माझा हा फसवा चेहरा, आरश्यास स्वीकार कैसा
तिथे मी मलाचं भेटताना, अंतःकरणी हाहाकार कैसा
लावलास जिव्हाळा तू, नी जीवही जाळलास तू
माझ्या चितेवर मग, तुझ्या आसवांचा हार कैसा
ज्यांच्या चरणी अर्पिले, स्वतःस फूल बनूनी
पाकळ्यांस माझ्या मग, त्यांच्या काट्यांचा वार कैसा
पिंजऱ्यात कैद शब्द माझे, भोगती सजा जन्मठेपेची
माझ्या कवितांचा मग, मुखामुखातून प्रचार कैसा
मी गाठलाच होता किनारा, भांडून सागराशी
नौकेस माझ्या मग, किनाऱ्याचाच नकार कैसा
श्वासांवरही ना कधी, माझा अधिकार होता
जगण्यावर माझा मग, हा भडिमार कैसा
जिंकून जग सारे, वाह वाह झाली दाही दिशा
न जिंकता आले तुला, इतका मी सुमार कैसा
प्राण पणास लावून, जिंकलो मी झुंझार वृत्तीने
त्यांच्या पराजयाचा मग, मी शिल्पकार कैसा
बांधला आपुलकीचा सेतू, भेटणाऱ्या प्रत्येकाशी
त्यांच्या गळ्यात मग, द्वेषाचा अलंकार कैसा
ऐकून होतो, चढ उतार, आयुष्याच्या दोन बाजू
माझ्या वाट्याला मग, नेहमीच उतार कैसा
सनिल पांगे
(मी रचलेली दूसरीच गझल, जरा संभाळून घ्या.)