होळी - एक सुरक्षा झडप?

भक्त प्रह्लादाला होलिका नांवाची एक दुष्ट आत्या होती. तिला अग्नीमध्ये न जळण्याचे वरदान मिळालेले होते. त्याचा उपयोग करून प्रल्हादाला जीवंत जाळून टाकण्याचे कारस्थान तिने रचले व त्याला गोड बोलून तिने आपल्या मांडीवर घेतले आणि सर्व बाजूंनी आग पेटवून दिली. पण प्रल्हादाऐवजी ती स्वतःच त्यात जळून खाक झाली अशी होळीची गोष्ट पुस्तकी पंडित सांगतात. उत्साहाने प्रत्यक्ष होळी पेटवणारे किती लोक त्या होलिकेची किंवा प्रह्लादाची आठवण त्या वेळी काढतात याबद्दल मला तरी शंकाच आहे.

मला असे वाटते की पूर्वीच्या काळात जेंव्हा ग्रामपंचायती व नगरपालिका नव्हत्या त्या काळात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सार्वजनिक व्यवस्था नव्हती. त्यामुळे घरोघरी वर्षभर अडगळ जमत असे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात येणाऱ्या होळी पौर्णिमेला त्यातल्या निरुपयोगी अडगळीच्या वस्तू जाळून टाकून थोडी जागा रिकामी होत असेल. त्याचप्रमाणे शिशिर महिन्यात झाडावरून गणलेली पाने खाली पडून झालेल्या कचऱ्यातील थोडा भाग शेकोट्या पेटवण्यात खर्च होऊन गेल्यावर उरलेला ढिगारा वसंताच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या होळीला जाळून टाकत असतील. 

सामान्य माणसाच्या मनात कुठेतरी एक विध्वंसक प्रवृत्ती असते असे म्हणतात. होळीच्या निमित्ताने तिला एक संधी देऊन तिचा माफक उद्रेक करू दिला तर ती इतर वेळी आटोक्यात ठेवणे सोपे जात असेल. स्वातंत्र्याच्या लढ्याच्या वेळी आयात केल्या गेलेल्या परदेशी कापडांच्या होळ्या पेतवल्या गेल्या व त्यामुळे त्याला देशभक्तीचीही जोड मिळाली.

होळीच्या दिवशी अर्वाच्य शिव्या घालण्यामागे काय सामाजिक प्रयोजन असू शकेल? कांही मानसशास्त्रज्ञांच्या मते मनातील मळमळ याद्वारे निघून गेली तर मन स्वच्छ होते म्हणे. खेडोपाड्यात पूर्वीच्या काळी वापरल्या जाणाऱ्या ग्राम्य भाषेत प्रत्येक वाक्याला शिवीचे इंजिन व गार्डाचा डबा असायचाच. कदाचित अजूनसुद्धा असत असेल! त्यामुळे होळीच्या दिवशी त्यापेक्षा वेगळ्या जालिम शिव्या घालत असतील व मधले साधे डबे जाळून टाकून फक्त इंजिने व गार्डाच्या डब्यांची गाडी बनवत असतील! हा आपला माझा अंदाज आहे. जाणकार लोकांनी यावर प्रकाश टाकावा.