आणखी असाच निर्विकार दिवस सरला. सांज उतरली.
राजगरुडाचे डोळे वाट पाहून शिणले.
पण ती आली नाही- आलीच नाही.
कदाचित शक्य झाले नसेल तीला-
त्रिकालाच्या कैदेतून सुटणे.
दिक्पालांच्या कडक पहाऱ्याचा भेद करणे.
किंवा आमंत्रिले असेल तीला शुभ्र, देखण्या पंखांच्या राजहंसाने.
अन् मोहून ती त्याच्यातच गुंतली असेल.
ते जे काही असेल ते. पण परिणामी -
त्या दिसाला पडलेले स्वप्न तडा पडून केव्हांच भंगून गेले.
नाक मुरडत रविराजाने आक्रसून घेतली आपली सुवर्णकिरणे.
निळ्या आभाळाच्या निरभ्र मांडवाला लागली अभ्रांची कोळीष्टके.
अन् राजगरुडाकडे पहात वारा खो खो हसायला लागला.
त्या नि:स्तब्ध स्थिरचित्रात अगांतुकपणे घुसून.
सर्वाना खट्याळ दुसण्या देत....सर्वांची रेवडी उडवत.
सुगंधाला त्याने पिटाळून लावले.
पाकळ्यांचा नरम रुजामा विस्कटून टाकला.
गुलमोहोर त्याच्या तालात अलिप्तपणे डोलू लागले.
दुष्टपणे सळसळ हसून त्यानी धुमाकूळ घातला.
जाई-जुई हिरमुसल्या होऊन पेंगू लागल्या.
अश्वत्थाची पानगळ तीव्र झाली.
राजगरुडाने ते व्यथितपणे पाहिले व एक करूण सित्कार काढला-
अवकाशात ऊरीपोटी झेप घेतली.
एकेका अवरोहाबरोबर तो पंखापंखातून झडत गेला.
नि एकेक निर्विकार पीस तरंगत तरंगत खाली गळत गेले.
त्या ऊरीपोटी घेतलेल्या आवेशपूर्ण झेपेबरोबरच
टपकन् त्याचे रक्तबंबाळ हृदय खाली पडले व धुळीत लोळू लागले.
क्षणभरच विस्मित-स्तिमित होऊन साऱ्यांनी
राजगरुडाची ती वेडीविद्रूप, विच्छिन्न, उध्वस्त झेप पाहिली.
वरमलेला वारा क्षणार्धच स्तब्ध झाला.
न मग ते साचलेले खिन्न मळभ ओरबाडत निर्विकार वाहू लागला.