याला काय म्हणावे (दुसरी बाजू)

गुंगीमधून शुद्धीवर येत असतांना प्रमिलाला कसल्या तरी स्पर्शाची जाणीव झाली. जड झालेल्या डोळ्यांच्या पापण्या किलकिल्या करून तिने पाहिले. नर्स तिचा रक्तदाब पहात होती. प्रमिलाने डोळे उघडलेले पहाताच तिने लगेच तिला अभिवादन करून "आता कसं वाटतंय्?" असे विचारले. प्रमिलाने एक क्षीण स्मितहास्य करायचा प्रयत्न केला. मणामणाने जड झालेले ठणकणारे अंग, त्यावर एवढे मोठे बॅंडेज बांधलेले, हाताच्या पंजाच्या मागे सुई खुपसून लावलेले सलाईन या सगळ्या परिस्थितीमध्ये तिला इतकेच करणे शक्य होते. "आता अजीबात जागचं हलायचं नाही. कांही लागलं तर ही हाताशी ठेवलेली बेल वाजवायची. कांही काळजी करू नका. सगळं ठीक होऊन जाईल." वगैरे वाक्ये नर्स सराईतपणे बोलत असतांनाच प्रमिलाची भिरभिरती नजर कुणाला तरी शोधत आहे असे नर्सला दिसले. हंसून ती म्हणाली, "तुमचे मिस्टर बाहेर बेंचावर बसले आहेत. आता या वेळी इथे स्त्रियांच्या कक्षात त्याना यायची परवानगी नाही, पण फक्त एक मिनिटासाठी त्यांना मी आत सोडते. त्यांच्याबरोबर बोलत बसायचं नाही बरं."

थोड्याच वेळात प्रमोद आंत आला. त्याला पाहताक्षणी प्रमिलाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागले. तिच्या केसातून हात फिरवीत तो म्हणाला,"असं रडतेस काय वेडाबाई? दुखणं कांही कुणाला सांगून येत नाही. मी डॉक्टरना भेटलो आहे. तुझं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं आहे. थोडे दिवस काळजी घ्यायची आहे आपण, त्यानंतर तू उड्या मारायला लागशील." "मुलं.." एवढेच प्रमिलाने म्हणताच तो म्हणाला, "अगं मुलं छान झोपली आहेत. ती कांही अजून कुक्कुली बाळं राहिली नाहीत. तू त्यांची मुळीच काळजी करू नकोस. आणि मी आहे ना?"
"किती?" प्रमिलाने मनगटाकडे पहात विचारलं.
"एक वाजायला आला आहे. आता मीसुद्धा जाऊन थोडा वेळ पडतो. तूही शांतपणे झोपून घे. गुड नाईट." असे म्हणून तो निघाला. प्रमिलाचे मन क्षणार्धात तिच्या घरी जाऊन पोचले. "अनिकेत आणि अद्वैत खरंच काय करीत असतील? त्यांनी रात्री काय खाल्लं असेल? त्यांना झोपतांना कोणी दूध विचारलं असेल कां? आई वडील दोघेही जवळ नसतांना त्यांना झोप लागली असेल कां? प्रमोद म्हणतो की ती आता मोठ्ठी झाली आहेत. कसली डोंबलाची मोठी? अजून सारखी आपल्या आगेमागे घुटमळत तर असतात. त्यांना काय हवंय् नकोय् ते फक्त आपल्यालाच सांगतात, आणि आपल्याला तरी त्यांच्यावाचून कुठे करमतं? ...." असे विचार तिच्या मनात थैमान घालीत राहिले.

दुसरे दिवशी सकाळी येतांना प्रमोद एका मोठ्या लेदरच्या पर्समध्ये तिचा ब्रश, पेस्ट, कंगवा, आरसा, पॉवडर, क्रीम, परफ्यूम वगैरे वस्तु घेऊन आला. त्याशिवाय एक सफरचंद, दोन केळी, दोन तीन पुस्तके, मासिके वगैरे त्याने पिशवीत घालून आणले होते. गुंगीचा असर उतरून प्रमिला आता पूर्णपणे शुद्धीवर आली होती. मंद हंसून तिने त्याचे स्वागत केले. तो म्हणाला,"पहा, मला जेवढ्या वस्तु सुचल्या, सापडल्या तेवढ्या घेऊन आलो आहे. तुला आणखी कांही पाहिजे असेल तर दुकानं उघडल्यावर इथूनच आणून देईन. आता डॉक्टर आल्यावर खायचं प्यायचं काय पथ्यपाणी आहे तेही विचारून तुझ्यासाठी कांही तरी घेऊन येईन. आणि हो, मुलांना शाळेत पाठवूनच इकडे आलो, त्यामुळे थोडा वेळ झाला. दोन दोन सॅंडविचं बनवून त्यांना डब्यात दिली आहेत."

