जाता जाता नजर वळली राहिले काय मागे?

जाता जाता नजर वळली राहिले काय मागे

लावण्याने  भुरळ पडता, राहते भान कोठे?
प्रेमासाठी वणवण किती ही..परी ती न कोठे ...
नाही निद्रा, प्रितिविण कसे श्वासही मंद त्याचे
एके रात्री, प्रियसखि दिसे, भारले चित्त त्याचे 

तोही धावे ,विसरुन जगा, सुंदरीच्याच मागे
आनंदाने, विहरत किती ,गुंफले काव्यधागे
पत्रामध्ये, लिहुन तिजला, धाडले अंतरीचे
वाऱ्यासंगे ,उडवुन निघे, पत्र ती चाहत्याचे....

पाषाणाची, जणु कठिण ती ,अप्सरा देखणीशी
गोळा झाली ,कुसुम हळवी, आसवे पापण्यांशी...
धक्क्याने त्या, विचलित मनी, शोक संताप जागे.
पत्रामागे, उडत  मग  ते ,कारणे शोधु लागे...

जाता जाता ,नजर वळली, राहिले काय मागे?
आता राही, उसवत सई, एकटा जीव मागे......

               - सोनाली जोशी