आज २७ फेब्रुवारी, स्व.कुसुमाग्रजांचा जन्मदिन! मराठी भाषेत अजरामर साहित्य-शिल्पे निर्माण करणाऱ्या ह्या साहित्य-सम्राटाच्या स्मॄतीला, ही एक लहानशी काव्य-पुष्पांजली!
तात्या, अपुली आठवण येते!
छंदोमयी, विशाखा, फिरुनी,
आज मनी अवतरते,
तात्या, अपुली आठवण येते!
माय मराठी अनाथ आहे,
तिला कुणाची, न साथ आहे,
पुन्हा पाहण्या गत-वैभव ही, आज तुम्हा स्मरते,
तात्या, अपुली आठवण येते!
आज मनांचा 'कणा' मोडला,
प्रलय भयंकर पूर जाहला,
'लढ' म्हणण्या ही पाठ हो तुमच्या, प्रेमळ हाता स्मरते,
तात्या, अपुली आठवण येते!
नटसम्राट हा खिन्न उभा का?
दु:ख सांगण्या, शब्द शोधी का?
'घर देता का घर' ही वेदना पुन्हा ऊरी जागते,
तात्या, अपुली आठवण येते!
-- मानस६