प्रमिलाच्या मनात विचार येत होते,"काल रात्री एक वाजेपर्यंत हा इथे थांबला होता. त्यानंतर अपरात्री त्याला कुठपर्यंत जायला कुठलं वाहन मिळालं असेल, केंव्हा घरी पोचला असेल, सकाळी लवकर किती वाजता उठून मुलांना तयार केले असेल, त्यातच आपल्या वस्तू गोळा करून आणल्या, इतकी दगदग करून पुन्हा त्याबद्दल कधी बोलणार नाही." तिचे डोळे भरून आले. त्याचा हात तिने आपल्या हातात गच्च धरून ठेवला. दुस-या हाताने तिला हळू हळू थोपटत तो म्हणाला,"आता फक्त लवकर बरं व्हायचा विचार करायचा. मग सगळं कांही ठीक होईल. दुसरी कुठली काळजी करू नकोस. ती करायला मी आहे ना."

संध्याकाळी त्याच्याबरोबर अनिकेत, अद्वैतही आले. आल्या आल्या दोघेही दोन्ही बाजूंनी प्रमिलाच्या गळ्यातच पडले. थोड्या दटावणीच्या सुरातच प्रमोद त्यांना म्हणाला,"अरे जरा जपून. आईचं ऑपरेशन झालं आहे ना? तिच्याबरोबर आता धसमुसळेपणा करायचा नाही. तिला धक्का लागायला नको ना?" मुलांनी मग दोन्ही दिवसांचा संपूर्ण रिपोर्ट दिला. घरी काय काय केलं, खाल्लं, प्यायलं, शाळेत काय काय मजा आली वगैरे सगळं सांगून झाले. प्रमिलानेही "माझी शहाणी बाळं ग ती! असंच  शहाण्यासारखं वागायचं, बाबांना त्रास द्यायचा नाही. हट्ट करायचा नाही." वगैरे सांगितले.

प्रमोदचे एक नवे रूटीन सुरू झाले. ऑफीसला जायचा प्रश्नच नव्हता. रोज सकाळी दोन्ही मुलांना तयार करून शाळेत पाठवल्यावर हॉस्पिटलमध्ये चक्कर टाकायची. घरी परत आल्यावर स्वयंपाक करून ठेवायचा आणि शाळेतून मुले आल्यावर सगळ्यांनी जेवायचे. दुपारी मधल्या वेळेस थोडे हलके स्नॅक्स खाऊन पुन्हा हॉस्पिटलात जाऊन प्रमिलाबरोबर शक्य तितका वेळ घालवायचा आणि घरी परतल्यावर रात्रीचे जेवण. त्यातून कधी ढोकळा, रगडा पॅटिस असे कांहीतरी, नाहीतर एखादी भाजी बाहेरून आणायची, कधी एखादी शेजारीण एखादा पदार्थ करून पाठवायची तर कधी संध्याकाळी सगळेच जण हॉटेलात जाऊन मसाला डोसा, उत्तप्पा, पावभाजी वगैरे खाऊन यायचे. प्रमिलाच्या तब्येतीत रोज सुधारणा होतच होती. कॉटवर उठून बसायला, हळूच खाली उतरून उभे रहायला व त्यानंतर बाथरूमपर्यंत चालत जायला लागली. सलाईनच्या नळ्या निघाल्या, बॅंडेजचा आकार लहान झाला. अंगात पुरेसे बळ आल्यावर तिला डिस्चार्ज मिळाला.

घरी परत गेल्यावर काय करावे हाच विचार ती गेले कांही दिवस करीत होती. अनिकेतच्या वेळचे बाळंतपण माहेरीच झाले. अद्वैत झाला तेंव्हा घरात सासूबाई होत्या. आता त्या नाहीत. आई असती तर तिला हक्काने बोलावून घेतलं असतं पण आता तीही नाही. या वेळी दोघींचे नसणे तिला फारच प्रकर्षाने जाणवले. ताई शाळेत नोकरी करते. आता परीक्षेच्या दिवसात तिला सुटी कशी मिळणार? वहिनी तरी या दिवसात मुलांना घेऊन कशी येणार? किंवा कुणाकडे त्यांना सोडून येणार? त्यातून दादाला कधीही अचानक फिरतीवर जावे लागते तेंव्हा ते काय करतील? पूर्ण वेळ काम करायला एखादी मुलगी ठेवायची कां? ती कुठे मिळेल? सगळे नुसते प्रश्नच प्रश्न. कशाचीच उत्तरे तिला सापडत नव्हती. प्रमोदला विचारले तर त्याचे आपले एकच ठरलेले उत्तर, "मी आहे ना? तू मुळीच काळजी करू नकोस." तो तरी काय काय करणार आहे?

प्रमोदबरोबर प्रमिला घरी आली. दाराच्या समोरच्याच भिंतीवर मुलांनी कागदाचे पोस्टर लावून त्यावर मोठ्या अक्षरात 'सुस्वागतम्' लिहिले होते व बाजूला फुलांचे गुच्छ टांगले होते. बेडरूम स्वच्छ धुवून पुसून, पलंगावर स्वच्छ धुवून कडक इस्त्री केलेली चादर अंथरलेली होती. बाजूला छोटे सेंटर टेबल ठेवले होते. हॉस्पिटलमधून येतांना आणलेली सगळी औषधे प्रमोदने त्यावर ठेवली. दिवसभर घ्यावयाची औषधे आणि त्यांच्या वेळा एका कागदावर सुवाच्य अक्षरात ओळीवार लिहून तो कागद बाजूच्या भिंतीवर सेलोटेपने चिकटवून टाकला. प्रमिलाचे कपडे बदलून होईपर्यंत प्रमोद हातात चहाचा ट्रे आणि बिस्किटे घेऊन आला. प्रमिलाला मागच्याच आठवड्यातला एक प्रसंग आठवला. त्या वेळी टीव्हीवर कुठला तरी रहस्यमय चित्रपट लागला होता, ते पाहतांना त्यात ती चांगली रंगली होती. "आज मी चहा करून आणतो" असे म्हणत प्रमोद स्वयंपाकघरात गेला खरा, पण "चहाचा डबा कुठे आहे, साखरेचा डबा कुठे आहे, गाळणं कुठे आहे, कुठल्या पातेल्यातलं दूध घालायचं" असे विचारीत त्याने किती वेळा तिला उठवले होते. "आज सगळ्या गोष्टी मिळाल्या कां?" म्हंटल्यावर, "काल मीच तर त्या ठेवल्या होत्या. आज कुणाला विचारणार?" म्हणाला. चहा पिऊन झाल्यावर लगेच तो गॅसवर उकळायला ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याला आधण आले आहे का ते पहायला गेला आणि तसाच पुढच्या कामाला लागला.

प्रमिला घरी परत आली आहे हे समजल्यावर सगळ्या शेजारणी येऊन तिला भेटून, धीर देऊन आणि "कांही लागलं सवरलं तर सांग बरं. आम्ही आहोत ना?" असे सांगून गेल्या. एक दोघींना आपले कुतूहल लपवून ठेवता न आल्याने त्यांनी "काय झालं?, कसं झालं?, केंव्हा झालं?" वगैरै विचारणा केल्या. हाताने प्रमिलाला गप्प रहायचा इशारा देऊन प्रमोदनेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

संध्याकाळी सात सवासातच्या सुमाराला शेजारची कल्पना आली. अंगात नवा ड्रेस, पायात उंच टाचांच्या सॅंडल्स, परफ्यूमचा भपकारा, या सगळ्यावरून ती बाहेर जायला निघाली आहे हे दिसत होते.
"आज रात्रीच्या जेवणाचे काय करताहात?" तिने चौकशी केली.
त्या वेळेला प्रमोद कणीक भिजवून ती मळत होता. "बाकीचा स्वयंपाक जवळ जवळ झाला आहे, आता चपात्या केल्या की प्रमिलाला जेवायला वाढून देईन." प्रमोदने सांगितले.
"इतक्या लवकर?" तिने आश्चर्याने विचारले.
"सद्ध्या तिला भरपूर औषधे घ्यायची आहेत ना, म्हणून आम्ही हॉस्पिटलमधले टाईमटेबलच घरी पण सुरू ठेवले आहे. म्हणजे वेळच्या वेळी सगळी औषधे, अन्न, दूध वगैरे पोटात गेलेलं बरं."
"असं करते, मला आता थोडं बाहेर जायचं आहे, अर्ध्या पाऊण तासात परत येऊन जाईन. आल्यावर तुमच्यासाठी चपात्या करून पाठवून देईन. चालेल ना?"
"अहो, माझे हात कणिकेने माखलेले आहेतच. कणीक भिजवून तिंबून तयार आहे. अगदी हळू हळू केल्या तरी वीस पंचवीस मिनिटात आमच्यापुरत्या चपात्या होऊन जातील. मला सुद्धा तेवढीच चपात्या लाटायची आणि भाजायची प्रॅक्टिस होईल. तुम्ही आपलं काम करून सावकाशपणे या."
रात्रीचे जेवण ताटात वाढून घेऊन प्रमोद प्रमिलाकडे गेला तेंव्हा तिने विचारले, "मघाशी कोण आली होती?"
"अगं, ती आपली कल्पना आली होती. रात्रीच्या स्वैपाकाचं विचारीत होती."
"आणि तुम्ही नको म्हंटलं असेल ना ? ती एवढी विचारायला आली होती तर एखादा दिवस तिला करू द्यायचं होतं."
त्यावर कांही न बोलता प्रमोदने तिला पुढचा घास भरवला.

