काकाजी गेले

आज सकाळच्या वृत्तपत्रातील "दाजी भाटवडेकर यांचे देहावसान" ही बातमी वाचून मन सुन्न झाले. त्यांची इतर जुनी मराठी किंवा संस्कृत नाटके पहाण्याची फारशी संधी मिळाली नसली तरी 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकातील 'काकाजी'  ही एकच भूमिका त्यांचे नांव स्मरणात कायमचे कोरून ठेवण्यासाठी पुरेशी आहे. स्व.पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेले शब्द व स्वतःचा सहज सुंदर अभिनय यामधून त्यांनी एक अजरामर जीवंत व्यक्तिमत्व रंगभूमीवर उभे केले. उत्तर भारतात राहणाऱ्या मराठी माणसांचे शब्दोच्चार, हावभाव, लकबी वगैरेमधील अगदी सूक्ष्म बारकावे आत्मसात करून त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाद्वारे ते दाखवले. दूरचित्रवाणीवरील इतर अनेक कार्यक्रमामधून त्यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचे दर्शन घडत गेले तसतसा त्यांच्याबद्दल वाटणारा आदरभाव वाढतच गेला. त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली.