बलात्कारी तहसिलदार फ़रार-- पोलिसांचे संरक्षण

बलात्कारी तहसिलदार फ़रार-- पोलिसांचे संरक्षण

नागपूर जिल्ह्यातील काटोलचे तहसिलदार श्री मनोहर रघुनाथ चव्हाण हे आपल्याच हाताखाली काम करणाऱ्या एका दलित महिला पटवाऱ्याचे लैंगिक शोषण करुन सध्या फ़रार असून त्यांना जिल्हा पोलिसांचे चांगले संरक्षण मिळत आहे. या बलात्कारी तहसिलदाराने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दाखल केलेला अर्ज २३.०२.२००७ रोजीच फ़ेटाळला गेला असून नागपूर जिल्ह्यातच खूलेआम फ़िरणारा हा आरोपी पोलिसांना कसा दिसत नाही असा प्रश्न उत्पन्न झाला आहे.

उच्चशिक्षीत असून आणि चांगल्या अधिकारपदावर असूनही आपल्या हाताखाली काम करणाऱ्या दलित महिला कर्मचाऱ्यावर सतत बलात्कार करणारा हा भामटा फ़रार असल्यामुळे आणि पोलिस दुर्लक्ष करीत असल्यामुळे काटोल तालुक्यात खैरलांजीसारखा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मूळचा सांगली जिल्ह्यातला असणारा आणि नोकरीनिमित्ताने काटोलला वास्तव्यास असणारा हा तहसिलदार तलाठी रेकॉर्ड तपासण्याचे उद्देशाने रात्री बेरात्री संबंधित दलित महिला पटवाऱ्याच्या घरी जावून तिचे लैंगिक शोषण करीत असे. तसे करताना हा लबाड तिला लग्नाचेही आमिष देत असे. आपल्या अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या या दलित महिलेला तिची फ़सवणूक झाल्याचे कळताच तिच्यावर आभाळच कोसळले.