रविकर तो गोजिरवाणा, झाला सौंदर्याने मोहीत,
धरेस त्या घेण्या कवेत, लक्षलक्ष किरणे पसरित...
लाजलाजूनी धरा शहारे, प्रातःसमयीचे ते रूप,
शितल भासे तेजोनिधी तो, 'वर' असावा अनुरूप..
प्रेमामध्ये चिंब भिजूनी, साद घाली मिलनाला,
दवबिंदूंच्या अक्षता उधळीत, धुकेही आले साक्षील...
शुभ्र धरीला आंतरपाठ, किलबिल किलबिल सनई वाजे,
रंगबिरंगी नभोमंडपी, कोकीळेची तान गाजे....
आंतरपाठ तो विरूनी गेला, संसाराला गती आली,
ऊठ मुकुंदा ऊठ आता, दुनियेला या जाग आली....
- प्राजु.