यंदा कर्तव्य आहे !! - भाग १

नमस्कार मंडळी !!

मी मनोगताची नियमीत वाचक व सदस्य आहे,परंतु स्वतः लिहीण्याची ही पहिलीच वेळ ! तेव्हा चुकांबद्दल क्षमस्व !कोणत्याही संस्थेबद्दल किंवा कार्यपद्दतीबद्दल टिप्पणी करण्याचा माझा अजिबात हेतु नाही पण मी जो अनुभव घेतला तो आपल्यासमोर मांडावासा वाटला इतकंच.

 आपल्याकडे मुलामुलींची लग्न ठरवणं म्हणजे एक मोहिम आणि साऱ्या सग्या-सोयऱ्यांच्या चर्चेचा विषय असतो‌ . किती नशीबवान असतात ती लोकं ज्याना चहापोह्याच्या दिव्यातून जावं लागत नाही. सुदैवाने मला देखील हे सग़ळं करावं लागल नाही किंवा लग्नासाठी चहापोह्याचे कार्यक्रमही करावे लागले नाही.अहो ,मी काही प्रेमविवाह नाही केला पण आईवडिलांना स्थळांसाठी मुलाकडच्यांचा follow-up करण्याची पण गरज पडली नाही.

एका दिवशी मला आई बरोबर एका विवाहसंस्थेत (Marriage Bureau) जावं लागलं. नुकतंच आईने माझं नाव तिथे नोंदविलं होतं. काय सांगु,कधी कधी जावं लागतं मनाविरुद्ध !! असो .

 त्या जेमतेम ८०० चौरस फ़ुटाच्या जागेत ३ खोल्या होत्या. एक संस्थेच्या कार्यालयाची,दुसरी उमेदवार वधूं आणि त्यांच्या पालकंची आणि तिसरी उमेदवार वर व त्यांच्या पालकांची. कार्यालयाच्या खोलीत वर-वधू ची महिती असलेले रजिस्टर्स होते आणि व्यवस्थापक ,त्यांचे मदतनीस वगैरे ची टेबल्स होती. आपण किती मोठे समाजकार्य करतो आहे असा कहिसा भाव होता. आपण किती मोठे समाजकार्य करतो आहे असा काहिसा त्यांचा सुर वाटत होता.मी म्हटलं "कसलं समाजकार्य , चांगले ५०० रु. घेता की फ़क्त नाव नोंदवुन स्थळं दाखवायला.. " मनात हो ! इतकी काही मी उद्धट नाही हं...

वधूपक्षाची खोली या खोलीला लागुन होती.बसायला ७-८ बेंच ठेवले होते.म्हणजे जर कुणालाही कार्यालयात जायचे असेल तर ही खोली पार करुन जायला लागेल. जर माझ्यासारखी कुणी मुलगी आली तर लागल्याच बघुन पण घेता येईल नाही का ?

 वरपक्षाची खोली मात्र जरा वेगळी होती.म्हणजे जरा शांत आणि अलिप्त .कुणी अगदी वाकूनच पाहिलं तरंच काही दिसेल अशी. आत गेल्या गेल्या मला आधी ही गोष्ट खटकली.हे असं का बरं? मुलांच्या साठी वेगळी अलिप्त खोली मग मुलींच्यासाठी का नाही?

आधीच फ़ार उत्साहाने गेले होते आणि त्यात तिथल्या वातावरणाने मला आणखीनंच त्या सगळ्याचा वैताग येऊ लागला ! आईकडे ही गोष्ट बोलुन दाखवल्यावर मातृसुलभ समजविण्याच्या सुरात ती म्हणाली "पूजा असंच असतं आपल्याला या समाजात रहायच तर इथले काही नितीनियम पाळावेच लागतात आणि त्याप्रमाणेच वागावं लागतं " ठिक आहे असं म्हणुन आत शिरले