दुसरे दिवशी प्रमिलाचे दुपारचे जेवण सुरू असतांनाच सुखवंतकौर एका बाउलमध्ये पनीर छोले घेऊन आली. शेरेपंजाबमधल्या डिशच्या तोंडात मारेल अशा मसाल्याच्या घमघमाटाने प्रमोदच्या तोंडाला पाणी सुटले. पण डॉक्टरांनी प्रमिलाला तिखट व मसालेदार पदार्थ न खायला सांगितले होते आणि तिच्यासाठी आणलेले पनीर छोले तिलाच न देता स्वतः खाणे प्रमोदला योग्य वाटले नाही. त्यामुळे त्याने सुखवंतकौरची माफी मागून पथ्य असल्यामुळे प्रमिलाला ते खाता येणार नसल्याचे सांगितले. यावर "हमारे पंजाबमे कोई परहेजकी परवाह नही करता, उबले आलू खाकर परमिला ऊब गई होगी, उसको थोडा सवाद आयेगा इसके वासते लायी थी" असे कांहीतरी पुटपुटत सुखवंतकौर चालली गेली. प्रमिलानेही "एवढे तिने मुद्दाम बनवून आणले होते ते ठेऊन घेतले असते तर काय बिघडणार होतं? तुम्हाला छोले किती आवडतात?" असे सुनावले. प्रमोद त्यावर कांही बोलला नाही. पण त्यानंतर पद्मिनीने आणलेले तळलेले डाळीचे वडे आणि कांताबेनने आणलेले पात्रासुद्धा त्याने साभार परत पाठवून दिले. उगाच कसलाही धोका त्याला पत्करायचा नव्हता. मात्र राधिकाने पाठवलेल्या गरम गरम इडल्या आणि नीलिमाने दिलेली खीर तेवढी त्याने ठेऊन घेतली आणि प्रमिलाला खाऊ घातली.

सात आठ दिवस होऊन गेल्यावर एक दिवस प्रमिलाच्या सातआठ मैत्रिणी एकदमच आल्या. (त्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात सगळे संभाषण हिंदीतच झाले, सोयीसोठी मराठीत दिले आहे.) इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर एकीने विचारले,"अजून तुमच्या मदतीला कोणी बाई आली नाही कां?"
"कसले गं तुझे सासरचे लोक?"
"जाऊ दे, त्यांना तुझी काळजी नसेल, तू आपल्या माहेरूनच कुणाला कां नाही बोलावत?" "मग काय नवराच सगळा स्वैपाक करतो?"
"त्याला त्यातलं कांही येतं कां गं?"
"पुस्तकं वाचून शिकतोय म्हणे."
"हिला तर कडक पथ्य आहे ना? नुसतं उकडलेलं खायचं. त्यासाठी पुस्तक तरी कशाला पाहिजे?"
"पुस्तकावरून एक जोक आठवला. एक माणूस पुस्तक वाचून स्वैपाक करत होता. त्याने पुस्तकात बघून कार्ल्याच्या फोडी कापल्या आणि तेलात तळायला टाकल्या. तेवढ्यात फोन वाजला म्हणून त्या सोडून बाहेर गेला. परत य़ेईपर्यंत त्या जळून गेल्या होत्या. वा-याने पुस्तकाचं पानही उडालेलं होतं. तिथे दुधी हलव्याची कृती दिली होती. त्याप्रमाणे त्याने त्या कारल्याच्या जळालेल्या फोडी मिक्सरमध्ये घालून त्याचा लगदा केला, त्यात दूध घालून चांगलं शिजवलं, त्यात खवा, साखर आणि वेलदोड्याची पूड घातली ..."
"असाच दुसरा एक माणूस रेडिओवरील कार्यक्रम ऐकत एग करी बनवत होता. मध्येच चुकून रेडिओ स्टेशन बदललं. दुस-या ठिकाणी गुलाबजामुन कसे बनवायचे ते सांगत होते. ते ऐकून त्याने शिजवलेली अंडी साखरेच्या पाकात घातली...."
"तू तो पिक्चर बघितला आहेस कां?" असे म्हणत जॉनी वॉकरपासून जॉनी लीवरपर्यंत सगळ्या विनोदी नटांची कशी फजीती झाली किंवा त्यांनी स्वयंपाकघरात कसले ब्रह्मघोटाळे केले ते सांगून झाले. त्यानंतर अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मराठी सिनेमातले किस्से, तामीळ, तेलुगु, बंगाली सिनेमातले प्रसंग कोणाकोणाला आठवले.
पोटभर हंसून झाल्यावर कोणीतरी म्हणाली,"अगं तुम्ही हंसताय काय? ही बिच्चारी प्रत्यक्ष भोगतीय्."
"तू आपले अनुभव सांग ना गं."
"म्हणजे त्यातून नवीन जोक तयार होतील."
"ते रील लाइफ आणि रीयल लाइफ म्हणतात ना? तसेच."
प्रमिलाच्या मनात विचारचक्र सुरू होते. आपल्या मैत्रिणींचे हे बोलणे प्रमोद ऐकत असेल काय? त्याला काय वाटत असेल? पण पुरुषसुद्धा बायकांच्या नांवाने किती जोक करतच असतात. काय म्हणे तर नायग-याचा धबधबा पहायला एक बायकांचा ग्रुप गेला होता. त्यांना गाईडने सांगितले की तो पहा नायग-याचा धबधबा, तुम्ही आपले बोलणे थांबवलेत तर तुम्हाला त्याचा आवाजसुद्धा ऐकू येईल. मागच्या महिन्यातल्या त्या पार्टीमध्ये फक्त एका वाक्याचे विनोद सांगायचे होते.
एकाने सांगितले, "एकदा एक बुद्धीमान बाई होती." झाला जोक!
दुसरा म्हणाला,"तिने कपाटातून फक्त एक ड्रेस बाहेर काढला आणि तोच अंगात घातला."
"ती ड्रेसिंग टेबलसमोर बसली आणि पाच मिनिटात तयार होऊन उठली."
"तिनं कार ड्राईव्ह करतांना उजव्या बाजूला वळण्याचा संकेत दिला आणि ती उजवीकडेच वळली."
हे सगळे जोक्स बायकांनी कसे स्पोर्टिंगली घेतले होते. मात्र एका बाईने छान टोला मारला. ती म्हणाली,"तिचा नवरा तिच्यावर चक्क प्रेम करतो."

त्या गेल्यानंतर प्रमोद स्वतःहून कांही बोलला नाही. प्रमिलाच म्हणाली, "आज ब-याच दिवसांनी माझ्या मैत्रिणी भेटल्या."
"खूप मजा आली असेल ना?"... आता हे खरे म्हणायचे की उपरोधिक?
"बायकांनी कसले कसले जोक्स सांगितले. सगळे पोट धरधरून हंसलो."
"ते ऐकलं मी."... म्हणजे याला बोलणं ऐकलं असं म्हणायचंय् की हंसणं?
सावधगिरीचा पवित्रा घेत ती म्हणाली, "मी मात्र कांही बोलले नाही बरं कां ?"
"ते बरं केलंस. डॉक्टरांनी तुला कमीच बोलायला सांगितलय्." ... त्याला एवढंच म्हणायचंय् कां आणखी कांही सुचवायचंय्?

कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय (समजणे) बाई!

प्रमिलाबरोबर कुठल्याही बाबतीत हुज्जत घालणे प्रमोदने कधीच सोडून दिले होते. आपल्याला बोलतांना भान रहात नाही, उगाच शब्दावरून शब्द वाढत जातात, अर्थाचे अनर्थ होतात, गैरसमज वाढतात, कटुता निर्माण होते. ते सगळे नकोच. मुलांच्या समोर तर मुळीच नको म्हणून त्याने कांही न बोलता गप्प बसण्याचे धोरण ठेवले होते. आधी प्रमिला मनात येईल ते भडाभडा बोलून टाकत असे. एखाद वेळेस त्यामुळे प्रमोद दुखावला गेला आहे असे तिला नंतर जाणवायचे, पण तोंवर प्रमोद मनातून तिच्यापासून दूर गेलेला असायचा. त्यामुळे तिने अहो, "मी मघाशी तुम्हाला बोलले ना?" असे म्हंटले तर लगेच तो विचारायचा "त्याचं काय?" त्यानंतर
"मी तसं बोलायला नको होतं ना?"
"हो कां?"
"अहो खरंच. मी सॉरी म्हणायला तयार आहे"
"मग मी काय करू?"
"असं काय करता? मला माफ करा ना?"
"नाही तरी मी तरी दुसरं काय करणार आहे?"
"आता तुमच्या पाया पडून नाक घासायला हवे कां?"
"ही नाटकं बस्स झाली हं. तुला मनातून काय वाटतं ते सांगून झालं आहे. वर हे उपरतीचं ढोंग नको आता." असे म्हणून तो आणखीनच दूर चालला जाई. त्यामुळे आताशा प्रमिलाही त्याच्याबरोबर जरा चाचपडत बोलायला लागली होती.

प्रमिलाच्या अंगातली शक्ती वाढली तसे तिने हळू हळू बसायला, बोलायला, घरातल्या घरात हिंडायला सुरुवात केली. तिच्या मैत्रिणी आता जास्त वेळा तिला भेटायला, गप्पा मारायला यायला लागल्या. तेंव्हा जे बोलणे होत असे त्यात गांवाकडून कोणाला तरी बोलावून घ्यायचे पालुपद नेहमीच येत असे. प्रमिलाही कोणी ना कोणी लवकरच येणार असल्याचेच सर्वांना सांगत होती. तोपर्यंत काय चालले आहे याचीही चर्चा होत असे. एकदा तिला एकीने विचारले, "काय गं, तुझे मिस्टर आता स्वैपाक कुठपर्यंत शिकले आहेत?"
"तूच त्यांना ट्रेन केलंस की काय?" दुसरी.
"हे डेंजरस असतं हां, आपला इम्पॉर्टन्स अशानं कमी होऊन जायचा!" तिसरी.
ती उत्तर द्यायची, "त्यांना तर लग्नापूर्वीपासूनच सगळं येत होतं."
"चल, ते थापा मारत असतील. मला माहीत आहे, तू इथे नव्हतीस तेंव्हा रोज रात्री हॉटेलात खाऊन पिऊन उशीराने घरी यायचे. कधी बाहेर जायचा कंटाळा आला तर नुसता ब्रेड ऑमलेट खायचे, असं एकदा त्यांनीच सांगितलं होतं."
"अगं ऑफीसातून आल्यावर एकट्यासाठी करायचा कंटाळा येत असेल."
"आणि इतकी त-हेत-हेची हॉटेले, खानावळी असतांना पुरुषमाणसाला स्वैपाक करायची गरजच काय?"
"पण कुठे आणि कधी ते हे सगळं शिकले असतील?"
"अगं, माझ्या सासूबाईंनीच मला सांगितलं आहे की त्यांनीच ह्यांना स्वैपाकाची एबीसीडी शिकवली."
"एबीसीडी म्हणजे काय?" 
"म्हणजे स्वैपाकासाठी काय काय साहित्य लागतं, तो करतांना होत असलेल्या भाजणं, परतणं, तळणं, शिजवणं या क्रियांमध्ये नेमकं काय होतं वगैरे फंडे समजावून ठेवले."
"म्हणजे तुझ्या सासूबाई सायंटिस्टच होत्या म्हणावं लागेल!" 
"माझी आई माझ्या भावाला असलं कांहीच काम कधी सांगायची नाही, ती आपली नेहमी मलाच वेठीला धरायची."
"आमच्या घरी तर एकत्र कुटुंब होतं, घरी चिकार लेडीज होत्या, त्यामुळे जेंट्सना स्वैपाकघरात नो एंट्री!"
"माझ्या नणंदेचं लग्न होऊन ती सासरी गेल्यावर सासूबाईंच्या हाताखाली मुलगीच नव्हती आणि त्यांना कधी कधी एकदम दमा उठला की त्यांच्या हातनं कांही व्हायचं नाही. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांच्याकडूनच कामं करवून घ्यावी लागायची."
"मग बरोबर आहे. तरीच म्हंटलं यांना एकदम एवढा कॉन्फिडन्स कसा आला?"
"पण तू एक फुल टाईम मेड कां नाही ठेवत?"
"तिला भरपूर पैसे द्यावे लागतील ना?"
"बायकोसाठी कोण पैसे खर्च करेल?"
"तेंव्हा यांना महात्मा गांधींचं स्वावलंबन आठवणार नाही कां ?"
"पण फक्त महिन्याभरासाठी कुठली मेड सर्व्हंट मिळणार आहे?"
अशा त-हेचे संवाद होत. त्याशिवाय त्या आणखी कांही माहिती देत, सूचना करीत. "दिवाळीच्या फराळाच्या वस्तू पुरवणा-या भोळेबाई जेवणाचे डबेसुद्धा बनवून देतात म्हणे, त्यांना विचारून पहा." नाहीतर "तुझी ती कामवाली कमळाबाईसुद्धा सांगितले तर पोळ्या करून देईल. मागे आपल्या देसायांच्याकडे पाहुणे आले होते तेंव्हा त्यांनी तिलाच सांगितले होते" वगैरे. प्रमिला ही माहिती तत्परतेने प्रमोदच्या कानावर घालत असे. पण त्यामुळे कांही फरक पडला नाही. प्रमोद त्यावर कांही प्रतिक्रियाच देत नसे. आता माणूस बोललाच नाही तर त्याच्या मनात काय चालले आहे ते कळायचे कसे?

