विडंबन - अजुन तरी

'अजुन तरी' या शिर्षकाची संदिप खरे यांची एक सुंदर कविता आहे. मुळ कवीची क्षमा मागुन याच कवितेवरुन विडंबनाचा एक छोटासा प्रयत्न करुन पाहिला आहे. मुळ कविता आणि विडंबन दोन्ही सुद्धा देत आहे.


मुळ कविता :


अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा


अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥


आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर


आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर


अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर


मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा


अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥


कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी


कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी


अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी


मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा


अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥


कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी


रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी


सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी


अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा


अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥


कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते


वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते


कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते


मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा


अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥


अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा


अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...


 


विडंबन:


(आजच्या राजकारणी लोकांबद्द्लची स्थिती दर्शविण्याचा हा प्रयत्न)


अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा


खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥


त्यांनी देखील खेळ मांडिला, बंदुक आणि धुर


त्यांना सुद्धा दिसला दुष्काळ, पाउस आणि पुर


अजुन तरी मनी त्यांच्या कसली ना हुरहुर


शिव्या घालिती लोक, म्हणती जन हे तोबा तोबा


खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥१॥


कुणी मिडियाचा मारुन बाण, दाखविली भिती


कुणी धर्माची देउन आण, शिकविली प्रिती


मद सोडुनी पद स्मरा हो, समजावली निती


सगळे व्यर्थ तसाच राहिला, अवगुणांचा ताबा


खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥२॥


दिसला त्यांना किसान राजा, घेउन हाती दोर


कफन लुटले, जवान तरीही गनिमा दावी जोर


वाघही त्यांनी जपला नाही, जपला नाही मोर


निर्लज्ज हे केवळ जपती, 'म्याडम' आणि 'साहेबा'


खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥३॥


मुले उद्याची सवाल करतील, उत्तर असेल काय


तुमचे सगळे चित्त केवळ, चोरुन खाण्या साय


मोहापायी जनतेची, फिकीर केली नाय


जनकल्याणासाठी झगडा, सांगुन गेला शिवबा


खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥४॥


अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा


खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा


 


                                                 ---- सुभाष डिके (कुल)