का तुम्ही? (सवाल जवाब)

सध्या मनोगतावर चालू असलेले रुसवे फुगवे वाचून हा मनोगती आणि प्रशासक याच्यांतला काल्पनिक सवाल जवाब
आमची प्रेरणा सुवर्णमयी यांची कविता का तुम्ही ?

मनोगती:


लिहायचे काय कसे ठरवले का तुम्ही?
प्रतिसादांना इथे अडवले का तुम्ही?


का कोमेजवल्या ह्या शब्दांच्या बागा?
भावार्थ त्यांचे पण जाणले का तुम्ही?


मुक्यांचा संताप बोलका कुठे असतो?
आमचे गळेसुद्धा चेपले का तुम्ही?


कधी केल्यात का सुखदुःखाच्या गोष्टी?
फक्त नियमांचे डोस पाजले का तुम्ही?


हे आपले नाते बेहिशोबी होते
त्यात कधी जिव्हाळे शोधले का तुम्ही?


तुमचा रंग एकवेळ बदलणार नाही
आमचे खरे रंग बघीतले का तुम्ही?


हे असे प्रश्न का विचारले म्हणता?
कधी आम्हाला उत्तर दिले का तुम्ही?

प्रशासक:


लिहायचे नाही असे ठरवले का तुम्ही?
मनोगतींना तसे सांगितले का तुम्ही?


कोमेजल्या का तुमच्या शब्दांच्या बागा?
स्वतःच्या प्रतिभेला विसरले का तुम्ही?


हा तुमचा संताप येवढा बरे नाही
थोड्याश्या निर्बंधांनी चिडले का तुम्ही?


कधी पाळले नाहीत नियम तुम्ही साधे
मग उपदेशाचे डोस पाजले का तुम्ही?


तसे तुमचे नाते हिशोबाचेच होते
सादा विण प्रतिसाद कधी दिले का तुम्ही?


प्रशासक रंग सुद्धा बदलेल एकवेळ
स्वतःचेच खरे रंग पाहिले का तुम्ही?


"केशवा"ने हे असे लिहिले का म्हणता?
तुमच्या वरचे प्रेम हे जाणले का तुम्ही?


-(व्यथित) केशवसुमार.