बायको

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल माणसं


मज तगादा सोसवेना बायकोचा
पण दुरावाही मिळेना बायकोचा


कारणे ना लागती भांडावयाला
अन गळा काही थकेना बायकोचा


सांगतो मी लठ्ठ होणे ठीक नाही
पण तसा हेतू दिसेना बायकोचा


ओरडूनी फारसा उपयोग नाही
पण कधी शब्द बदलेना बायकोचा


अजगरांना टाळता येथे इथे पण
हा मला विळखा सुटेना बायकोचा


खूप मी प्रयत्न केला चुकवण्याचा
नेम तो काही चुकेना बायकोचा


सांग मी गाठू कशी सम जीवनाची
सूर मजला सापडेना बायकोचा


वाळवंटासम असे हे शुष्क जगणे
(हाय, ओलावा मिळेना बायकोचा)


शर्थ केली टाळण्याची खूप मी पण
जाच हा टळता टळेना बायकोचा


ब्रह्मदेवा, बांधसी गाठी कशा तू?
जन्मभर पिच्छा सुटेना बायकोचा


"केशवा" तू फार नाही वेगळा रे
भोग हा कोणा सुटेना बायकोचा.

-(त्रस्त)केशवसुमार