एक दिवस प्रमिलानेच त्याला विचारले, "अहो मी तुम्हाला कांही सांगितलं होतं त्यावर तुम्ही काय विचार केला आहे?" 
"केला आहे ना! तुला एक एक मुद्दा सांगतो. पहिला मुद्दा नातेवाईकांचा. आतापर्यंत सगळ्यांना तुझ्या ऑपरेशनबद्दल समजलेलंच आहे. मुंबईतले बहुतेक लोक घरी येऊन तुला भेटून गेले. त्यातल्या कुणी इथे आल्यावेळी शिरा, उपमा करून दिला, खिचडी करून दिली, पोळ्या बनवल्या. मी कुणाला कधी नको म्हंटले नाही. त्यांना लागतील त्या वस्तू काढून दिल्या, घरात नसतील तर बाजारात जाऊन त्या घेऊन आलो ना?"
"हो."
"परगांवच्या लोकांबरोबर फोनवर बोलणं होतच आहे. आता कुणाला कांही, कुणाला कांही प्रॉब्लेम आहेत. तरीही कांहीही करून तुम्ही इथे याच असे माझ्याच्याने म्हणवणार नाही. 'आपलं ओझं आपणच वहावं' असं मला शिकवलं गेलं आहे."
"आता तुम्हाला मी म्हणजे ओझं झाली आहे ना?"
"तसं नाही, पण कुणाला अगदी इतकं वाटलंच असतं तर ती आपली कांही तरी दुसरी सोय करून इकडे आली असती."
"म्हणजे माझ्याबद्दल कुणाला कांही वाटतच नाही!"
"जाऊ दे. हा मुद्दा आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. दुसरा मुद्दा भोळेबाई. त्या जेवणाचे डबे बनवून देतात, पण त्यांच्या घरी जाऊन ते आणावे लागतात. तुला अथरुणातून उठावे लागू नये म्हणून आपल्याकडे दरवाजा उघडायला आणि फोन उचलायला तरी मला घरी रहावंच लागतं. म्हणजे डबे आणण्या नेण्यासाठी तिसरा माणूस पहावा लागेल. तो वक्तशीर, निरोगी आणि प्रामाणिक असायला हवा. शिवाय आपण रोजच्या रोज तुझी तब्येत, पथ्य आणि आवड बघून काय बनवायचे ते ठरवतो, भोळेबाई तसं करणार आहेत कां? त्या आपल्या त्यांच्या सोयीनुसार स्वयंपाक बनवणार. मला त्यांच्यासारखा रुचकर स्वयंपाक कधीच करता येणार नाही हे मान्य आहे. पण तुला काय हवं नको ते विचारून मी तसं बनवायचा प्रयत्न करतोच आहे ना? तुला आणखी कांही पाहिजे असेल तर ते कसे करायचे सांग ना, मी कधी नाही म्हंटलं आहे? तुला काय त्रास होतो आहे ते सांगितलंस तर आपण तो कमी करण्याचा मार्ग पाहू."
"अहो, मी माझ्यासाठी म्हणत नाही आहे. तुमचे कष्ट पाहून मला कांही चांगलं वाटत नाही. तुम्हालाच थोडा आराम मिळेल म्हणून मी सांगते आहे."
"आता या वेळी मला आरामाची गरज आहे कां? मला तर काम करतांना मजा वाटते, एक प्रकारचा नवनिर्मितीचा आनंद मिळतो, कष्ट वाटण्याइतकी मेहनत मी कधी करतच नाही. सगळी कामे आरामातच करतो आहे. तुझा विश्वास बसत नसेल तर तसं स्टॅंपपेपरवर लिहून देतो. आता आपण तिसरा मुद्दा पाहू."
"कुठला?"
"ही कमळाबाई चार घरातला केर काढून तिथली धूळ घेऊन येणार आणि त्याच मळक्या कपड्यात आपल्या घरी चपात्या भाजणार हे हायजिनिक आहे कां? हे जास्तीचे काम ती सगळी कामं करून झाल्यावर तिच्या सोयीप्रमाणे करणार आणि आपल्या जेवणाच्या वेळा आपण त्याच्याशी जुळवून घ्यायच्या. शिवाय संध्याकाळी ती येणार नाही, तेंव्हा रात्रीसाठी दुपारीच पोळ्या करून ठेवायच्या. आता तुला तव्यावरून गरम चपाती थेट ताटात वाढून मिळते आहे, त्यापेक्षा त्या थंड पोळ्या जास्त चवदार लागणार आहेत कां? माझ्या करण्यात आणखी काय काय सुधारणा पाहिजेत ते सांग, त्या करायला मला शिकव."
"पुन्हा तेच! मी कधी तुमच्याविरुद्ध तक्रार केली आहे कां?"
"हो ना! तुझं केवढं मोठं मन आहे?"
"हे म्हणजे ज्याचं करायला जावं बरं, तो म्हणतो माझंच खरं असं झालं."
"हो कां? माझं काय बरं होणार आहे ते मला समजेल कां?"
"हेच! तुमचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतील."
"कष्टाबद्दल मी सांगितलंच आहे. आता या वाचलेल्या वेळाचा मी घरातल्या घरात कसा सदुपयोग करू तेही सांग."
"आरामात झोपा, मुलांचे अभ्यास घ्या, नाही तर टीव्ही बघा."
"दुपारी झोपायची मला संवय नाही आणि ती लावून घ्यायला मला परवडणार नाही. मुलांचे अभ्यास मी रोज घेतोच आहे, वाटलं तर विचार त्यांना आणि जन्मात कधी बघितले नाहीत इतके टीव्हीवरचे प्रोग्रॅम आता बघतो आहे. मला हे उभ्याने ओणवं होऊन काम करायला जमत नाही म्हणून मी पंख्याखाली खुर्चीवर बसून आणि सगळ्या वस्तू टेबलावर मांडून, समोर चाललेले टीव्हीवरचे प्रोग्रॅम पहात हळू हळू सगळी कामं करत असतो."
"त्याचा ढीगभर पसारा होतो तो! माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की जेंव्हा पहावं तेंव्हा तुम्ही कधी भाजी, कधी भांडी, झालंच तर कपडे, पुस्तकं, कागदपत्रं असला कसला तरी पसारा घालून बसलेले दिसता. त्या तुम्हाला हंसतात ते मला ऐकून घ्यावं लागतं हो!"

आता मात्र प्रमोदच्या संयमाचा बांध पार कोसळला. त्याने जिभेचा दांडपट्टा सपासप चालवायला सुरुवात केली, " म्हणजे तुझा हा प्रॉब्लेम आहे तर. याच्यावर आपल्याकडे बरेच उपाय आहेत. या साळकायांनी असं वेळी अवेळी आपल्या घरी यायला बंदी घालून त्यांना हॉस्पिटलमधल्यासारखे व्हिजिटिंग अवर ठरवून देऊ. तेवढा वेळ तू सांगशील त्या कोप-यात मी मारुतीसारखा दोन्ही हात जोडून उभा रहात जाईन. त्यातली कोणी जर कां रोज तास दोन तास इथे रहायची जबाबदारी घ्यायला तयार असेल तर मी तेवढा वेळ उन्हात भटकून येईन. म्हणजे तुम्ही मला मनसोक्त नांवं ठेवा नाही तर शिव्या घालून घ्या. त्यापेक्षाही एक उत्तम उपाय आहे. माझा नवरा मठ्ठ आणि अडमुठा आहे, त्याला काडीची अक्कल नाही आणि तो माझं काही ऐकत नाही असं तू त्यांना सांगूनच टाक. मग मला कसं वठणीवर आणायचं कां माझ्या जांचातून तुझी सुटका करायची ते त्यांना ठरवू दे."
या वाग्बाणांनी घायाळ होऊन काकुळतीच्या स्वरात प्रमिला म्हणाली,"नका हो असं बोलू. माझं असं म्हणणं नाही आहे."
किंचित नरमाईने तो म्हणाला, "पण तुझ्या मैत्रिणांना तसं वाटतं आणि तुला ते पटतं, मीही ते मान्य केलं आहे. मग उगाच वाद कशाला? त्यापेक्षा थोडं काम करून एखादा पदार्थ बनवला तर मुलं तो आवडीनं खातील तरी. बहुतेक अजून पर्यंत कोणी त्यांचे कान भरलेले नसावेत." असे म्हणून तो चालला गेला. आता याच्यावर बिचारी प्रमिला काय बोलणार आणि कुणाला बोलणार? यापुढे या विषयावर प्रमोदबरोबर बोलायचे नाही असा तिने कानाला खडा लावला.

असेच दिवस जात महिना संपायला आला. आता प्रमिला बसल्या बसल्या हलकी कामे करायला लागली होती. मुलांच्या शाळांना सुटी लागल्याने ती घरात असायची. तीही उत्साहाने मदत करायला लागली. प्रमोदच्या ऑफीसातून रोज कामासंबंधी फोन यायला लागले. त्याच्या ऑफीसला जाण्याचे वेध सुरू झाले. शाळांना सुटी लागल्यामुळे सुमाताई आपल्या मुलांना घेऊन दोन आठवडे प्रमिलाच्या मदतीला आल्यावर त्याने ऑफीस जॉईन केले. मुले एकमेकांबरोबर रमली. फोटोमध्ये मुंबईतल्या वेगवेगळ्या जागा पाहतांना तिथे जावेसे त्यांना वाटणारच. मुलांच्या हौसेखातर रविवारी त्याने मुलांना सगळीकडे हिंडवून आणले. सीमाताईंचे दीर गोरेगावला आणि नणंद ठाण्याला रहात. फोनवर बोलतांना त्यांनी त्यांच्याकडे येऊन जायचा आग्रह केला. आपली तब्येत आता आटोक्यात आली असल्याने व सोबतीला मुले असल्याने प्रमिलानेच त्यांना तिकडे जाऊन यायला सांगितले. ऑफीस सुटल्यावर प्रमोद त्यांना पोचवून आला. दुसरे दिवशी तिकडच्या मंडळींनी त्यांना परत आणून सोडले. सुमाताई परत गेल्यावर रेखावहिनी त्यांच्या मुलांना घेऊन आल्या. पुन्हा एकदा मुंबई दाखवणे, त्यांच्या भावाबहिणींकडे त्यांना नेऊन पोचवणे वगैरे झाले. या पाहुण्यांच्या आगमनाने मुलांना मजा आली. प्रमिलाची तब्येत पुन्हा रुळावर आली.

सात आठ महिन्यांनी सगळेजण एका लग्नासाठी बेळगांवजवळच्या एका आडगांवात गेले होते. तिकडे अजून मोठमोठ्या वाड्यात एकत्र कुटुंबात रहायची पद्धत होती. त्या लोकांना मुंबईच्या जीवनाची एवढी माहिती नसणार, ते उगीच एकाला दहा प्रश्न विचारणार म्हणून प्रमिलाने सांगून टाकले की तिचे ऑपरेशन होऊन गेल्यावर सुमाताई आणि रेखावहिनी तिच्या मदतीला आल्या होत्या. त्यावर सगळ्यांचे समाधान झाले. प्रमोदलाही "आपण यंव केलं आणि त्यंव केलं" अशा बढाया मारायला आवडत नव्हते. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याने ब-यापैकी नांव कमावलेले होते. महिनाभर घरात काम करून आपण कांही पराक्रम गाजवला अशी भावना त्याच्या मनात नव्हती. त्यामुळे त्यालाही या विषयावर चर्चा नकोच होती. त्याने प्रमिलाला अनुमोदन दिले.

मनुष्य स्वभावाच्या आणि वागण्यातल्या या विसंगती ऐकल्यावर "याला काय म्हणावे?" हा प्रश्न मला पडला.