्राची पुढील पायरी. या बरोबरच तुमचे वाजविणे तालांत यावे याचा, म्हणजे तंत्राबरोबर गणिताचा अभ्यास सुरू होतो. संगीताच्या भाषेत म्हणायचे झाले तर तुम्हाला लयीची जाण दिली जाते. आणि या नंतर रागांचा अभ्यास - व त्यानंतर संगीताचा.'' संगीताच्या प्रवासाचे एकेक अंग सहजतेने उलगडले जात होते.
मग एक स्तब्धता! हो पण फक्त बोलण्यात.. एकीकडे त्यांची बोटे सतारीशी हितगुज करायला लागलीच होती.
''वेळेचे काय? मी कुठल्या दिवशी व केव्हा यायचे. ''
पुन्हा एक मिस्कीलसा भाव चेहऱ्यावर उमटलेला दिसला. ''काही क्लासेसमधले जाऊन आलेले दिसताय?'' एक उसळता चेंडू. मी पुन्हा गप्पच राहून तो सोडून दिला.  ''इथे वेळेचे कुठलेही बंधन नाही.  पुण्यात असलो की आठवड्यातले दोन दिवस सोडून जेव्हा मी काही शिकविण्याकरिता बाहेर जातो ते सोडले तर मी इथेच असतो, आणि कोणी ना कोणी शिष्य इथे असतातच. तुम्हाला वेळ असेल तेव्हा यायचे. इथे जे शिकविले जाते ते प्रत्येकालाच शिकायचे असते, कधी ना कधीतरी.. अर्थात पायरी पायरीने. पण कोणाच्याही शिकविण्याकडे इथल्या प्रत्येकाचे लक्ष असावेच. आणि माझेही कोण काय व कसे शिकतो आहे ते लक्ष असतेच.'' माझ्या नकळत बेल्स उडालेल्या होत्या.  
आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न माझ्यापुढे होता. तो म्हणजे हे फी किती घेतात? पण ते विचारायचे कसे? तो पर्यंत एकदोन शिष्यही आसपास असल्याने व शिकविणे चालू असल्याने .. मी आपला मनातल्या मनांत वेगवेगळ्या पद्धतीने शब्दयोजना करीत बसलो होतो. काही वेळानंतर थोडा वेळ तिथे आम्ही दोघेच आहोत हे पाहून मी या बाबत प्रश्न विचारला. पुन्हा एक स्मित झळकले. ''जगण्यासाठी व्यवहार कुणालाही चुकत नाही. पण देवाच्या कृपेने, इथे व्यवहार व्यवसायासारखा चालत नाही. तुम्हाला जे शक्य असेल ते आणि तेव्हा द्या. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की हा क्लास नाही, हे गुरुकुल आहे. तेव्हा अमुक तारखेला तुमची ह्या महिन्याची फी बाकी आहे म्हणून तुम्हाला स्मरणपत्र वा ताकीद दिली जाणार नाही. तसेच तुम्ही खूप पैसे दिले म्हणून इतरांना सोडून मी तुम्हालाच शिकविणारं असे नाही, व उद्या सतार चांगली वाजविता आहात पण तुमच्याकडून फी कमी मिळते म्हणून कमी शिकविलेही जाणार नाही. जो खरा शिकेल त्याला शिकविण्यात मला पैशापेक्षाही जास्त आनंद मिळतो, खरं तर असेच शिष्य मला हवेत.''
मी निरोप घेऊन बाहेर आलो. त्रिफळा केव्हाच उडालेला, अगदी भोपळाही न फोडता. परंतु, तो घेऊनही परतण्यात आनंद असू शकतो, हा पहिलाच अनुभव. मनाची पाटी स्वच्छ व्हायला कुठेतरी सुरुवातही झाल्याचे जाणवले. आयुष्यात खरा गुरु भेटल्यामुळे तरंगतच होतो. आज मी ब्रह्म पाहिले ... हे काही वेगळे असेल का? या ही दिवसांत, अशा पद्धतीने जगणारी माणसे आहेत? .. पाटी कोरी होण्यास सुरुवात झाल्याने,  आयुष्यातल्या खऱ्या शिक्षणाला मघाशीच सुरुवात झाली होती.


क्रमश: