गर्ट्रूडला सोबत - १

पेल्हॅम ग्रेन्विल वुडहाऊस ह्यांच्या 'Company for Gertrude' ह्या कथेचे मराठी भाषांतर.

लॉंग आयलंड, न्यू यॉर्कच्या 'डोनाल्डसन्स डॉग-बिस्किट्स'च्या गोड मुलीचा नवरा, फ्रेडी थ्रीपवूड, ह्याला त्याच्या सासऱ्याने कंपनीच्या मालाचा खप वाढवायला जेव्हा इंग्लंडला पाठवले तेव्हा त्याला साहजिकच पहिली आठवली ती त्याची आत्या जॉर्जियाना. मागल्या खेपेस तो जेव्हा मायदेशी आला होता तेव्हा तिच्याकडे चार पिकिनिज, दोन पॉमेरॅनियन, एक यॉर्कशायर टेरियर, पाच सीलिहॅम, एक बॉरझॉय आणि एक एयरडेल होते.'डोनाल्डसन्स डॉग-जॉय' ("आपल्या कुत्र्याला डोनाल्डसनच्या मार्गावर आणा") खपवण्यासाठी याहून चांगले घर कोणते? ऑलसेस्टरांच्या घरात दर आठवड्याला किमान दहा पाकिटे तरी सहज खपावी, त्याने विचार केला.

आणि म्हणून, आल्यावर एक-दोन दिवसांत तो लगबगीने अपर ब्रूक स्ट्रीटला तिच्या घरी गेला. तिला भेटून गंभीर चेहऱ्यानिशी घरातून बाहेर पडताना त्याचा ऑक्सफ़र्डचा जूना मित्र बीफी बिंन्घॅम भेटला. सायकल चालवत फ्रेडीच्या ढेरपोटाबद्दल ध्वनीक्षेपकातून टोमणे मारणाऱ्या बीफीला पाहून बरीच वर्षे झाली असली तरी त्याने त्याला लगेच ओळखले. बीफर्स आता पाद्री झालेला दिसत होता. त्याच्या अवाढव्य देहावर पाद्र्यांचे काळे कपडे होते आणि गळ्याभोवती त्यांची खास, बटनाशिवाय, केवळ इच्छाशक्तिच्या जोरावर जागेवर राहणारी, गोल कॉलर होती.

'बीफर्स!' फ्रेडी उद्गारला. पुनर्भेटीच्या आनंदात त्याच्या मनावरील मळभ नाहीसे झाले.
रेवरेंड रुपर्ट बिंघॅमनेही जरी त्याला प्रेमाने अभिवादन केले तरी तो उदास होता, दबलेला होता, जणू काही त्याच्या अनुयायांमध्ये पाखंडी सापडले असावे. तो बोलला तेव्हा त्याचा आवाज कही गुप्त दु:ख असलेल्या माणसाचा आवाज होता.
'फ्रेडी. किती वर्षांनी भेटतोयस. कसा आहेस?'
'मस्त, बीफर्स, अगदी मस्त. आणि तू?'
'ठीक आहे', रेवरेंड रुपर्ट खिन्नपणे म्हणाला. 'या घरात तू काय करत होतास?'
'कुत्र्यांची बिस्किटे विकण्याचा प्रयत्न करत होतो.'
'तू कुत्र्यांची बिस्किटे विकतोस?'
'डोनाल्डस्न्स डॉग-जॉय एकमेवाद्वितीय आहे हे समजण्याइतकी अक्कल लोकांत असली की विकतो. पण तासभर बोलून व तिच्यावर छापील पत्रकांचा वर्षाव करूनही मी हे आत्याला काही पटवू शकलो नाही.'
'आत्या? लेडी ऑलसेस्टर तुझी आत्या आहे हे मला माहित नव्हते.
'मला वाटले साऱ्या लंडनला ठाऊक आहे.'
'तिने तुला माझ्याबद्दल सांगितले?'
'तुझ्याबद्दल? म्हणजे गर्ट्रूडशी ज्या भणंगाला लग्न करायचय तो तू आहेस?'
'हो.'
'धक्काच बसला मला.'
'माझं प्रेम आहे तिच्यावर,फ्रेडी', रेवरेंड रुपर्ट बिंघॅम म्हणाला. 'इतकं प्रेम की कोणीही...'
'हां, हां, आलं लक्षात. पुढचं सगळं पाठ आहे मला. आणि तिचही प्रेम असेल तुझ्यावर, काय?'
'हो, आणि त्यांनी तिला माझ्यापासून लांब ठेवण्यासाठी ब्लॅंडिंग्सला पाठवून दिलय.'
'पण तू गरीब कसा? मला वाटायचे तुम्ही पाद्री चांगले गब्बर असता.'
'नाही रे बाबा.'
'मग आता तू काय करणार आहेस, बीफर्स?'
'तुझ्या आत्याला भेटून समजावीन म्हणतो.'
मित्राला सहानुभूतीपूर्वक बाजूला घेत फ्रेडी म्हणाला, 'त्याचा काही उपयोग नाही, दोस्ता. जी बाई डोनाल्डसन्स डॉग-जॉय विकत घ्यायला तयार नाही तिचं डोकं ठिकाणावर नाही. तिला समजावून काही फायदा नाही. दुसरं काहीतरी करायला हवं. गर्ट्रुड ब्लॅंडिंग्सला आहे, काय? असायचीच. आमचं कुटुंब त्या जागेला तुरुंग समजतं. कुठलीही तरूण मुलगी भलत्या माणसाच्या प्रेमात पडली की तिची रवानगी ब्लॅंडिंग्सला केली जाते. बाबा त्याविषयी नेहमी तक्रार करत असतात. थांब, जरा मला विचार करू दे.'
चालत चालत दोघे पार्क स्ट्रीटला पोहोचले. काही मजूर न्यूमॅटिक ड्रिलने (वाचकांनी ह्यासाठी योग्य व सुटसुटीत मराठी शब्द सुचवावा ही विनंती. ) रस्ता खोदत होते पण जलदगतीने चालणाऱ्या फ्रेडीच्या मेंदूच्या आवाजामुळे ड्रिलचा आवाज ऐकू येत नव्ह्ता.
'सापडले', तो थोड्या वेळाने म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरील तणाव निवळला. 'तुझं नशीब चांगलं म्हणून मी काल रात्री रोझॅली नॉर्टन व ऑटो बिंग ह्यांचा चित्रपट 'भरकटलेली ह्रदयं' पाहायला गेलो होतो.बीफर्स, तू उद्या दुपारी ब्लॅंडिंग्सला जातोयस.'
'काय!?'
'दुपारच्या जेवणानंतर पहिल्याच गाडीने. मी सगळी योजना आखली आहे. 'भरकटलेली ह्रदयं' मध्ये एक गरीब पण चांगला युवक एका श्रीमंताघरच्या मुलीवर प्रेम करत असतो. तिने त्याला विसरावे म्हणून तिचे आई-वडिल तिला गावी घेऊन जातात. काही दिवसांनी तिथे त्यांच्या घरी एक गूढ, अनोळखी माणूस येतो, तिच्या आई-वडिलांवर आपली छाप पाडतो व त्यांच्या मुलीला मागणी घालतो. ते होकार देतात, लग्न होतं व त्यानंतर तो दाढी-मिशा काढून टाकतो आणि तो जिम असतो!'
'हो, पण...'
'वाद घालू नकोस. हे ठरलं. आत्याला धडा शिकवायलाच हवा. मला वाटलं होतं ही बाई आपल्या नातलगाचा धंदा वाढवण्यास आनंदाने मदत करेल, खास करून नमुन्यादाखल पंधरवड्याचा माल फुकट देऊ केल्यावर. कसलं काय! ती पिटरसन्स पप फूड सारख्या बंडल बिस्किटांना चिकटून बसली आहे. तुला सांगतो, जराही जीवनसत्त्वं नसतात त्याच्यात. आजपासून मी पूर्णपणे तुझ्या बाजूने आहे.'
'खोट्या दाढी-मिशा?' रेवरेंड रुपर्टने शंका काढली.
'त्याची तुला गरज नाही. माझ्या बाबांनी तुला बघितलेलं नाही ना?'
'नाही, मी लॉर्ड एम्स्वर्थना भेटलेलो नाही.'
'मग झालं तर.'
'पण मी तुझ्या वडिलांना खूश करून काय फायदा? ते गर्ट्रूडचे फक्त मामा आहेत.'
'काय फायदा ? मित्रा, तुला माहित आहे का बाबा केवढे मोठे जमीनदार आहेत ? आसपासची मैलोन्मैल जमीन त्यांची आहे. पाद्ऱ्यांच्या कितीतरी नोकऱ्या त्यांच्या हातात आहेत - उत्तम पगाराच्या - आणि त्या नोकऱ्या ते मनात येईल त्याला देऊ शकतात. मला माहीत आहे कारण एकेकाळी मला पाद्री बनवण्याचा विचार होता. मीच तयार झालो नाही.'
रेवेरेंड रुपर्टचा चेहरा उजळला.
'फ्रेडी, तू म्हणतोयस त्यात तथ्य आहे.'
'नक्कीच.'
'पण तुझ्या बाबांना मी खुश कसा करू?'
'अगदी सोपं आहे.सतत त्यांच्या आजूबाजूला रहा. त्यांचा प्रत्येक शब्द झेल. त्यांच्या कामात रस घे. त्यांची कामं कर. खुर्चीतून उठायला मदत कर...अरे, मी मनात आणलं तर स्टालिनला पटवीन. जा, जा, टूथब्रश आणि सामान बांध, मी त्यांना फोन करतो.'

लंडनमध्ये साधारण ज्या वेळी हे अर्थगर्भ संभाषण होत होतं त्या वेळी दूर श्रॉपशायरमध्ये एम्स्वर्थचा नववे अर्ल, क्लॅरेन्स, ब्लॅंडिंग्स किल्ल्याच्या वाचनालयात कुढत बसले होते. सहसा त्यांचे लाड पुरवणाऱ्या नशिबानं अचानक कमरेखाली घाव घातला होता.
असं म्हणतात की ग्रेट ब्रिटन अजूनही जगातल्या शक्तिमान देशांपैकी एक आहे, आदरपात्र आहे. असं असेल तर ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. पण भविष्याचं काय? लॉर्ड एम्स्वर्थ स्वत:ला हेच विचारत होते. हे सुख टिकेल का? त्यांना असं वाटत नव्हतं. नकारात्मक होण्याची इच्छा नसूनही त्यांना कळेना की ज्या देशात मॅचिंघॅम हॉलच्या सर जॉर्ज पार्स्लोसारखी माणसं राहतात तो देश टिकेल कसा.
कडक टिका ? नि:संशय. कटू ? मान्य. पण आम्हाला वाटतं, फार कडक नाही, आणि परिस्थिती लक्षात घेतली तर फार कटूही नाही. काय घडलय पहा.
लॉर्ड एम्स्वर्थची सर्वोत्कृष्ट डुकरीण, ब्लॅंडिंग्सची महाराणी, हीची सत्त्याऐंशीव्या श्रॉपशायर शेतकी प्रदर्शनातील ' जाड डुक्कर' गटात सरशी झाल्यानंतर जेव्हा जॉर्ज सिरिल वेलबिलवेड ह्या त्यांच्या डुक्करं साभांळणाऱ्यानं राजीनामा देण्याची आणि अन्यत्र नोकरी शोधण्याची मनीषा व्यक्त केली तेव्हा त्यांना खेद वाटला असला तरी राग आला नाही. त्यांना वाटलं वेलबिलवेड मंडळींची भ्रमर वृत्ती ह्याला कारणीभूत असेल. जॉर्ज सिरिलला श्रॉपशायरचा कंटाळा आला असेल व हवापालट करण्यासाठी एखाद्या दक्षिणेच्या वा पूर्वेच्या परगण्यात जायचे असेल, असा त्यांचा समज झाला. त्याच्या जाण्याचा त्रास नक्कीच होणार होता कारण, शुद्धीत असताना वराहपालनात तो दादा माणूस होता. डुकरांना तो आवडायचा. पण त्याला जर राजीनामा द्यायचाच होता तर काहीच करता येण्यासारखं नव्हतं.
पण, जेव्हा आठवड्याच्या आत, लॉर्ड एम्स्वर्थना बातमी मिळाली की तो ससेक्स वा नॉरफोक वा केंट किंवा अजून कोठे स्थलांतरित झालेला नसून कोपऱ्यावरच, मच मॅचिंघॅम ह्या शेजारच्या गावात मॅचिंघॅम हॉलच्या सर ग्रेगरी पार्स्लो-पार्स्लोकडे नोकरी करत आहे तेव्हा त्यांचे डोळे उघडले. दगाबाजी झाली होती.जॉर्ज सिरिल वेलबिलवेडने स्वत:ला विकले होते, आणि सर ग्रेगरी पार्स्लो-पार्स्लो, ज्याला ते एक तत्त्वनिष्ठ मित्र व आपल्यासारखा मॅजिस्टेट समजत होते, तो दुसऱ्यांच्या डुक्करं सांभाळणाऱ्यांना फूस लावून पळवून नेणारा एक नराधम म्हणून समोर आला होता.
अन ते त्याबद्दल काहीही करू शकत नव्हते.
भयानक!
पण सत्य.
लॉर्ड एम्स्वर्थ ह्या भीषण परिस्थितीचा विचार करण्यात इतके गढून गेले होते की दारावर दुसऱ्यांदा थाप पडली तेव्हाच ती त्यांच्यापर्यंत पोहोचली.
'आत या', ते म्हणाले.
बाहेर गर्ट्रूड नसावी अशी त्यांनी आशा केली. फार उदास तरुणी. या क्षणाला ते तिचा सहवास सहन करू शकत नव्हते.
गर्ट्रूड नव्हती. बटलर बीच आला होता.
'फ्रेडरिकसाहेब आपल्याशी दूरध्वनीवरून बोलू इच्छितात.'
जिना उतरून फोनपर्यंत जाताना लॉर्ड एम्स्वर्थ अजून उदास झाले. त्यांचा अनुभव होता की फ्रेडिशी कोणत्याही प्रकारचा संपर्क काहीतरी अडचणी घेऊन यायचा.
परंतु यंत्रातून येणाऱ्या त्यांच्या मुलाच्या आवाजात गडबड सूचित करणारे कोणतेही भाव नव्हते.
'नमस्कार, बाबा.'
'बोल, फ्रेडरिक.'
ब्लॅंडिंग्सला सगळं कसं आहे?'
आपल्या मनातल्या काळज्या लॉर्ड एम्स्वर्थ फ्रेडीसारख्या बडबड्याला सांगणार नव्हते. सांगताना त्रास झाला तरीही त्यांनी ब्लॅंडिंग्सला सारं काही व्यवस्थीत आहे असंच सांगितलं.
'छान!', फ्रेडी म्हणाला.'आपलं हॉटेल सध्या पूर्ण भरलेलं आहे का हो?'
'तू जर ब्लॅंडिंग्स किल्ल्याबद्दल म्हणत असशील तर सध्या इथे फक्त मी व तुझी आते-बहीण गर्ट्रुड आहोत.का?' त्यांनी घाबरून विचारलं.'तुझा येण्याचा विचार-बिचार आहे की काय?'
'काहीतरीच काय?'तितकाच घाबरून त्यांचा मुलगा बोलला. 'नाही,म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. मला आवडलं असतं यायला पण सध्या मी डॉग-जॉयच्या कामात आहे.'
'हा पॉप-जॉय कोण?'

'पॉपजॉय? पॉपजॉय? अरे हो, तो माझा एक मित्र आहे. तुम्ही त्याला काही दिवस तिथे ठेवून घ्या. चांगला माणूस आहे, आवडेल तुम्हाला. ठीक आहे तर मग, मी त्याला सव्वा-तीनच्या गाडीने पाठवून देतो.'
लॉर्ड एम्स्वर्थच्या चेहऱ्यावर असे काही भाव आले की इंग्लंडच्या दूरध्वनींवर अद्याप दूरचित्रवाणीची सोय नसणे हे त्यांच्या सुपुत्राचं सुदैव ठरलं. फ्रेडीच्या कोणत्याही दोस्ताला आसपासच्या पन्नास मैलातही फिरकू देण्यास जळजळीत नकार देण्यासाठी ते श्वास गोळा करीत होते तेव्हढ्यात फ्रेडी पुढे बोलला.
'गर्ट्रूडला त्याची सोबत होईल.'
हे शब्द ऐकून लॉर्ड एम्स्वर्थमध्ये कमालीचा बदल झाला. त्यांचा चेहरा सैलावला. त्यांचे वटारलेले डोळे पूर्ववत झाले.
'खरंच की', ते उद्गारले. 'हे अगदी खरं. त्याची तिला सोबत होईल. सव्वा-तीन म्हणालास का? मी मार्केट ब्लॅंडिंग्सला गाडी पाठवीन त्याला घ्यायला.'

गर्ट्रूडला सोबत? एक आनंददायी विचार. एक सुवासिक, तजेलदार, चेतनामय विचार. जॉर्जियाना ह्या त्यांच्या बहिणीने गर्ट्रूडला त्यांच्याकडे सोपवल्यापासून कोणीतरी अधून-मधून तिची जबाबदारी घ्यावी ह्यासाठी ते प्रार्थना करत होते.
प्रेमभंग झालेल्या मुलीला आपल्या घरी ठेवण्याचा तोट्यांपैकी मुख्य तोटा म्हणजे ती घरभर सत्कार्य करत फिरण्याची शक्यता फार असते. आता तिच्या आयुष्यात केवळ इतरांशी चांगुलपणाने वागणंच उरलेलं असतं, व ती त्यांच्या गळ्याशी येईस्तोवर चांगलं वागणार असते. गेले दोन आठवडे लॉर्ड एम्स्वर्थची ही तरुण, सुंदर भाची ओढलेल्या चेहऱ्यानिशी किल्ल्यात इथून तिथे फिरत होती, जिथे तिथे सत्कार्य करत होती, आणि लॉर्ड एम्स्वर्थ सगळ्यात सोयीस्कर असल्याने त्यांना त्याचा सर्वाधिक मारा सहन करावा लागत होता. त्या दिवशी फोनवर फ्रेडीशी बोलल्यावर पहिल्यांदा तिला पाहून त्यांच्या ओठांवर स्मितहास्य होतं.
'काय चाललय?', ते हसून म्हणाले.
उत्तरादाखल त्यांच्या भाचीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं नाही. तिच्याकडे पाहून असं भासत होतं की ही मुलगी हसायचं कसं हेच विसरून गेली होती.मेटरलिंकच्या पुस्तकातील एखाद्या प्रतीकासारखी दिसत होती ती.
'मी तुझी अभ्यासिका आवरत होते, क्लॅरेन्समामा', ती मरगळलेल्या आवाजात बोलली.'केव्हढा पसारा झाला होता.'
आपली पाठ फिरली असताना बाईला आपल्या अभ्यासिकेत घुसू देणारा, ठराविक सवयींचा पुरुष जसा दचकेल तसे लॉर्ड एम्स्वर्थ दचकले, पण धीराने हसून म्हणाले,' मी नुकताच फ्रेडीशी फोनवर बोललो.'
'हो, का?', गर्ट्रूड उसासली, अन हॉलमधून जणू काही बर्फाळ वारा वाहत गेला. 'तुझा टाय (भाषांतरकाराची नोंद: टायला कंठलंगोट म्हणणं जीवावर आलं) वाकडा आहे, क्लॅरेन्समामा.'
'मला तो वाकडाच आवडतो', लॉर्ड एम्स्वर्थ मागे होत बोलले. 'तुझ्यासाठी बातमी आहे. फ्रेडीचा एक मित्र इथे राहायला येत आहे. त्याचं नाव, मला वाटतं, पॉपजॉय आहे. तुला तरुण माणसाची सोबत होईल.'
'मला तरुण सोबत नकोय.'
'असं का म्हणतेस?'
तिनं त्यांच्याकडे मोठ्ठ्या डोळ्यांतून गंभीर नजरेनं पाहिलं. तिच्या तोंडून अजून एक उसासा गेला.
'क्लॅरेन्समामा, तुझ्यासारखं म्हातारं असणं किती चागंलं,नाही?'
'काय?' लॉर्ड एम्स्वर्थना धक्का बसला.
'असं जाणवणं की आपण थडग्यापासून, कबरीच्या अमीट शांततेपासून फक्त एका छोट्याशा पावलाच्या अंतरावर आहोत. माझ्यासाठी आयुष्य जणू संपता संपत नाही, एखाद्या लांबलचक वाळवंटाप्रमाणे.तेवीस. फक्त तेवीसची आहे मी. अन आपल्या घराण्यात सगळे साठपर्यंत जगतात.
'साठ काय साठ?' येणारा वाढदिवस साठीचा असणाऱ्या माणसाच्या त्वेषाने लॉर्ड एम्स्वर्थ बोलले. 'माझे बिचारे वडिल सत्त्याह्त्तरचे होते जेव्हा शिकार खेळताना मारले गेले. माझे काका रॉबर्ट जवळ-जवळ नव्वद वर्षं जगले. माझा चुलत-भाऊ क्लॉड चौऱ्याऐंशीचा होता जेव्हा घोड्यावरून पडून मान मोडल्यामुळे मेला. माझा मामा, ऍलिस्टर...'
'नको!' ती शहारून म्हणाली. 'नको! हे ऐकून सगळं कसं भयाण, निराशाजनक वाटतं.'
हो, अशी होती गर्ट्रूड, आणि लॉर्ड एम्स्वर्थच्या मते तिला सोबतीची गरज होती.

रात्रीच्या जेवणाआधी जेव्हा पॉपजॉय त्यांना ड्रॉईंग रूममध्ये भेटला तेव्हा लॉर्ड एम्स्वर्थचं त्याच्याबद्दलचं मत अत्यंत चांगल बनलं. हा त्यांच्या मुलाचा मित्र अंगानं उंचापूरा अन धिप्पाड होता. त्याचा चेहरा साल्मन माशाच्या मांसाच्या रंगाचा, भोळा व भांबावलेला होता. ही गोष्ट मात्र त्याच्या फायद्याची ठरली. नव्या पिढीच्या तरुणात संकोचासारखी भावना पाहून लॉर्ड एम्स्वर्थना सानंद आश्चर्य झालं.
म्हणूनच त्यांनी त्याच्या गुलाबाच्या झुडपांवर होणारी कीड ह्या फारशा विनोदी नसणाऱ्या विषयावरही चर्चा करताना अंगात आल्यागत हसण्याच्या सवयीला नजरेआड केलं. त्याचं 'गरमी वाढतेय,नाही?' सारखं वाक्य विनोदी समजणंही त्यांनी फारसं मनावर घेतलं नाही. आणि जेव्हा गर्ट्रूड आल्याबरोबर तो टुणकन उठून नाजूक व्हास व फोटोफ्रेम्सनं लदबदलेल्या एका मेजाबरोबर गुंतागुंतीचा नाच करू लागला तेव्हा गर्ट्रूडच्या अन त्याच्यासोबत तेही हसू लागले.
हो, आश्चर्यकारक भासलं तरी पॉपजॉयला बघितल्याबरोबर त्यांची भाची गर्ट्रूड हसू लागली होती. गेल्या दोन आठवड्यांची उदासी गायब झाली होती. ती हसली. तो पण हसला. एखादं विनोदी नाटक पाहून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांसारखे ते दोघे हास्याच्या धबधब्यात सचैल न्हात जेवायला गेले.
जेवताना त्याने सूप सांडलं, एक वाईन-ग्लास फोडला, आणि जेवण झाल्यावर दार उघडायला उडी मारून उठताना पुन्हा एकदा पडता पडता वाचला. हे सर्व पाहून गर्ट्रूड हसली, तो हसला, आणि लॉर्ड एम्स्वर्थही हसले - पण त्या दोघांइतके मनापासून नाही, कारण तो वईन-ग्लास त्यांच्या आवडत्या संचातील होता.
पण पोर्टचे घुटके घेत घेत नफा-नुकसानीचा हिशोब केल्यावर लॉर्ड एम्स्वर्थला आपण फायद्यात असल्यासारखं वाटलं. हो, त्यांनी घरात एका अर्धवट डोक्याच्या डोंबाऱ्याला घेतलं होतं. पण फ्रेडीचा कोणताही मित्र हा डोक्यानं अधू असायचाच, आणि, मुख्य म्हणजे, गर्ट्रूडला त्याचा सहवास आवडत होता.

क्रमश:

पुढे वाचा...